‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा विचार सर्वांमध्ये रुजवायचा आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

‘सोशल मीडिया राष्ट्रीय शिबिरा’ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता

सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक धर्माभिमान्यांना जोडून व्यापक धर्मप्रसार करण्याचा शिबिरार्थींचा निश्‍चय

डावीकडून श्री. गीरीजय प्रभुदेसाई, श्री. संदीप शिंदे, मार्गदर्शन करतांना सद्गुरू नंदकुमार जाधव आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – आपल्याला ‘सोशल मीडिया’च्या (सामाजिक प्रसारमाध्यमांच्या) माध्यमातून धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांचा प्रसार करायचा आहे, तसेच हिंदु राष्ट्राचा विचार सर्वांमध्ये रुजवायचा आहे. या शिबिरामध्ये आपल्याला जी ऊर्जा आणि आनंद मिळाला आहे, त्याचा धर्मप्रसारासाठी वापर करायचा आहे, तसेच अन्य धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाही सोशल मीडियाच्या दृष्टीने सिद्ध करायचे आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे २२ ते २४ जून या कालावधीत ‘सोशल मीडिया राष्ट्रीय शिबिर’ पार पडले. २४ जूनला या शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. या वेळी ते बोलत होते.

देशातील विविध राज्यांतून १०० हून अधिक ‘सोशल मीडिया सेवक’ या शिबिरात सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक धर्माभिमान्यांना जोडून व्यापक धर्मप्रसार करण्याचा निश्‍चय केला. या शिबिराला सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. अशोक पात्रीकर, पू. (सौ.) संगीता जाधव, सोशल मीडिया समन्वयक श्री. गिरीजय प्रभुदेसाई, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, तसेच सनातन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्री. संदीप शिंदे उपस्थित होते.

या शिबिरामध्ये ‘आदर्श सोशल मीडिया सेवक कसे बनायचे ?’, तसेच ‘धर्मप्रसारासाठी सोशल मीडियाचा परिणामकारक उपयोग कसा करायचा ?’ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन कु. आदिती सुखटणकर यांनी केले.

उपस्थित शिबिरार्थींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सेवा करतांना त्यांना येणार्‍या अडचणी मांडल्या. त्यावर पू. (सौ.) संगीता जाधव यांनी आध्यात्मिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला धर्मजागृती करायची आहे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

संगणकीय प्रणालीद्वारे शिबिरार्थींशी संवाद साधतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर या माध्यमांतून धर्मप्रसार कसा करायचा ?’ याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात सोशल मीडिया हे धर्मकार्य करायचे एक चांगले माध्यम आहे. या माध्यमातून आपल्याला हिंदूंचे व्यापक संघटन करायचे आहे. सध्या समाजात सोशल मीडियाचा अपवापर केला जातो; मात्र आपल्याला या माध्यमातून धर्मजागृती करायची आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF