द्वापरयुगातील भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगातील परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामध्ये साम्य दर्शवणारी सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘श्रीमन्नारायण या धरतीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने अवतरला आहे’, हे आता जीवनाडीपट्टीच्या वाचनानंतर सर्वांनाच कळले आहे. महर्षींच्या आज्ञेनुसार २९.५.२०१७ या दिवशी अमृत महोत्सवाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीकृष्णाचे वस्त्रालंकार धारण करून सर्वांना दर्शन दिले. त्या वेळी मला ‘आपण द्वापरयुगात आहोत’, असे वाटले आणि याच अनुसंधानात असतांना मला द्वापरयुगातील भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगातील परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामध्ये साम्य दर्शवणारी पुढील सूत्रे सुचली.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. स्थूल देहाची वैशिष्ट्ये

१ अ. चैतन्यामुळे अलंकारांची आवश्यकता नसणे : श्रीकृष्णाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अप्रतिम सौंदर्य असल्याने त्यांना खरेतर अलंकारांची आवश्यकताच नाही. ते त्यांच्यातील चैतन्यामुळे सुंदर दिसतात.

१ आ. सर्वांना आकर्षून घेणे : श्रीकृष्णाजवळ गोप-गोपींप्रमाणेच इतर सर्व पशू-पक्षी, नदी, वृक्ष इत्यादी चल-अचल आकर्षित होत असत. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांकडे केवळ साधक-साधिकाच नाही, तर अन्य पशू-पक्षी, फुलपाखरे, वृक्ष इत्यादी आकर्षित होत आहेत.

सौ. नीलिमा सप्तर्षी

२. स्थाननिर्मिती

२ अ. श्रीकृष्णाने जरासंधाच्या आक्रमणाचे निमित्त साधून भक्तांसाठी सागरकिनारी द्वारका निर्माण करणे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामनाथी येथे सर्व साधकांसह वास्तव्य केल्यावर तेथे द्वारकेसम पवित्र ‘सनातन आश्रम’ निर्माण होऊन पुढे त्याचे रूपांतर ‘रामनाथीनगरी’मध्ये होणार असणे : ‘श्रीविष्णूने श्रीकृष्णाचा अवतार धारण करून बाल्यावस्थेत गोवर्धनपूजेच्या माध्यमातून सर्वांना पर्वताचे महत्त्व सांगितले. पुढे किशोरावस्थेत श्रीकृष्णाने जरासंधाच्या आक्रमणाचे निमित्त साधून सागरकिनारी द्वारका निर्माण केली. तेव्हा तो भक्तांसमवेत मथुरा सोडून द्वारकेत आला.

कलियुगात श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉक्टरांचा अवतार धारण करून सह्याद्री पर्वत आणि सिंधुसागर (अरबी समुद्र) यांच्या मध्यभागी ‘रामनाथी’ येथे तीर्थक्षेत्र निर्माण केले आणि दोन्हीचे महत्त्व एकाच वेळी लक्षात आणून दिले. परात्पर गुरु डॉक्टर प्रथम रामनाथी (गोवा) येथे वास्तव्यास आले. नंतर त्यांच्याकडे चुंबकाप्रमाणेे सर्व साधक आकृष्ट झाले. ‘आजचा रामनाथी येथील ‘सनातन आश्रम’ हा पुढे द्वारकेसम पवित्र ‘रामनाथीनगरी’ होईल.

२ आ. द्वापरयुगात श्रीकृष्णाने इच्छा प्रदर्शित करताच विश्‍वकर्म्याने द्वारकानगरी निर्माण केली. युग पालटल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी निराळ्या मार्गाने आश्रमनिर्मिती केली आणि त्याचे व्यापकत्व वाढवले. ‘हा ‘सनातन आश्रम’ पुढे जगप्रसिद्ध विशाल तीर्थक्षेत्र होईल आणि हे ‘विश्‍वदीप’ नावाने विश्‍वात प्रसिद्ध होईल’, हे निश्‍चितच आहे.

२ इ. श्रीविष्णूच्या श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर या दोन्ही अवतारांतील वरील स्थाने सागर आणि पर्वत यांच्या मध्येच असून देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर आहेत. श्रीविष्णूचा निवास सागरात आहे ना; म्हणून कदाचित् भगवंताला सागराजवळच रहावेसे वाटत असावे.

३. कार्याची वैशिष्ट्ये

अ. श्रीकृष्णाने एकट्यानेच गोवर्धन उचलला आणि गोप-गोपींना आनंद मिळावा; म्हणून त्यांनी काठ्या लावल्या. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर यांचे ‘ईश्‍वरी राज्या’ची (हिंदु राष्ट्राची) स्थापना’ हे मोठे ध्येय आहे आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी ते त्यांना या कार्यात सहभागी करून घेत आहेत.

आ. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाला १४ विद्या आणि ६४ कला अवगत होत्या. कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांनी १४ विद्या अन् ६४ कला यांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती करून देण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. आता प्रत्येक कलेच्या अंतर्गत अनेक साधक प्राविण्य प्राप्त करून संतपदाकडे, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

इ. द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या अस्तित्वानेच सर्व कार्य होत असे, तसे आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाने इच्छित धर्मप्रसाराचे कार्य घडत आहे, तरीही त्याचे श्रेय ते संत आणि साधक यांना देतात.

४. धर्म-अधर्माचे युद्ध

अ. श्रीकृष्णाने हातांमध्ये शस्त्र धारण न करता अधर्मियांचा संहार केला. परात्पर गुरु डॉक्टरही सूक्ष्मातून कार्य करत आहेत. महाभारतातील युद्धात श्रीकृष्णाने कौरवांचा सूक्ष्मातून संहार केला आणि त्याचे श्रेय स्थुलातून पांडवांना दिले. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातील वाईट शक्तींचा त्रास दूर करतात आणि त्याचे श्रेय संत अन् साधक यांना देतात.

आ. धर्म-अधर्माच्या युद्धात ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने धर्माच्या पक्षातील पांडवांच्या माध्यमातून धर्मरक्षण केले, त्याप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टर हे संत आणि उन्नत साधक यांच्या माध्यमातून धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. ‘अष्टांग साधना’, हे या युगाचे शस्त्र असून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा मार्ग आहे.

इ. द्वापरयुगात कौरव-पांडवांचे युद्ध, म्हणजे धर्म-अधर्माचे युद्ध होते. तेव्हा श्रीकृष्णाच्या कृपेने धर्माचा, म्हणजे पांडवांचा विजय झाला आणि आताही तसेच होणार आहे. निश्‍चितच धर्माचा विजय होऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार आहे.

ई. श्रीविष्णु शेषशायी आहे. द्वापरयुगात शेषाने ‘बलरामा’च्या रूपात अवतार धारण केला आणि त्याने श्रीकृष्णाला धर्मसंस्थापनेच्या कार्यात साहाय्य केले. कलियुगात बलरामाप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज, कल्याण येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन, तसेच पुणे येथील प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी आणि प.पू. आबा उपाध्ये आदी संतांनी परात्पर गुरु डॉक्टरांना धर्मसंस्थापनेच्या कार्यात साहाय्य केले अन् आजही ते सर्वतोपरी साहाय्य करत आहेत.

उ. द्वापरयुगात युधिष्ठिर, अर्जुन, भीम, उद्धव, विदुर आदी व्यक्ती श्रीकृष्णाचे सखा, सहकारी किंवा भक्त होते. कलियुगात वरील संत-महात्मे, तसेच सनातनचे परात्पर गुरु, सद्गुरु, संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ हे परात्पर गुरु डॉक्टरांचे धर्मरक्षणाच्या कार्यातील सखा, सहकारी किंवा भक्त आहेत.

५. ग्रंथनिर्मिती

द्वापरयुगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या ज्ञानावर आधारित श्रीमद्भगवद्गीता, महाभारत इत्यादी ग्रंथ निर्माण करण्यात आले, तर सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मशास्त्र, विविध योगमार्ग, विविध कला आदी विषयांवर विविध भाषांमध्ये अनेक ग्रंथ प्रकाशित होत आहेत आणि त्या ग्रंथांना जगभरातून प्रसिद्धी मिळत आहे.

६. श्रीमन्नारायणाच्या अवतारांची महानता !

श्रीमन्नारायणाचे अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे गुण अन् कार्य यांचे लेखन करण्यासाठी आकाशाएवढा कागद आणि समुद्राएवढी शाईसुद्धा अपुरी पडेल. त्यांचे कार्य लिहिण्यास शब्दही अपुरे पडत आहेत.

त्यांनी वरील सूत्रे अंतःस्फूर्तीने जशी सुचवली, तशी लिहिली. ही सूत्रे त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. त्यांच्या चरणी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. नीलिमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   


Multi Language |Offline reading | PDF