काँग्रेस शासनाच्या काळात कर्जमाफीच्या नावाखाली १५८ कोटी रुपयांचे अपात्र व्यक्तींना वाटप

मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांचा गंभीर आरोप

  • काँग्रेस शासनाच्या काळात अपात्र व्यक्तींना झालेल्या रकमेच्या वाटपाचे सखोल अन्वेषण करून भ्रष्टाचार करणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा !

मुंबई, २३ जून (वार्ता.) – काँग्रेस शासनाच्या काळात कर्जमाफीच्या नावाखाली १५८ कोटी रुपये इतकी रक्कम अपात्र व्यक्तींना वाटप करण्यात आली, असा गंभीर आरोप सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २१ जून या दिवशी विधान परिषदेत केला. शासनाने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्यापही त्याचा लाभ झालेला नाही. याविषयीचा तारांकित प्रश्‍न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर सहकारमंत्री देशमुख यांनी उत्तर दिले. पुन्हा असा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत, असेही या वेळी मंत्रीमहोदयांनी म्हटले.

याविषयी अधिक माहिती देतांना मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, कर्जमाफी घोषित करतांना राज्य सरकारने काही निकष केले होते. त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली. आतापर्यंत १९ सहस्र कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. जे शेतकरी अद्यापही वंचित आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी साहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून याविषयीची माहिती घेण्यात येईल. यासाठी अधिकोषाचे अधिकारी आणि शेतकरी यांची बैठक घेण्यात येईल. काही शेतकर्‍यांना अपात्र घोषित केल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकला नाही; मात्र शेवटच्या लाभार्थी शेतकर्‍याला कर्जमाफी मिळेपर्यंत छत्रपती शेतकरी सन्मान योजना चालूच राहील.


Multi Language |Offline reading | PDF