संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान

वैष्णवजनांच्या मेळ्याने अवघी अलंकापुरी गजबजली !

पाऊले चालती पंढरीची वाट…

श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे) – ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, असा भाव दाटून आलेला वैष्णवजनांचा मेळा आणि विठूरायाच्या स्मरणात देहभान हरपून ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषावर ताल धरणारे विठ्ठलभक्त, अशा भक्तीमय वातावरणात प्रतिवर्षीप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने २५ जूनला सायंकाळी प्रस्थान ठेवले. कपाळी केशरटिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात भगवी पताका घेतलेले वारकरी आणि डोक्यावर तुळशी-वृंदावन घेऊन मार्गक्रमण करणार्‍या महिला वारकरी लाखोंच्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. भागवत धर्माच्या पालखीचे भोई असणार्‍या वैष्णवजनांच्या मेळ्याने अवघी अलंकापुरी विठूनामाच्या गजरात निनादत असल्याचे चित्र होते. अनुमाने साडेचारशेहून अधिक दिंड्या या पालखीसोहळ्यात सहभागी झाल्या आहेत.

प्रस्थानाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत समाधी मंदिरात भाविकांनी महापूजा केल्या, तसेच वीणा मंडपात कीर्तन पार पडले. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत समाधी मंदिरात महानैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी २ वाजल्यानंतर रथाच्या पुढे आणि मागे असणार्‍या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. गुरु हैबतबाबांच्या वतीने आणि संस्थानच्या वतीने माऊलींच्या समाधीची आरती झाली. त्यानंतर माऊलींच्या पादुका प्रस्थानासाठी पालखीत स्थानापन्न करण्यात आल्या आणि ‘माऊली-माऊली’ असा जयघोष करत पालखीने वीणामंडपातून प्रस्थान ठेवले. पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी विसावली. अंकली (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून आळंदी येथे आलेले मोती आणि हिरा हे मानाचे अश्‍व पालखीसह असणार आहेत. २६ जून या दिवशी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन होईल.


Multi Language |Offline reading | PDF