जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

श्रीक्षेत्र देहू (जिल्हा पुणे) – मनामध्ये पांडुरंगाच्या भेटीची आस, मुखी ज्ञानोबा-तुकोबा यांचा जयघोष, हातात भगवी पताका आणि टाळ-मृदुंगांचा ठेका अशा भक्तीमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २४ जून या दिवशी देऊळवाड्यातून प्रस्थान झाले. या वेळी अवघी देहूनगरी भक्तीरसामध्ये न्हाऊन निघाली. या वेळी वरुणराजानेही उपस्थिती लावून पालखीचे स्वागत केले.

२४ जूनला पहाटे ५ च्या सुमारास पालखी सोहळ्याचे प्रमुख, अध्यक्ष आणि विश्‍वस्त यांच्या हस्ते श्रींची, तसेच शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा आणि इनामदार वाड्यात श्री संत तुकोबांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर २४ जूनला देहूतील इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम झाला. २५ जूनला सकाळी पालखी पुढच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून हाती भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ४ लाखांहून अधिक वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

‘संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राचे ‘पंढरपूरची वारी’ हे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. ह.भ.प. हैबत बाबांनी चालू केलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३४ वे वर्ष असून ३२३ दिंड्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे’, असे पालखीप्रमुख संजय महाराज मोरे यांनी सांगितले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आज आळंदीहून प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २५ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान होणार आहे. विठ्ठलभक्त वारकर्‍यांच्या आगमनाने अवघी अलंकारपुरी (आळंदी) गजबजली असून पांडुरंगाच्या भेटीची ओढ निर्माण झालेले वारकरी भक्तीरंगात रंगून गेल्याचे चित्र आहे.

मानाच्या अश्‍वांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

कर्नाटकातील बेळगावमधील अंकली येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीमंत शितोळे सरकारचे मानाचे दोन अश्‍व २३ जूनला पुण्यात आले. गेल्या २ वर्षांप्रमाणे याही वर्षी अश्‍वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सभागृहात प्रवेश करून दर्शन घेतले. या वेळी अश्‍वांचे पूजन करण्यात आले, तसेच दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने चांदीच्या हारांचे पूजन करून ते हार अश्‍वांना प्रदान करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF