मोदी सरकारच्या काळातच राममंदिर होणार ! – शिवसेना

नवी देहली – राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला, तरी जनतेच्या न्यायालयाने त्याचा निर्णय नुकताच सुनावला आहे. पंतप्रधानांच्या कार्यकाळात अयोध्येत राममंदिर होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत व्यक्त केला. ‘जर यदा कदाचित् राममंदिर झालेच नाही, तर या प्रचंड बहुमताला अर्थ रहाणार नाही’, असेही ते म्हणाले. ‘प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम तातडीने रहित करावे’, अशी आग्रही मागणीही खासदार राऊत यांनी या वेळी केली.

राहुल गांधी यांनी एक दिवस काळकोठडीत राहून दाखवावे !

म. गांधी यांचा अपमान या देशात होता कामा नये. गांधी यांचा अपमान झाल्याने जे दुःख होते, त्यापेक्षा अधिक दुःख स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्यानंतर होते’, असे ते म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले. सावरकरांच्या अपमानाचा सूड घेत जनतेने काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवला. क्रांतीचे दुसरे नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. १० वर्षे ते काळकोठडीत राहिले. गांधी-नेहरू कधीही काळकोठडीत राहिले नाहीत. राहुल गांधी तुम्ही किमान एक दिवस तरी काळकोठडीत राहून दाखवा आणि मगच सावरकरांविषयी बोला’, असे आव्हान त्यांनी दिले.


Multi Language |Offline reading | PDF