राज्यातील प्रत्येक नागरिकावर ४५ सहस्र ९३ रुपयांचे कर्ज

मुंबई, २६ जून (वार्ता.) – राज्यावरील कर्जाचा भार सातत्याने वाढत असून वर्ष २०१९-२० मध्ये कर्जाची रक्कम ४ लाख ७१ सहस्र ६४२ कोटी रुपयांवर पोचली आहे. या कर्जावर व्याजापोटी शासनाला ३५ सहस्र २०७ कोटी रुपये द्यावे लागतात. कर्ज आणि व्याज मिळून कर्जाचा विचार करता राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ४५ सहस्र ९३ रुपये इतके कर्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०१९-२० वरील समर्थनद्वारे प्रकाशित केलेल्या सर्वसाधारण चर्चेमध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे.

समर्थनने अतिरिक्त अर्थसंकल्प २०१९-२० वर दिलेल्या टिपण्यांमध्ये खालील तपशील दिला आहे.

१. राज्याच्या स्थूल उत्पन्नात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी २६ लाख ६० सहस्र ३१८ कोटी रुपये असलेले स्थूल उत्पन्न वर्ष २०१९-२० मध्ये २९ लाख ७९ सहस्र ५५६ रुपये इतके वाढले आहे. या एकूण स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत राज्यातील कर्जाची रक्कम ५ लाख ६ सहस्र ८४९ कोटी रुपये म्हणजे १७ टक्के आहे.

२. वर्ष २०१७-१८ मध्ये शासनाला रुपये ८९ सहस्र ६६१ कोटी ५७ लाख रुपये महसूल जमा करण्यात अपयश आले. त्यामुळे शासनाला हा तोटा सहन करावा लागला.

३. वर्ष २०१७-१८ मध्ये शासनाच्या कराच्या व्यतिरिक्त ३ सहस्र ८६३ कोटी रुपये इतका महसूल घटला आहे.

४. राज्य शासनाच्या १५ लाख ९१ सहस्र ३९४ कर्मचार्‍यांच्या वेतनावर वर्ष २०१७-१८ मध्ये ८४ सहस्र ९२७ कोटी रुपये इतका व्यय करावा लागला.

५. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २४ लाख इतकी असून त्यांतील ५ कोटी ९ लाख लोकसंख्या नागरी भागात रहाते. नागरी भागापैकी १ कोटी ९० लाख म्हणजे २३.३० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये रहाते.

६. राज्यात उद्योग निर्मितीमध्ये आतापर्यंत २० सहस्र ३२३ प्रस्ताव संमत झाले असून १२ लाख कोटी ८६ सहस्र ६९६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे; मात्र आतापर्यंत केवळ ९ सहस्र ९८ उद्योग कार्यान्वित झाले आहे.

७. राज्यात २८५ सहकारी सूतगिरण्या असून त्यांतील ५८ सूतगिरण्या तोट्यात आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, वर्ष २०१८ मध्ये ४ सहस्र ७६ महिलांवर, तर २ सहस्र ६८८ बालकांवर बलात्कार

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी !

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. वर्ष २०१७ मध्ये २२ महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या होत्या. वर्ष २०१८ मध्ये त्यामध्ये १ सहस्र ५३४ ने वाढ होऊन महिलांवरील अत्याचारांच्या घटना ३३ सहस्र ५५७ घडल्या आहेत. यामध्ये १४ सहस्र ७५ महिलांचा विनयभंग झाला. ७ सहस्र ७२७ महिलांचे अपहरण आणि ४ सहस्र ७६ महिलांवर बलात्कार झाले. वर्ष २०१८ मध्ये ९ सहस्र १७४ मुलांचे अपहरण झाले असून २ सहस्र ६८८ बालकांवर बलात्कार झाले.


Multi Language |Offline reading | PDF