हिंदुहितासाठी लढणार्‍या हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेले धर्मरक्षणाचे व्यापक कार्य !

ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमीला (२७ जून २०१९ या दिवशी) असलेल्या ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…

हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना गोवा येथे वर्ष २०१२ मध्ये झालेल्या प्रथम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी झाली. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सक्रीय असणारे कार्यकर्ते, धर्मप्रेमी आणि हिंदूंच्या संघटना यांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य देणे, राष्ट्र अन् धर्म यांच्या हितार्थ न्यायालयीन लढा उभारणे, भ्रष्ट व्यवस्था पालटण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, या उद्देशांसाठी देशभरातील राष्ट्रप्रेमी अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे कार्य हिंदु विधीज्ञ परिषद करत आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांचे व्यापक स्तरावर संघटन होत आहे. अनेक अधिवक्ते राष्ट्र-धर्म हिताच्या कार्यासाठी सक्रीय होत आहेत. पूर्वी वर्षातून एकदा अधिवक्त्यांचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ आयोजित करण्यात येत होते. अधिवक्त्यांच्या वाढत्या सहभागामुळे २०१७ – २०१८ या वर्षांत अधिवक्त्यांची चार राष्ट्रीय अधिवेशने आयोजित करण्यात आली. तसेच अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत मे २०१९ मध्ये दोन-दिवसीय ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशन’ही आयोजित करण्यात आले होते. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या आज असलेल्या ७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने तिने केलेले व्यापक धर्मकार्य येथे देत आहोत.

१. वर्ष २००८ चा मालेगाव स्फोट प्रकरणातील खटला

हिंदु विधीज्ञ परिषदेने या खटल्यातील काही आरोपींचे वकीलपत्र घेतले. त्यातील एकाला न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. काहींचा जामीन संमत झाला असून आता खटला चालू झाला आहे, परंतु निकालापर्यंत न थांबता परिषदेने हेमंत करकरे यांच्यासारख्या पोलिसांचा खोटारडेपणा मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडला. पोलिसांचे गैरव्यवहार आज न्यायालयासमोर आहेत. त्यातही त्यांना कधीतरी शिक्षा होईलच !

२. मोहसीन शेख याच्या हत्येचा खटला

वर्ष २०१४ मध्ये श्री. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी निवडून आल्यावर लगेचच फेसबूकवर शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अश्‍लील चित्रे प्रसारित करण्यात आली. या विरोधात कारवाई व्हावी, अशी हिंदुत्वनिष्ठांनी मागणी केली; परंतु पोलिसांनी केलेल्या दटावणीमुळे अनेक ठिकाणी प्रकरणाला वेगळे वळण लागले आणि त्यातल्याच एका प्रकारात पुण्यात मोहसीन शेख नावाच्या एका युवकाची हत्या झाली. त्यात ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या अनेकांना गुंतवण्यात आले. पुरावे खोटे आहेत, हे दिसत होते. हे लक्षात आल्यावर हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्यासाठी उभी राहिली. कथित आरोपींना जामीन मिळवून देणे, आरोपांतून मुक्तता करण्यासाठी याचिका करणे अशा प्रकारे न्यायालयीन लढा चालू आहे.

३. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांच्या हत्येची प्रकरणे

देशात आज सदर पुरोगाम्यांचीच हत्या झाली आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. या सर्व प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले आहे. हे लक्षात येताच सर्व आरोपींसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांनी वकीलपत्र घेतले. परिषदेच्या प्रयत्नांमुळे काहींचे जामीनही झाले आहेत. खटला चालवण्याची परिषदेची सिद्धता आहे. १२ सहस्त्र निरपराध भारतियांची हत्या करणार्‍या नक्षलवादासंदर्भात काहीही न बोलणारे या ४ हत्यांसंदर्भात बोलतात, याचा विचार मात्र येथे होणे आवश्यक आहे.

४. हिंदु विधीज्ञ परिषदेने वर्ष २००८ च्या ठाणे आणि वर्ष २००९ च्या मडगाव स्फोट प्रकरणांतही ‘हिंदु आतंकवादा’चे आरोप झालेल्या हिंदूंना निर्दोष मुक्त करण्यासाठी यशस्वी न्यायालयीन लढा उभारला. तसेच परभणी, पूर्णा, जालना येथील प्रकरणांत ‘हिंदु आतंकवादा’चे आरोप झालेल्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयांनी केली. त्यांच्या वतीने नुकसान भरपाईच्या याचिकाही परिषदेने उच्च न्यायालयात केल्या आहेत.

खटले चालवण्याची ही ठळक उदाहरणे आहेत. याशिवायही अनेक प्रकरणांत हिंदु विधीज्ञ परिषद न्यायालयीन लढा देत आहे.

५. परिषदेने ‘राष्ट्र्रीय हरित लवादा’कडे केलेल्या याचिकेमुळे भिवंडी येथील इदगाह कत्तलखाना बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील १४३ कत्तलखाने बंद केले जावेत, यासाठीही परिषदेची याचिका प्रलंबित आहे.

६. हिंदु धर्म विरोधकांच्या विरोधात न्यायालयीन लढा !

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आधीच हिंदु विधीज्ञ परिषदेने त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते आणि त्याची चौकशी शासनाने चालू केली होती. साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी दिलेल्या चौकशी अहवालामध्ये परिषदेने केलेले आरोप खरे आहेत, असे सांगत विशेष लेखापरीक्षण करून घेण्याची शिफारस केली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अन्य न्यासांनी खाललेल्या पैशांसंदर्भातील चौकशी चालू झाली आहे. कथित समाजसेविका तिस्ता सेटलवाड यांच्या ‘एफ्सीआर्ए’च्या घोटाळ्याची तक्रारही हिंदु विधीज्ञ परिषदेने केली आहे. ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे काळे पैसे कोल्हापुरातील एका पतसंस्थेत कशाप्रकारे लपवून ठेवले आहेत, हेही समोर आणण्यात परिषदेला यश आले. अशाप्रकारे हिंदु विधीज्ञ परिषद समाजवादी आणि साम्यवादी यांचे काळे व्यवहार उघड करत आहे.

काश्मीर खोर्‍यात काम करण्याचा दावा करणारी ‘सरहद’ नावाची संघटना कसे काळे धंदे करते, हेही परिषदेने शासनाकडे उघड केले आहे. त्याची चौकशी चालू झाली आहे.

७. हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेले धर्मजागरणाचे कार्य !

‘टाइम्स नाऊ’, ‘न्यूज एक्स’, ‘एन्डीटीव्ही २४ बाय ७’ आदी इंग्रजी, तसेच विविध हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते हे हिंदुत्वाची बाजू प्रखरपणे मांडतात. या माध्यमातून हिंदु धर्मविरोधकांचे पितळ उघडे पाडण्याचे कार्य यशस्वीपणे केले जात आहे.

८. हिंदु विधीज्ञ परिषदेने उभारलेले अन्य न्यायालयीन लढे !

पोलिसांच्या काळ्या कारभारांविरोधात दाद मागता यावी, यासाठी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने केलेल्या याचिकांमुळे आज महाराष्ट्र आणि राजस्थान अशा दोन राज्यांत ‘पोलीस तक्रार प्राधिकरणा’ची स्थापना झाली आहे.

यासमवेतच ज्या गुन्ह्यांचा तपास नीट न केल्याने आरोपी निर्दोष सुटतो, अशा प्रकरणांत पोलिसांची तक्रार करणे, आवश्यक असल्यास सरकारी अधिवक्त्यांची तक्रार करणे, हेही परिषदेने हाती घेतले आहे.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेले विविधांगी कार्य !

शासनाने कह्यात घेतलेल्या महाराष्ट्रातील मंदिरांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातही हिंदु विधीज्ञ परिषदेने मोठे कार्य केले आहे. या माध्यमातून राज्यातील सरकारीकरण झालेल्या प्रत्येक मंदिरातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यात आला.

परिषदेने ३०६७ मंदिरांचा समावेश असणारी ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या ८ सहस्त्र एकर भूमीचा घोटाळा, ‘रॉयल्टी’, भूमीचे भाडे न येणे, अतिक्रमणे, सोने आणि चांदी यांमधील घोटाळे असे अनेक विषय समोर आणल्यानेे आज तेथे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चौकशी चालू आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची १२०० एकर भूमी असली, तरी १ फूट भूमीही देवस्थानच्या ताब्यात नव्हती. परिणामी १ रुपयाचे उत्पन्नही देवस्थानाला येत नव्हते. त्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेने याचिका केल्यामुळे आज मंदिराची ८५० एकरहून अधिक भूमी देवस्थानाला परत मिळाली. यासमवेतच परिषदेने देवस्थानच्या गोशाळेतील गायींच्या पोटात १५ किलो प्लास्टिक आणि धातूची तार अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, हेही जनतेसमोर आणले.

अशाच प्रकारे महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानीदेवीच्या मंदिर समितीने केलेल्या मोठ्या घोटाळ्या प्रकरणीही परिषदेने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणात किमान १० ते १२ जिल्हाधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई होईल, अशी परिस्थिती आहे.

मुंबई येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातील विश्‍वस्तांचा भ्रष्टाचार, महिला-भक्तांशी उद्धट वागणूक, बेकायदेशीर नोकरभरती असे अनेक घोटाळे परिषदेने कागदपत्रांसह समोर आणले आहेत. त्यासंबंधी चौकशा चालू आहे.

शिर्डी येथील साई मंदिराचा ५०० कोटी रुपयांचा निधी राजकीय कारणांसाठी धरणाच्या कामासाठी देण्यात आला. या विरोधात परिषदेने केलेल्या याचिकेमुळे आज त्या निर्णयावर न्यायालयाने स्थगिती आणली आहे. प्रत्येक १२ वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण पुढे करून साई मंदिर समितीने खरेदीतील दर कसे अत्यधिक दाखवले, त्यात कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे परिषदेने उघड करून त्यासंदर्भातही याचिका केली आहे.

जुलै २०१६ मध्ये त्र्यंबकेश्‍वर-नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा चालू होणार होता. वर्ष २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी योग्य नियोजनाच्या अभावी चेंगराचेंगरी होऊन २८ जणांचे प्राण गेले होते आणि शेकडो भाविक जखमी झाले होते. शासकीय नियोजनशून्यता आणि भ्रष्टाचार यांमुळे वर्ष २०१६ मध्येही अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. वर्ष २००३ मध्ये एका दिवशी ६० लाख भक्त येणार म्हणून ३०० एकर भूमीची सोय करण्यात आली होती. वर्ष २०१६ मध्ये एक कोटी भाविक येणार, अशी स्थिती असतांना जेमतेम १५ ते २० एकर भूमीची कशीबशी सोय करण्यात आली होती. ही स्थिती अशीच राहिली असती, तर मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या असत्या. हिंदु विधीज्ञ परिषदेने सदर परिस्थितीचा अंदाज घेऊन मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेमुळे शासनाला गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे लागले आणि कुंभमेळ्यासाठी भूमीचे अधिग्रहण करावे लागले. त्यामुळे संत आणि भाविक जनांची मोठ्या प्रमाणावर होणारी गैरसोय रोखता आली.

मंदिरे शासनाच्या ताब्यात नको, हे म्हणायला सोपे असले, तरी ‘मंदिरे सांभाळणार्‍यांनी भ्रष्टाचार करू नये’, हे पहाणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे राष्ट्रव्यापी संघटन !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संघटन व्हावे, या हेतूने परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी देहली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगण या राज्यांमध्ये दौरे केले. त्यामुळे आता या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते धर्मरक्षणाच्या कार्यासाठी संघटित होत आहेत, तसेच धर्मप्रेमींना कायदेविषयक साहाय्य करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF