‘सेक्युलर मीडिया’ला क्षमा मागायला लावून हिंदूंनी शक्ती दाखवून दिली ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती

एकजुटीने लढा देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या ‘एबीपी माझा’ला क्षमा मागायला भाग पाडल्यानंतर सावरकरप्रेमींचा विजयी मेळावा

विजयी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना श्री. रणजीत सावरकर

मुंबई, २३ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात देशभक्ती रुजवली. हीच देशभक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात उफाळून आली. ही हिंदूंची शक्ती आहे. जांबुवंताला हनुमंताच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागली. तशी हिंदु समाजाची शक्ती जागृत करायला हवी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात आर्थिक आंदोलन करून त्यांना क्षमा मागायला लावून हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवून दिली, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी केले.

या वेळी श्री. सावरकर पुढे म्हणाले की, प्रत्येक देशातील बहुसंख्य समाज तेथील राष्ट्रीयत्व ठरवतो. भारतात हा अधिकार हिंदूंचा आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात हिंदू एकत्र आले. छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करून मारल्यानंतर अशी एकजूट दाखवून हिंदूंनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले. हिंदू कधी आक्रमक होत नाही; मात्र स्वत:च्या अधिकारासाठी हिंदू जागृत झाले, तर ‘सेक्युलर मीडिया’ हिंदूंना आक्रमक ठरवतो. या आंदोलनात ‘एबीपी माझा’वर आर्थिक बहिष्कार टाकून आर्थिक आंदोलनाची शक्ती दाखवून दिली.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर : नायक कि खलनायक ?’, असा कार्यक्रम दाखवून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या नेतृत्वाखाली लढा देऊन समस्त सावरकरप्रेमी यांनी ‘एबीपी माझा’ला क्षमा मागायला भाग पाडले. ‘एबीपी माझा’ने मागितलेल्या क्षमेनंतर सावरकरप्रेमी यांनी २३ जून या दिवशी घोषित केलेल्या मोर्च्याचे रूपांतर विजयी मेळाव्यात केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये हा विजयी सोहळा पार पडला.

या मेळाव्याला शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे, माजी खासदार श्री. भरतकुमार राऊत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण मोडक, कोषाध्यक्ष सौ. मंजिरी मराठे, शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार, सरसेनापती दाभाडे यांचे १४ वे वंशज सत्यशीलराजे दाभाडे, भाजपच्या प्रवक्त्या श्‍वेता परुळकर, येसाजी कंक यांचे १४ वे वंशज श्री. सिद्धार्थराजे कंक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमावर यशस्वी लढ्याचे दायित्व पहाणारे श्री. समीर गुरव, मुंबई डबेवाला संघाचे प्रवक्ते श्री. विष्णु काळढोकेे यांसह बहुसंख्य सावरकरप्रेमी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारी वृत्ती संपत नाही, तोपर्यंत लढा थांबवू नका ! – खासदार राहुल शेवाळे, शिवसेना

राष्ट्रप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा सन्मान न करण्याच्या प्रवृत्तीला नमवले आहे. ही लढाई संपलेली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारी वृत्ती संपत नाही, तोपर्यंत हा लढा थांबवू नका.

राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती केल्यास अद्दल घडवू ! – सुनील पवार, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगड

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आजही जिवंत आहेत. शिवरायांनी मोगलांना खणून काढले. ज्यांनी देशासाठी कालकोठडी भोगली, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍या वृत्तवाहिन्यांवर बंदी घालायला हवी. राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती केल्यास त्यांना अद्दल घडवू.

या वेळी भाजपच्या प्रवक्त्या श्‍वेता परुळकर यांनी ‘राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्‍यांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने उभे रहायला हवे’, असे आवाहन केले. हिंदु महासभेचे बार्शीचे जिल्हाध्यक्ष अनिल पवार यांनी रणजीत सावरकर यांचा शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने झाली.

आर्थिक बहिष्कार टाकून काश्मीरमधील आतंकवाद मोडता येईल !

हिंदूंची अपकीर्ती करणार्‍या ‘सेक्युलर मीडिया’च्या विरोधात आर्थिक बहिष्काराचे तंत्र उपयोगात आणायला हवे. जम्मू-काश्मीरमधील ३५ (अ) कलम काढून आतंकवाद मोडून काढण्यासाठी ‘काश्मीर खोर्‍याचा बहिष्कार आणि जम्मू यांचा पुरस्कार’, असे आर्थिक आंदोलन करायला हवे. त्याचप्रमाणे अमरनाथ यात्रेवरील आक्रमण रोखण्यासाठी केवळ प्रातिनिधीक स्वरूपात हिंदूंनी जाऊन अन्य हिंदूंनी तेथे ५ वर्षे न गेल्यास आर्थिक बहिष्काराने तेथील आतंकवाद मोडता येईल, असे प्रतिपादन श्री. रणजीत सावरकर यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF