लाथों के भूत बातों से नहीं मानते !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘खलनायक’ ठरवू पहाणार्‍या ‘एबीपी माझा’ला संघटित हिंदु जनतेने ‘क्रांती’द्वारे वठणीवर आणले, असे एखाद्याने म्हटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नसावे. अर्थात् ‘एबीपी माझा’सारख्या वाहिनीने हिंदूंची जाहीर क्षमा मागण्यामागे नेमके काय कारण होते आणि ते कसे फलद्रूप झाले, याचा वेध घेणारा ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांचा लेख साभार प्रसिद्ध करत आहोत.

१. सावरकर अवमानाच्या निमित्ताने… !

‘कालपरवा ‘एबीपी माझा’ वाहिनीने सावरकर अवमानाविषयी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या निवेदक प्रसन्ना जोशी आणि संपादक राजीव खांडेकर यांच्या हकालपट्टीची मागणीही काही लोकांनी लावून धरली आहे. असे काही झाले की, ‘आविष्कार स्वातंत्र्या’वर गदा आल्याचा गदारोळ आपल्याकडे नेहमी होत असतो; पण जगात असे प्रथमच घडलेले नाही. माध्यमे किंवा पत्रकारिता हा धंदा झाल्यापासून अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अशीच नाटकेही रंगलेली आहेत. अन्यथा कुबेरांनी अग्रलेख मागे घेऊन क्षमायाचना केली नसती की एबीपीने दिलगिरीचे नाटक रंगवले नसते; पण सुदैवाने त्यांच्या विरोधात ‘सोशल मीडिया’त छेडल्या गेलेल्या मोहिमेचा विशेष गाजावाजा झाला नाही. याचे खरे तर नवल वाटते. त्यामुळेच १०-१२ वर्षांपूर्वीचा असाच अमेरिकेतील एक प्रसंग आठवला. तेथेही असेच प्रकरण घडले आणि आविष्कार स्वातंत्र्याचा डंका पिटला गेला होता; पण आर्थिक नाड्या आवळल्या जाताच एकामागून एक स्वातंत्र्यसैनिक पत्रकारांनी शेपूट घातली होती.

श्री. भाऊ तोरसेकर

२. ‘एबीपी माझा’वर आलेला प्रसंग नवा नव्हे !

जॉन डोनाल्ड आयमस हे नाव आपल्यापैकी किती जणांनी ऐकले आहे ? त्याच्यावर अशीच पाळी आली होती; पण त्यात कोणी मोहीम चालवली नव्हती. तर ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनीच केवळ एक ठाम भूमिका घेतली आणि आयमससहित अमेरिकेतील एका मोठ्या माध्यम नेटवर्कला शेपूट घालण्याची वेळ आली होती. ४ दिवस स्वातंत्र्याचा चाललेला तमाशा २ घंट्यांत गुंडाळून सर्व स्वातंत्रसैनिक पळून गेले होते. स्वत: आयमसनेही शरणागती पत्करून संबंधितांची बिनशर्त क्षमा मागितली होती. बहुधा वर्ष २००७ च्या मध्याची घटना आहे आणि त्यानंतर लोकप्रिय समालोचक असूनही आयमसचे सर्व रेडिओ आणि नेटवर्क कार्यक्रम बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथे ‘एबीपी माझा’वर आलेला प्रसंग तसा नवा किंवा अपूर्व नक्कीच नाही.

३. अमेरिकेतील प्रसंगाशी साधर्म्य असणारा प्रसंग !

कुठल्याशा बास्केटबॉल स्पर्धेत एका विद्यापिठाच्या महिला संघाने अजिंक्यपद संपादन केले होते. त्या सामन्याचे समालोचन करतांना आयमसची जीभ घसरली होती. सदरहू महिला संघामध्ये बहुतांश कृष्णवर्णीय मुलींचा समावेश होता आणि त्यांच्या खेळाविषयी भाष्य करतांना आयमसने वांशिक हेटाळणी करणार्‍या शब्दांचा वापर केला होता. साहजिकच त्या मुली आणि एकूणच त्यांचे अनुयायी दुखावले गेले होते. सदरहू विद्यापीठ आणि त्यांच्या चहात्यांनी मग आयमसच्या विरोधात झोड उठवली आणि या वांशिक भेदभावावर जोरदार टीका चालू झाली; पण टीका करणारे पत्रकारही आयमसला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचा बचाव मांडत राहिले होते. त्याच्यावर कारवाई व्हावी किंवा त्याने बिनशर्त क्षमा मागावी, असे कोणी बोलायला सिद्ध नव्हता. एका बाजूला त्याचे शब्द आक्षेपार्ह ठरवूनही आविष्कार स्वातंत्र्याचा डंकाही पिटला जात होता. असे तब्बल २-३ दिवस उलटले आणि तोपर्यंत त्याचा कार्यक्रम प्रसारित करणार्‍या एकूण नेटवर्क कंपनीनेही त्याच्या अधिकाराचा बचाव मांडला होता. किमान ५०-६० रेडिओ स्टेशनवर त्याचा लोकप्रिय कार्यक्रम एकाच वेळी प्रसारित व्हायचा, इतका तो लोकप्रिय समालोचक होता. साहजिकच प्रक्षेपण करणारे नेटवर्क त्याला बाजूला करायला सिद्ध नव्हते. त्यामुळे मीडिया स्वत:च होऊन काही कारवाई करील, ही अपेक्षा फोल ठरली होती.

तेव्हा त्या अजिंक्यपद संपादन करणार्‍या महिला संघाच्या प्रशिक्षकाने पुढाकार घेऊन एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केवळ आपली भूमिका जाहीर केली. ‘आयमसचा निषेध म्हणून ‘आपण त्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार्‍या कुठल्याही नेटवर्कला विज्ञापने देणार्‍या आस्थापनांचे प्रायोजन घेणार नाही’, अशी ती भूमिका होती. ती भूमिका जाहीर झाली आणि अवघ्या दोन घंट्यांत चमत्कार घडायला आरंभ झाला होता. काय झाले असेल ?

त्या अजिंक्यपद संपादन करणार्‍या संघाला विराट कोहली अथवा भारतीय क्रिकेटसारखी लोकप्रियता लाभली होती आणि त्यांना आपापला ‘ब्रॅन्ड अंबॅसेडर’ बनवायला अनेक मोठी आस्थापने उत्सुक होती; पण त्यांनीच अशी अट घातल्यावर आस्थापनांची तारांबळ उडाली. तात्काळ अशा चार आस्थापनांनी आयमसचे प्रक्षेपण करणार्‍या नेटवर्कला आपण विज्ञापने मागे घेत असल्याचे कळवले. पुढील दोन घंट्यांत त्या नेटवर्कने आयमसचे सर्व कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी रहित केल्याची घोषणा करून टाकली होती. त्यानंतर विनाविलंब आयमसच्या आविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन नाचणार्‍यांची बोलती बंद झाली आणि एकामागून एक स्वातंत्र्यसैनिक गाशा गुंडाळून बिळामध्ये दडी मारून बसले. स्वत: आयमसने त्या संघातील मुलींची भेट घेऊन आपली बाजू मांडली आणि न्यूजर्सीच्या महिला गव्हर्नरने त्यासाठी मध्यस्थी केली होती.

४. ‘ग्राहका’चे प्रभावी हत्यार !

येथे सूत्र काय आहे ? तथाकथित आविष्कार स्वातंत्र्य आणि कोणालाही हिणवणे दुखावण्याचे स्वातंत्र्य खरे नाही किंवा अनिर्बंध नाही. त्याला कुठला कायदा रोखत नसला, तरी विज्ञापनदाता किंवा गुंतवणूकदार त्याच स्वातंत्र्याचा राजरोस गळा घोटू शकत असतो. ज्या मुलींचा ‘मॉडेल’ म्हणून त्या आस्थापनांना वापर करायचा होता, त्या आस्थापनांचा आवाज आणि अधिकार कायद्यापेक्षाही मोठा असतो अन् निर्णायक असतो. येथे एबीपी वाहिनीला सावरकर किंवा अन्य कोणाची महत्ता पटलेली नाही किंवा वाटली नाही. त्यांना ‘जाहिरातदार हे दैवत असते’ आणि ‘सगळ्या निष्ठा त्या गुंतवणूक आणि जाहिरात उत्पन्नात गुंतलेल्या असतात’. सगळी मस्ती जाहिरातीच्या उत्पन्नात असते आणि जाहिरातदारालाही वाकवू शकणारा एक प्रभावशाली वर्ग समाजात असतो; किंबहुना आजच्या बाजारू अर्थव्यवस्थेमध्ये अशा घटकाच्या हाती अधिक शक्ती एकवटलेली आहे. त्या वर्गाला किंवा घटकाला ‘ग्राहक’ म्हणतात. त्या ग्राहकाने हत्यार उपसले, मग कोणाची बिशाद नसते.

५. आविष्कार स्वातंत्र्याचा ढोंगधत्तुरा निकालात काढण्याचा उपाय !

आज सोशल मीडियातून ही मोहीम सावरकरप्रेमी लोकांनी चालवली, त्याचा दुहेरी परिणाम झाला. त्यापैकी अनेकांनी एबीपी वाहिनीलाच बहिष्कृत करून टाकले आणि मग त्याचा परिणाम जाहिरातींवरही झाला. १-२ जाहिरातदारांनी स्वेच्छेने त्यांना जाहिराती नाकारल्या असतील; पण लोकप्रियता कमी झाल्यावर इतर मालाच्या जाहिरातीही घटतात. त्यामुळेही नाड्या आवळल्या जातात. त्या जाहिरातदारांना बहिष्काराचे आवाहन करणे, ही त्या दुधारी हत्याराची एक बाजू आहे. त्यापेक्षाही अधिक भेदक अशी धार त्यांच्या मालाच्या खपावर विपरीत परिणाम होण्याचे असू शकते. आपल्या भावना दुखावणार्‍या गोष्टी अथवा चर्चा घडवणार्‍या माध्यमांना धडा शिकवण्याचा तो अधिक प्रभावी मार्ग असू शकतो. अमुक एक वाहिनी अथवा वर्तमानपत्र जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचे काम करत असेल, तर त्याच्या जाहिरातींमधील माल खरेदी करण्यावर बहिष्कार घातला जाणे अधिक प्रभावी असते. ही मोठी आस्थापने जो माल उत्पादित करतात, त्याच्या विभागवार खपावर त्यांची बारीक दृष्टी असते. त्यात कधी आणि कशामुळे घट झाली, त्याविषयी त्यांचे मार्केटिंग विभाग अतिशय संवेदनशील असतात. साहजिकच अशी मोहीम अमुक एका वाहिनीला अथवा वर्तमानपत्राला जाहिरात दिल्याने त्यांच्या मालाच्या विरोधात चालू झाली, तर तीच आस्थापने संबंधित वाहिनी अथवा वर्तमानपत्राला धडा शिकवू शकतात. केवळ त्या माध्यमात जाहिरात केल्याने खप होत नसेल, तर तात्काळ जाहिरातीचा हात आखडला जात असतो आणि आविष्कार स्वातंत्र्याचा ढोंगधत्तुरा निकालात निघत असतो. अमुक एक कार्यक्रम अथवा अमुक एका निवेदकाच्या कार्यक्रमाला जी जाहिरात आहे, त्याच मालावर बहिष्कार टाकला गेला; तर त्याचा तात्काळ परिणाम त्या २-४ दिवसांत मालाच्या खपावर होतो. मग मार्केटिंग विभागाची तारांबळ उडून जाते. म्हणून हे अतिशय धारदार शस्त्र आहे. ते यापूर्वी अनेकांनी उपसलेले आहे.

६. बाजारू अर्थव्यवस्थाच उपटसुंभांना शिस्त लावते !

काही वर्षांपूर्वी असाच प्रकार प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर उद्भवला होता. युरोपातील कुठल्यातरी देशात तशा व्यंगचित्राचे प्रकाशन झाले म्हणून हिंसाही झाली होती; पण त्या माध्यमांनी माघार घेतली नव्हती. शेवटी अरबी आणि मुसलमान देशांनी त्या देशांशी संबंधित असलेल्या विविध आस्थापनांच्या ग्राहक मालावर आपल्या देशात प्रतिबंध लागू केले होते. तेव्हा त्या तथाकथित लोकशाहीवादी युरोपीय देशांनी आपल्या देशातील त्या आविष्कार स्वातंत्र्यसैनिकांची गळचेपी करून प्रेषिताच्या व्यंगचित्रांचे प्रकाशन करण्याला प्रतिबंध लागू केला होता. इराकवर अमेरिकेने युद्ध लादले, तेव्हा भारतातील मुसलमान हॉटेल मालकांनी आपल्या दुकानात कोका-कोला किंवा पेप्सी विक्री करण्याला नकार दिलेला आठवतो कोणाला ? आज-काल ग्राहक हा सर्वांत मोठा झाला आहे, कारण जगाची अर्थव्यवस्थाच बाजारी झाली आहे. तेथे ग्राहक हाच ईश्‍वर मानला जातो. ‘सोशल मीडिया’ किंवा जागरूक असा मध्यमवर्ग हाच प्रामुख्याने भारतातील असा ग्राहक आहे. म्हणूनच त्याची क्रयशक्ती हे त्याच्या हातातील सर्वांत मोठे आणि भेदक हत्यार आहे. सूत्र इतकेच असते की, तुम्ही किती चतुराईने आपल्या हातातील साधने आणि हत्यारे वापरणार, यावर परिणाम मिळणे अवलंबून असते. एबीपीची क्षमा अथवा दिलगिरी ही त्याची किरकोळ चुणूक आहे. नुसत्या २-४ जाहिरातदारांनी पैसे नाकारले, म्हणून जे शरणागत होतात, त्यांच्या वाह्यातपणाला रोखणे कुठल्याही कायदा अथवा संघटनेपेक्षाही ग्राहकाला सोपे आहे. असल्या वाह्यात किंवा डिवचणार्‍या चर्चा किंवा तत्सम ‘पॅनेलिस्ट’ना आमंत्रित करणार्‍यांना सामान्य ग्राहक वेसण घालू शकतो. कारण जाहिरातीच्या हाती माध्यमांचा लगाम आहे आणि ग्राहकाच्या हाती आस्थापनांच्या नाड्या आलेल्या आहेत. जागरूक समाज त्या अमेरिकन कृष्णवर्णीय मुलींच्या संघासारखा असतो. ते केवळ भूमिका घेतात आणि मग बाजारू अर्थव्यवस्थाच उपटसुंभांना शिस्त लावत असते. त्यांच्या मुसक्या बांधायला बाजार समर्थ असतो. कारण लाथों के भूत बातों से कहां मानते हैं ?’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF