डिचोली (गोवा) येथील सौ. साक्षी कवठणकर यांना धर्मशिक्षणवर्गात बोलण्यासंदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. साक्षी कवठणकर

१. धर्मशिक्षणवर्गात बोलण्याची भीती वाटत असतांना एक साधिका आणि यजमान यांनी प्रोत्साहन दिल्यावर वर्ग घेण्याची सिद्धता करणे अन् वर्गात बोलत असतांना ‘स्वतःच्या वाणीतून परात्पर गुरु डॉक्टरच बोलत आहेत’, असे वाटून भावजागृती होणे

‘५.५.२०१९ या दिवशी सकाळपासून ‘दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून माझी भावजागृती होत होती. संध्याकाळी मला अस्नोडा येथे धर्मशिक्षणवर्ग घेण्याची संधी मिळाली; पण मला सर्वांसमोर बोलण्याची भीती वाटत होती. त्यामुळे मला धर्मशिक्षणवर्ग घ्यायला जावेसे वाटत नव्हते. नंतर एका साधिकेने आणि माझ्या यजमानांनी मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर विषय थोडक्यात समजून घेऊन मी धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी गेले. वर्ग घ्यायला आरंभ केल्यावर ‘माझ्या वाणीतून परात्पर गुरु डॉ. आठवलेच बोलत आहेत’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. ते पाहून धर्मशिक्षणवर्गाला आलेल्या सर्वांचीच भावजागृती झाली. ही संधी परात्पर गुरुदेवांनीच मला दिली, यासाठी मी त्यांच्या चरणांशी कृतज्ञता व्यक्त करते.

२. धर्मशिक्षणवर्ग घेतल्याची कृती परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी रुजू झाल्याची पोचपावती प्रसाद मिळण्याच्या प्रसंगातून लक्षात येणे

दुसर्‍या दिवशी सकाळीच सौ. ममताताई मोरजकर हिचा दूरभाष आला आणि तिने ‘माझ्या स्वप्नात परात्पर गुरुदेव आले होते आणि त्यांनी तुला प्रसाद द्यायला सांगितला आहे’, असे म्हटल्यावर माझी भावजागृती होऊन भावाश्रू वाहू लागले. माझी लहानशी कृती परात्पर गुरुदेवांच्या चरणी पोचली आणि त्याची पोचपावती गुरुदेवांनी दिली. ‘या प्रसादाच्या संदेशातून परात्पर गुरुदेव आम्हाला काहीतरी शिकवत आहेत’, असे मला वाटले. ही अनुभूती गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. साक्षी कवठणकर, डिचोली, गोवा. (६.५.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF