केरळ दौर्‍यावर असतांना एक विधी करतांना गुरुदेवांनी दिलेल्या अनुभूती

श्री. वाल्मीक भुकन

१. नागराज मंदिरात विधी करण्यासाठी गेल्यावर तेथे पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवणे

‘आम्ही केरळ येथे गेलो होतो. तेथील एका ज्योतिषाने प.पू. गुरुदेवांना सर्पदोष निवारणासाठी एक विधी करायला सांगितला होता. ३०.३.२०१९ या दिवशी तो विधी अमेडा नागराज मंदिर, उदयमपेरू, केरळ येथे संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आला. आम्ही विधी करण्यासाठी ज्या मंदिरात गेलो होतो, त्या मंदिरात पुष्कळ चैतन्य आणि शक्ती जाणवत होती. तेथे बसून आम्हा सर्वांना पुढील मंत्रजप २ घंटे करायला सांगितला होता.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।
शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ॥ – नवनागस्तोत्र, श्‍लोक १

२. प.पू. गुरुदेवांना सतत प्रार्थना होणे आणि त्या वेळी मंत्रजप भावपूर्ण होऊन तो करतांना मन शांत अन् निर्विचार अवस्थेत असणे आणि तेव्हा प.पू. गुरुदेव शेष नागावर झोपलेले अन् बघून हसत असल्याचे दिसणे

हा मंत्रजप करतांना समोर नागयक्षी देवीची पूजा चालू होती. जप करतांना प.पू. गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती, ‘गुरुदेवा, हा मंत्रजप करण्याची माझी क्षमता नाही. तुम्हीच या देहाकडून हा जप करवून घेत आहात. तुम्हाला जसा अपेक्षित आहे, तसा तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या.’ त्यानंतर ‘मंत्रजप पुष्कळ भावपूर्ण होत आहे’, असे लक्षात आले. मनात इतर विचार नसून मन शांत आणि निर्विचार अवस्थेत होते. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेव शेष नागावर झोपले आहेत आणि ते माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे दिसले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘पुढे काय करायचे, हे तुम्हीच सुचवा; कारण इथे सर्व मल्ल्याळम् बोलणारे आहेत.’

३. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे नागयक्षीदेवीचे प्रत्यक्ष दर्शन होणे

मी नागयक्षी देवीची पूजा झाल्यावर तिचे आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभा होतो. तेव्हा मी प्रत्यक्ष ‘नागदेवीच्या समोर उभा आहे’, असे मला दिसले. माझ्या समोर पुष्कळ मोठा नाग फणा काढून उभा होता आणि मी नमस्कार मुद्रेत पूर्ण शरणागत भावात त्याच्या समोर उभा होतो. तेव्हा माझ्याकडून ‘गुरुदेवांचा सर्पदोष निघून जाऊ दे’, अशी प्रार्थना झाली. त्या वेळी माझ्या पुढे ज्यांनी पूजा केली, ते पुजारी उभे होते. त्यांनी माझ्या डोक्यावर त्यांचे दोन्ही हात नागाच्या फण्यासारखे धरले होते. त्या वेळी त्यांच्या हातामधून माझ्या संपूर्ण देहावर प्रकाश पडला. त्या वेळी ‘देवाने मला पुष्कळ शक्ती दिली आहे’, असे जाणवले. माझे दर्शन पुष्कळ भावपूर्ण झाले. त्या ठिकाणी मला प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे नागयक्षीदेवीचे प्रत्यक्ष दर्शन मिळाले.

४. पूजासामुग्री संपल्यावर ‘नागराज देवाला काय अर्पण करणार ?’, असा विचार मनात आल्यावर गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि गुरुदेवांनी सूक्ष्मातून सामुग्री अर्पण करण्यास सांगणे अन् तसे करतांना ती जड वाटणे आणि केल्यावर भावजागृती होऊन

‘आपण नागलोकात आहोत’, याची जाणीव होणे नंतर आम्हाला कळले, ‘बाजूला आणखी एक पूजा चालू आहे आणि तिथेही आम्हाला पूजा करायची आहे. अगोदर देवीची पूजा झाली आणि आता नागराज देवाची पूजा करायची होती. आम्ही घेतलेली सर्व पूजासामुग्री देवीला अर्पण केली होती. आता आमच्याकडे अर्पण करायला दक्षिणा सोडून काहीच नव्हते. विधीसाठी रांगेत उभे असतांना प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून झालेला सर्व प्रकार सांगितला. त्या वेळी त्यांनी सूक्ष्मातून सामुग्री अर्पण करण्यास सुचवले. मी नागराज देवाला प्रार्थना केली, ‘हे नागराजदेवा, आमच्याकडून चूक झाली. आमच्याकडे जे होते, ते आम्ही देवीला अर्पण केले, तरी आता तुला आम्ही सर्व सूक्ष्मातून अर्पण करत आहोत. त्याचा तू स्वीकार कर’, असे म्हणून मी वाहण्यासाठी हाताची ओंजळी केली, तर ती जड वाटू लागली. मी तशीच आेंजळ अर्पण केली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती. देवाने जे अर्पण करून घेतले, त्याची प्रत्यक्ष अनुभूती देवाने स्थुलातून दिली. हा विधी करतांना ‘आम्ही नागलोकात आहोत’, असे जाणवत होते. त्या ठिकाणी वाद्यांचा आवाज खूप अस्पष्ट होता, तरी त्याकडे लक्ष गेल्यावर ‘आपण कोणत्या तरी वेगळ्या लोकात आहोत’, असे जाणवायचे. हा विधी संपला, तेव्हाही मन निर्विचार अवस्थेत होते.

‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे मला हा विधी करण्याचे भाग्य मिळाले. प.पू. गुरुमाऊली, या विधीमुळे संपूर्ण मानवजातीला लाभ होणार आहे. हा विधी तुम्ही माझ्याकडून करवून घेतल्यामुळे माझ्यावर मोठी गुरुकृपा झाली आहे. प्रत्येक कृती करतांना मला तुमच्या अनुसंधानात रहाता येऊ द्या आणि तुम्हाला अपेक्षित अशी सेवा माझ्याकडून होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. वाल्मीक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF