मराठी शिक्षण कायद्यासह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई – मराठी शिक्षण कायदा आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा संमत करून मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबवण्यासह इतर मागण्यांसाठी २४ जून या दिवशी ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’ या संघटनेच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मानद अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, नमिता किर, डॉ. दीपक पवार, कार्यवाह प्रमोद मसुरकर यांच्यासह मराठी भाषेसाठी कार्य करणार्‍या २० संघटनांचे पदाधिकारी, भाषाप्रेमी उपस्थित होते. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मराठी भाषामंत्री विनोद तावडे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती संघटनेचे कार्यवाह प्रमोद मसुरकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, राज्यात मराठी माध्यमातील अनुदानित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मराठी शिक्षण कायदा आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा संमत करण्यात यावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, इंग्रजी माध्यमातील शिक्षण सरकारी खर्चाने देऊ नये, मागेल त्याला इंग्रजी शाळा असे मुक्त धोरण स्वीकारू नये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी भाषा आणि शिक्षणतज्ञांचा विशेष अभ्यासगट नेमून त्यांच्या शिफारसींनुसार कार्यवाही करावी, वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये १० टक्के निधी मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी ठेवावा, मराठी भाषा भवन निर्माण करावे या मागण्यांचा समावेश होता.


Multi Language |Offline reading | PDF