साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. निशा गणेश मोरजका यांना आलेल्या अनुभूती

‘परिस्थिती प्रतिकूल असली, तरी साधनेत टप्प्याटप्प्याने कशी प्रगती करता येते’, हे सौ. निशा गणेश मोरजका यांनी लिहिलेल्या या लेखावरून लक्षात येईल. साधकांनी असे प्रयत्न अवश्य करावेत. ‘सौ. निशा यांची पुढील प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. नामस्मरणाचे महत्त्व समजल्यावर नामजप करायला लागल्यानंतर घरातील अडचणी दूर होणे

‘मागील ३ वर्षांपासून मी साप्ताहिक सनातन प्रभातची वाचक आहे. आरंभी मी अधूनमधून ‘साप्ताहिक आणि दैनिक सनातन प्रभात’ घेत असे. वर्गणीदार होण्यासाठी मला पैशांची पुष्कळ अडचण होती. यजमानांकडूनही पैसे मिळायचे नाहीत. मला नामस्मरणाचे महत्त्व समजल्यावर मी नामस्मरण करू लागले. घरात मुलगी सतत आजारी असल्यामुळे सतत आधुनिक वैद्यांकडे जावे लागायचे. मग मला साप्ताहिक सनातन प्रभातचे महत्त्व पटले. कापूर, अत्तर आणि उदबत्ती यांचे उपाय चालू केल्यावर मुलीचा ‘सायनस’चा आणि थंडीचा त्रास न्यून झाला. मुले शिकवणी न लावता परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यामुळे माझी सनातन संस्थेवरील श्रद्धा वाढली. मला शिवणकाम येत होते; परंतु मी कधी शिवणकाम केले नव्हते. नंतर देवाच्या कृपेने मला शिवणकाम करण्याचे सुचून त्यातून पैसे मिळू लागले. त्यामुळे मी साप्ताहिक सनातन प्रभातची वर्गणीदार झाले. मासिक अर्पणाचे महत्त्व पटले आणि मी जेवढे जमेल तेवढे अर्पण देऊ लागले. नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यजमान न मागता पैसे देऊ लागले.

२. अध्यात्मशास्त्रानुसार धार्मिक विधींचे महत्त्व समजल्यावर त्याप्रमाणे कृती केल्यावर आनंद मिळणे

मला ‘अध्यात्मशास्त्रानुसार वाढदिवस कसा साजरा करायचा ?’, हे समजले. तेव्हापासून मी मुलांच्या वाढदिवसाला पाहुण्यांना बोलावणे बंद केले आणि मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘दैनिक सनातन प्रभात’ प्रायोजित करू लागले. अधिकाधिक अर्पण करणे, विज्ञापन देणे, प्रत्येक सप्ताहाच्या ग्रंथप्रदर्शनावर साधकांना चहा आणि अल्पाहार देणे चालू केले. घरी येणार्‍यांना सनातननिर्मित उत्पादनांचे महत्त्व सांगून त्यांना उत्पादने देणे, हळदी-कुुंकवाला ग्रंथ आणि उत्पादने वाण देणे चालू केले. तेव्हा ‘देव माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जे मनात येते, ते सर्व देव देतो’, हे लक्षात आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कुटुंबावर कृपा आहे, याची पावलोपावली अनुभूती घेता येणेे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची माझ्या कुटुंबावर कृपा आहे, याची मला पावलोपावली अनुभूती येत आहे. यजमान आधी दारू प्यायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने त्यांचे व्यसन पुष्कळ अल्प झाले. मी शिकवणीवर्ग चालू केले आणि त्या मुलांना विशेषांक अन् उत्पादने देते. त्यांना नामस्मरण करायला सांगते. आता मी सत्संगाला आणि सेवेला जायला प्रारंभ केला आहे. सेवेतून मला पुष्कळ आनंद मिळतो. आता स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी समजले. ते अल्प करण्यासाठी मी प्रयत्न करते. आता मी ‘दैनिक सनातन प्रभात’ घेते. नियमितपणे दैनिक वाचून मला पुष्कळ आनंद होतो. प्रत्येक शंकेचे निरसन होतेे आणि मानसिक त्रास दूर होतो. मी सेवेला आणि सत्संगाला गेल्यावर मुले काहीच म्हणत नाहीत. हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेने मला साप्ताहिक सनातन प्रभातचे महत्त्व पटले आणि मी सनातनमध्ये आले.

४. कृतज्ञता

हे श्रीकृष्णा, तू मला वाचक बनवून आता साधनेकडे वळवत आहेस, याबद्दल मी तुझ्या चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार करते. देवा, परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही मला सतत तुमच्या चरणी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. निशा गणेश मोरजका

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF