छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसह पू. भिडेगुरुजी

पुणे, २६ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे, असे उद्गार श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले. २६ जून या दिवशी ‘भक्ती-शक्ती संगम’ कार्यक्रमाच्या अंतर्गत धारकर्‍यांना ते मार्गदर्शन करत होते. ‘भक्ती-शक्ती संगम’ कार्यक्रमाच्या अंतर्गत गेल्या ५ वर्षांप्रमाणे पू. भिडेगुरुजी यांनी पालख्यांच्या रथात संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराजांच्या रथाचे प्रतिकात्मक सारथ्य त्यांनी केले. पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानला आडकाठी करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचे श्रीशिवप्रतिष्ठानकडून खंडणही करण्यात आले. प्रत्यक्षातही ‘भक्ती-शक्ती संगम’ कार्यक्रम नियोजनाप्रमाणे व्यवस्थितरित्या पार पडला. या वेळी शेकडो धारकरी उपस्थित होते.

‘श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने रायगडावर साकारण्यात येणार्‍या ३२ मण सोन्याच्या सिंहासनासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातील ३ सहस्र धारकर्‍यांनी जुलैमध्ये किल्ले रायगडावर एकत्र जमावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळाही स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा’, असे आवाहनही त्यांनी मार्गदर्शनाच्या वेळी केले. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीनंतर पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह उपस्थित सहस्रो धारकरी डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत वारीमध्ये सहभागी झाले.

सामाजिक प्रसारमाध्यमांवर मत व्यक्त करून मोठेपणा दाखवू नका ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

‘फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांवर काहीतरी मत व्यक्त करून ‘आपण फार मोठे कार्यकर्ते आहोत’, असे दाखवू नका, असा समादेशही (सल्लाही) त्यांनी धारकर्‍यांना दिला, तसेच ‘जीवनात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूक वापरणार नाही’, अशी प्रतिज्ञाही त्यांनी उपस्थितांकडून करवून घेतली.

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांचा सन्मान

पू. भिडेगुरुजी यांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतांना राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पदाधिकारी

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मार्गावरून चालणार्‍या राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी युवकांचे संघटन निर्माण करणारे श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचा राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्याला समर्थन म्हणून श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. रावसाहेब बापू देसाई यांचाही परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. केदार महाराज भेगडे, ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदुभूषण श्याम महाराज राठोड, ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, गोरक्षा समितीचे श्री. अजिंक्य ढोकळे, श्री. योगेश माऊली तुरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF