वर्ष १९८० ते २०१० या काळात ३४ लाख कोटींहून अधिक काळा पैसा भारताबाहेर गेला !

  • गेल्या ९ वर्षांत किती काळा पैसा भारताबाहेर गेला असेल, याची कल्पना करता येत नाही. त्या तुलनेत किती काळा पैसा भारतात आला, याची कुठलीही आकडेवारी समोर आलेली नाही, हे लक्षात घ्या !
  • एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेला काळा पैसा भारतात आणल्यास देशातील गरिबी हटेल आणि विकासकामांना गती येईल !

नवी देहली – वर्ष १९८० ते २०१० या कालावधीत अनुमाने ३४ लाख ३० सहस्र कोटी रुपये एवढा काळा पैसा भारतियांकडून परदेशात पाठवण्यात आल्याची माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड फायनान्स’ (एन्आयपीएफपी), ‘नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च’ (एनसीएईआर्) आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनॅनशिअल मॅनेजमेंट’ (एन्आयएफ्एम्) या ३ संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांच्या स्थायी समितीने २४ जून या दिवशी ही माहिती लोकसभेत दिली. मार्च २०११ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने या ३ संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतियांच्या काळ्या पैशांचा शोध घेण्याचे काम सोपवले होते.

१.‘एनसीएईआर्’च्या अहवालानुसार वर्ष १९८० ते २०१० या ३० वर्षांमध्ये भारतियांनी परदेशात सुमारे २६ लाख ८८ सहस्र कोटी रुपये ते ३४ लाख ३० सहस्र कोटी रुपये पाठवले.

२. ‘एन्आयएफ्एम्’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार वर्ष १९९० ते २००८ या कालावधीत १५ लाख १५ सहस्र ३०० कोटी रुपये भारतियांनी परदेशात पाठवले.

३. ‘एन्आयपीएफपी’ या संस्थेच्या मते, वर्ष १९९७ ते २००९ या कालावधीत भारतियांकडून परदेशात पाठवण्यात आलेला काळा पैसा हा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) ०.२ ते ७.४ टक्के एवढा होता.

४. बांधकाम, खाण, औषधे, पान मसाला, गुटखा, तंबाखू, सोने-चांदी, चित्रपट आणि शिक्षण अशा क्षेत्रांत सर्वाधिक काळा पैसा असल्याचा निष्कर्ष या ३ संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे.

५. ‘देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशांची सद्य:स्थिती आणि त्याचे विश्‍लेषण’ नावाच्या या अहवालात म्हटले आहे की, काळ्या पैशांच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा कोणताही अंदाज बांधू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या तर्कावरून काळ्या पैशांविषयीची ठोस कार्यपद्धत सांगितली जाऊ शकत नाही. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यांतील छोट्या छोट्या गोष्टी यांवर अवलंबून आहेत. या अहवालात मांडण्यात आलेले अंदाज कोणत्याही एका प्रकारच्या अन्वेषण पद्धतीने समोर आलेले नाहीत. त्याचप्रमाणे यातील अन्वेषण पद्धत आणि दृष्टीकोन यांविषयी एकमतही नाही.


Multi Language |Offline reading | PDF