रुग्णाइत असतांना साधिकेने अनुभवलेली सद्गुरु आणि संत यांची प्रीती !

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

गुरुपौर्णिमा २०१९

‘३१.१०.२०१८ ते ९.१.२०१९ या कालावधीत मला पाठ आणि उजवा पाय यांमध्ये वेदना होत असल्यामुळे मी आजारी होते. त्या काळात मी रामनाथी आश्रमात होते. संतांच्या कृपेमुळेच आज मी चालू शकत आहे.

सौ. क्षिप्रा जुवेकर

१. अंतर्यामी आणि देवीतत्त्व जागृत असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

१ अ. ‘प्रकृतीविषयी आधुनिक वैद्यांचा सल्ला घेऊनच जळगाव येथे जायचे कि नाही ते ठरव’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे : आरंभी मी गोवा येथे ७ दिवस वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आले होते. हे उपचार झाल्यावर मला परत जळगावला जायचे होते. त्यादृष्टीने माझ्या मनात ‘परतीचे तिकीट केव्हाचे काढायचे , साहित्याची आवराआवर करायची आहे, असे विचार येत होते. याच वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘तुझ्या प्रकृतीविषयी आधुनिक वैद्यांचा सल्ला घे आणि नंतरच तू जळगावला जायचे कि नाही ते ठरव.’’ सामान्य बुद्धीने विचार केल्यास हे उत्तर आश्‍चर्यजनक होते.

१ आ. संपूर्ण विश्रांती घ्यावी लागणे : त्यांनी सांगितल्यानंतर माझे जळगाव येथे जाण्याचे विचार कमी झाले. त्यानंतर ७ दिवसांत मला संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली होती. सद्गुरु बिंदाताईंनी ‘माझी स्थिती गंभीर होणार आहे’, हे जणू आधीच जाणले होते. त्यांचे द्रष्टेपण आणि देवत्व यांची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे.

१ इ. ‘खोलीत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ समवेत आहेत’, असे जाणवणे : मी खोलीत झोपून असतांना ‘सद्गुरु बिंदाताई माझ्या समवेत आहेत’, असे जाणवून मला वेदनांची जाणीव होत नसे. त्या वेळी ‘सद्गुरु बिंदाताईंना स्थुलातून काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या अंतर्यामी आहेत’, असे वाटायचे.

१ ई. लहानपणी देवीच्या चित्राकडे पाहून ‘तुझे दर्शन घ्यायचे आहे’, असे सांगणे : माझ्या लहानपणी आमच्या जुन्या घराच्या भिंतीवर देवीचे चित्र लावले होते. लहानपणी मी देवीला सांगत असे, ‘मी मोठी झाल्यावर तुला भेटायला येईन. तूच मला तुझ्याकडे घेऊन चल. मला तुझे दर्शन घ्यायचे आहे.’

१ उ. यज्ञाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी देवीचे दर्शन होणे : मी रुग्णाइत असतांना रामनाथी आश्रमात होत असलेल्या विविध यज्ञांच्या वेळी मला यज्ञस्थळी उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. एका यज्ञाच्या वेळी मला सद्गुरु बिंदाताईंच्या ठिकाणी देवीचे दर्शन झाले. तेव्हा देवीने मला सांगितले, ‘तुला माझे दर्शन घ्यायचे होते ना ? मी इथे आहे.’

२. ‘आवरण आले आहे’, असे स्वतःहून सांगून ते दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगणारे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ !

मी रुग्णाइत होण्यापूर्वी पू. गाडगीळकाकांनी मला पाहून सांगितले होतेे, ‘तुमच्यावर पुष्कळ आवरण आले आहे.’ त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने मला लाभ झाला. त्यांनी पुढेही ‘कोणते उपाय करायचे ?’, ते सांगितले.

३. तीव्र शारीरिक त्रास असूनही साधकांना प्रेरणा देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

३ अ. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही आनंदी असणे : सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना तीव्र शारीरिक त्रास आहे. ते एवढ्या त्रासातही आनंदी असतात. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळत होती.

३ आ. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या देहातून प्रकाश बाहेर पडत आहे आणि वातावरणात आनंद प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : मी त्यांना प्रथम सूक्ष्मातून भेटले होते. ईश्‍वराच्या कृपेमुळे मला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. एकदा त्यांना समोर पहाताच मला बोलण्यासाठी शब्दच सुचत नव्हते. ते प्रकाशाची मूर्ती असल्यासारखे दिसत होते. ‘त्यांच्या देहातून प्रकाश बाहेर पडत आहे आणि वातावरणात आनंद प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

३ इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार नामजपादी उपाय केल्यावर वेदनेची तीव्रता न्यून होणे : त्यांनी सांगितल्यानुसार नामजपादी उपाय केल्याने मला होणार्‍या वेदनेची तीव्रता न्यून झाली. ‘माझा उजवा पाय त्रासदायक शक्तीने भारित झाला आहे आणि त्यामुळे मला त्रास होत आहे’, हे त्यांनी सूक्ष्मातून जाणले. त्यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे माझ्या स्थितीत सुधारणा होत गेली.

४. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेले मंत्रजप म्हटल्याने शारीरिक स्थितीत सुधारणा होऊन शांती अनुभवणे

माझी ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी केल्यावर त्याचा अहवाल सर्वसाधारण (नॉर्मल) आला. तेव्हा आधुनिक वैद्य मराठे यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला वैद्यकीयदृष्ट्या काहीच झालेलेे नाही. तुम्ही आता मंत्रउपाय चालू करा.’’ त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्र मी म्हणू लागले. मंत्र म्हणतांना ‘त्रासदायक शक्ती उजव्या पायात कशा प्रकारे फिरत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत असे. तसेच ‘शरिराच्या अन्य अवयवांत चांगली शक्ती कशी फिरत आहे’, हेही मला प्रथमच अनुभवता आले. मंत्रजपानेच माझ्या स्थितीत सुधारणा होत गेली आणि माझ्यावर पुढील उपचार होऊ शकले. मंत्रजप म्हटल्यानेच मी शांती अनुभवू शकत होते. मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचेे अफाट सामर्थ्य अनुभवता आले. मी त्यांच्या कोमल चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

५. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची प्रीती

५ अ. खोलीत भेटायला येणे : प.पू. दास महाराज यांना ‘मी रुग्णाइत आहे’, हे समजल्यावर ते मला खोलीत भेटायला आले. वर्ष २००३ मध्ये ते अयोध्या येथे आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांना भेटण्यापूर्वी माझ्या मनात साधनेच्या संदर्भात काही प्रश्‍न होते. ते घरी आल्यावर मी त्यांना काही न सांगताच त्यांनी माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्यांच्यामुळे मी साधना करू लागले.

५ आ. प.पू. दास महाराज यांनी विभूती आणि प्रसाद देणे : त्यानंतर माझी त्यांच्याशी १ – २ वेळाच भेट झाली. मला वाटले, ‘आता ते मला ओळखत नसतील.’ ते खोलीत आल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘मला सर्व आठवते.’’ त्या वेळी मला कृतज्ञता वाटली. प.पू. दास महाराज यांनी मला विभूती आणि प्रसाद दिला. त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी ठीक होऊ शकले.

५ इ. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्यामुळे सकारात्मक रहाता येणे : पू. (सौ.) माई मला चैतन्य देण्यासाठी खोलीत भेटायला येत होत्या. त्यांच्याही सर्व स्मरणात होते. त्यांच्या प्रीतीमुळे मी सकारात्मक राहू शकले.

६. पू. पृथ्वीराज हजारे यांच्या दर्शनाने चैतन्य मिळणे

पू. पृथ्वीराज हजारे यांच्या दर्शनाने मला आपोआप चैतन्य मिळत होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे माझे मन सकारात्मक झाले. त्यांनी आठवणीने मला ‘पाठदुखी’ या विषयावरची चलत्चित्रे (व्हिडिओ) पाठवली आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना केली.

७. पू. (कु.) रेखा काणकोणकर यांनी खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ देणे

पू. (कु.) रेखाताई अन्नपूर्णादेवी आहेत. माझी त्यांच्याशी फार वेळा भेट झाली नाही. त्या मला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी देत होत्या.

८. पू. सौरभ जोशी यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे आनंदी होणे

मी रुग्णाइत असतांना कधी कधी मला पू. सौरभ जोशी यांचे स्मरण होत असे. ते अत्यंत तेजस्वी दिसायचे. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे मी आनंदी होत असे. ‘मी त्यांच्याशी सूक्ष्मातून जोडले गेले आहे’, असे मला वाटायचे.

९. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितल्यावर चालू शकणे

माझा सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क होत असे. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘तू ५ दिवसांनंतर चालू शकशील.’’ त्यानंतर खरोखरच पाचव्या दिवशी मी ‘वॉकर’च्या साहाय्याने चालू लागले. या तीव्र त्रासातही सद्गुरु जाधवकाकांच्या आशीर्वादानेच मी एवढ्या लवकर ठीक होऊ शकले.

१०. सहजतेने जवळीक साधणार्‍या सौ. योया वाले !

सौ. योया वाले मला मधूनमधून खोलीत भेटायला येत असत. मला त्यांचे चैतन्य मिळत होते. योयाताई साधकांशी सहजतेने जवळीक साधत असल्याने मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत होते. त्यांच्या दर्शनाने मला आनंद होत असे.

११. प्रार्थना

‘गुरुदेवा, सर्वांच्या विषयी लिहिण्याची माझी पात्रता नाही. आमच्याकडून होणारे प्रयत्न आणि सेवा केवळ आपल्या आणि सद्गुरु अन् संत यांच्या कृपेमुळेच होत आहे. प्रभु, ‘कर्तेपणा घेणे’ हा केवळ अहंचा पैलू नसून ‘ते महापाप आहे’, असे मला वाटते. आपणच सर्व करत आहात, तरीही आम्ही कर्तेपणा घेतो. गुरुदेवा, यासाठी क्षमा करावी. या कर्तेपणाच्या असुरापासून माझे रक्षण करा. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट करा. हे प्रभु, मला आपल्या चरणी समर्पित करवून घ्या.

हे गुरुदेवा, माझी कसलीही पात्रता नाही. मी अनंत अपराधी असूनही तू मला दर्शन दिलेस. आता मला काही नको. मला केवळ आपले चरण, ध्येय आणि हिंदु राष्ट्र यांच्याशी एकरूप होता येऊ दे. हे गुरुदेवा, मी आपल्याला काही देऊ शकेन, अशी माझी पात्रता नाही. मी आपल्याकडे एकच मागणे मागते, ‘आपणच मला पुनर्जन्म दिला आहे. हा देह आपल्या चरणी समर्पित व्हावा.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (७.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF