मार्कंडेय मंदिर पुनर्निर्मितीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकार्‍यांची विष्णु कारमपुरी भेट घेणार

सोलापूर – तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात यावे यासाठी २७ जून या दिवशी धाराशिव येथील जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन देणार आहे, अशी माहिती श्री मार्कंडेय महामुनी पुनर्निर्माण समितीचे नियंत्रक आणि ज्ञाती संस्थेचे श्री. विष्णु कारमपुरी यांनी दिली.

श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री मार्कंडेय महामुनी यांचे मंदिर पुष्कळ अडचणीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी पुष्कळ अडचण येते. ती दूर करा अन्यथा स्थलांतरित करा, अशा मागणीचे निवेदन श्री मार्कंडेय महामुनी पुनर्निर्माण समितीच्या वतीने तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापक समिती आणि तहसीलदार यांना ३० एप्रिल २०१९ या दिवशी देण्यात आले होते. त्या वेळी ‘याविषयी लवकरच निर्णय घेऊन आपल्याला कळवू’, असे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन मास उलटूनही याविषयी कार्यवाही झाली नाही.

निवेदन देण्यासाठी सोलापुरातील सर्व पद्मशाली समाजातील कार्यकर्ते, नेते आणि पद्मशाली समाजातील सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी अन् नेते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे नियंत्रक श्री. विष्णु कारमपुरी यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF