सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसाराची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी देवाने सुचवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असणार्‍या ‘सोशल मीडिया राष्ट्रीय शिबिरा’च्या निमित्ताने…

‘कोणतीही सेवा करतांना ‘ती भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करायची ?’, याचा आदर्श कु. रजनीगंधा कुर्‍हे हिने या लेखाद्वारे सर्वांपुढे ठेवला आहे. लेखाप्रमाणे प्रयत्न केल्यामुळे कु. रजनीगंधा जशी प्रगती करत आहे, तशी प्रगती होण्यासाठी सर्वांना साहाय्य होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘संकेतस्थळांच्या अंतर्गत इमेल, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, ‘ट्विटर’ यांसाठी कलाकृती बनवण्याच्या प्रसारसेवेद्वारे देवाने विविध भावप्रयोग शिकवले. त्याद्बारे सोशल मीडियाची सेवा साधनेच्या स्तरावर कशा प्रकारे करू शकतो, हे शिकता आले. त्याद्वारे हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना बाहेर होण्यासमवेतच आपल्या अंत:करणातसुद्धा कशी होऊ शकेल, यासंदर्भात देवाने सुचवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

१. मानसपूजा, काही भावप्रयोग आणि आलेल्या अनुभूती

१ अ. फेसबूक सेवा करतांना केलेली मानसपूजा : फेसबूक सेवा आरंभ करण्यापूर्वी देवाला आर्ततेने प्रार्थना करून पुढील मानसपूजा देवाचरणी अर्पण केल्यावर या सेवेतून मनाची बहिर्मुखता न्यून होऊन साधनेच्या स्तरावर मनाची प्रक्रिया होऊ लागली.

देवाने अत्यंत व्यापक अशा धर्मप्रसाराच्या सेवेची संधी दिली आहे. त्यामुळे मनात प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला आहे. संस्था स्तरावरील प्रत्येक फेसबूक पानावर गुरुदेवांचे चरण विराजमान झाले आहेत. त्यांच्या चरणांतून प्रखर क्षात्रतेज, ब्राह्मतेज आणि निर्गुण चैतन्य प्रत्येक पोस्ट अन् त्यांमधील अक्षरे यांमधून सर्वत्र प्रक्षेपित होत आहे. त्यामुळे जगभरातील फेसबूकवर मोठ्या वाईट शक्तींनी आणलेली मायावी आवरण दूर होऊन संपूर्ण फेसबूकची शुद्धी होत आहे. संस्था स्तरावरील सर्व फेसबूकची पाने आणि साधकांचे फेसबूक अकाउंट्स यांची शुद्धी झाली आहे. फेसबूकवर ‘पोस्ट शेअर’ आणि ‘अपलोड’ करतांना मनात ‘कृष्ण, कृष्ण’ असा जप आपोआप चालू झाला आहे. श्रीकृष्ण माझ्याकडून आवश्यक तेवढ्या वेळेतच आवश्यक त्या लिखाणाचा प्रसार करून माझा साधनेचा वेळ वाचवत आहे. ‘पोस्ट’च्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या नामातील चैतन्य दूरवर पसरत आहे. श्रीकृष्णच आवश्यक तो प्रत्येक वाचक, जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ यांच्यापर्यंत ती ‘पोस्ट’ स्वत:च प्रसारित करून त्यांना धर्मशिक्षण, धर्मरक्षण आणि धर्मज्ञान यांद्वारे चैतन्य देत आहे. अशा प्रकारे कृष्णाने मला त्याच्या धर्मजागृतीच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली; म्हणून कृतज्ञता व्यक्त करून ‘हा भाव मनात सातत्याने टिकून ठेवता येऊ दे’, अशी प्रार्थना करते आणि मी भावस्थितीत राहून या सेवेला आरंभ करते.

कु. रजनीगंधा कुर्हे

१ आ. फेसबूकसाठी कलाकृती बनवतांना श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर त्याचे साहाय्य मिळून सेवा चांगली आणि अल्प वेळेत पूर्ण होणे : पूर्वी ‘फोटोशॉप’ प्रणालीतून कलाकृती सिद्ध करतांना मला पुष्कळ कंटाळा यायचा. त्याचे कारण लक्षात घेतल्यावर त्यामागे माझ्यातील आळस, स्वेच्छेने व्हावेसे वाटणे आणि ‘मला कळते’, हे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांमुळे ‘ही सेवा मला नको वाटत आहे’, हे लक्षात आले. तेव्हा देवाकरता हे स्वभावदोष आणि अहंचे पैलू घालवायचे मनाशी ठरवल्यावर श्रीकृष्णाचे साहाय्य घेऊन कलाकृती बनवण्यास आरंभ केला. त्या वेळी पोस्टसाठी चित्रे शोधतांना ‘अधिक वेळ जायला नको’; म्हणून कृष्णाला ‘कुठले अक्षर गुगलवर घातले, तर संबंधित चित्र लवकर मिळेल ?’, असे विचारल्यावर किबोर्डवर हात फिरायचे, मनात अकस्मात शब्द सुचायचे आणि हवी ती चित्रे अल्प वेळेत मिळायची.

१ इ. कुठले सिद्ध चित्र वापरले, तर अल्प वेळेत कलाकृती सिद्ध होऊ शकते, असा विचार येताच ‘संबंधित चित्र कुठे मिळेल ?’, हे डोळ्यांसमोर दिसणे : ‘फोटोशॉप’ प्रणालीतून चित्रे आरंभीपासून सिद्ध करण्याऐवजी कुठले सिद्ध चित्र वापरले, तर अल्प वेळेत ती कलाकृती सिद्ध होऊ शकते, असा विचार येताच ‘संबंधित चित्र कुठे मिळेल ?’, हे डोळ्यांसमोर दिसायचे. त्यामुळे अल्प कालावधीच ही सेवा पूर्ण होण्यास साहाय्य झाले. चित्र पडताळून घेतांना ‘आता यात पुन्हा सुधारणा यायला नको’, असा विचार मनात असतांना संबंधित २ – ३ साधक त्यात पुष्कळ सुधारणा सांगायचे. तेव्हा ‘सुधारणा कितीही येवोत; मात्र देवाला आवडेल, अशी कलाकृती सिद्ध व्हायला हवी’, असा विचार प्रबळ असला की, थोड्याच सुधारणा असायच्या.

१ ई. ‘पोस्ट’ सिद्ध झाल्यावर ती ‘अपलोडिंग’साठी देण्यापूर्वी देवाला प्रार्थना केल्याने कर्तेपणा अल्प होणे : ‘पोस्ट’ सिद्ध झाल्यावर ती ‘अपलोडिंग’साठी देण्यापूर्वी देवाला ‘त्यातील मीपणा, कर्तेपणा आणि अहं यांची सर्व स्पंदने नष्ट होऊ दे’, अशी प्रार्थना करून ‘ही ‘पोस्ट’ एक फूल बनून गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे’, असा भाव ठेवून पुढे देत असे. यातून ‘मी ‘पोस्ट’ बनवली’, ही कर्तेपणाची जाणीव अल्प होण्यास साहाय्य झाले.

१ उ. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची पीपीटी (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) बनवण्याची सेवा शरणागत भावाने केल्यावर ती वेळेत पूर्ण होणे : नंतर पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची पीपीटी (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) बनवण्याच्या सेवेची संधी मिळाली. तेव्हा वेळ अत्यल्प होता आणि सगळे विषय पूर्ण करण्यासाठी केवळ श्री. करंदीकरकाका आणि मी दोघेच होतो. त्या वेळी शरणागत भावाने सेवा केल्यावर सेवा वेळेत झाली. यावरून ‘देवाने सेवेत आवड-नावड न ठेवता त्यात अडथळा ठरणारे स्वभावदोष आणि अहंचे पैलू दूर करता येण्यासाठी सेवा दिली आहे’, हे लक्षात येऊन त्यातून आनंद मिळाला.

२. ‘ट्विटर’ हा स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा अत्यंत मायावी विषय असूनही याचा लाभ धर्मप्रसारासाठी करणे

‘ट्विटर’वर जगभरात कोणते विषय सर्वाधिक चर्चेत आहेत, त्यांची सूची पहिल्या दहाच्या ‘ट्रेन्ड्स’च्या सूचीत विशिष्ट नावाने प्रसारित होत असते. वास्तविक पहाता ‘ट्विटर’ म्हणजे स्वत:ची प्रसिद्धी करून घेणे, स्वत:चे ‘स्टेटस’ लोकांसमोर दाखवणे, लोकांच्या दृष्टीत आपल्याला हवा तो विषय अधिक प्रमाणात पोहोचवणे, त्यावर लोकांचे चांगले ‘इंप्रेशन्स’ (लाईक्स) मिळवणे, असा अत्यंत मायावी विषय आहे; परंतु याचा लाभ धर्मप्रसारासाठी केल्यास ‘ट्विटर’च्या स्तरावरील लोकांपर्यंतसुद्धा खरे ज्ञान पोहोचू शकेल, या दृष्टीने सध्या आपल्या पुष्कळ ‘ट्विटर’च्या ‘ट्रेन्ड्स’ श्रीकृष्णाने करून घेतल्या, उदा. हिंदु अधिवेशन.

२ अ. ‘ट्विटर’वर ‘सनातन शॉप’चा प्रसार कसा करू शकतो’, हे एका साधकाने शिकवल्याने तसे प्रयत्न करणे : पूर्वी मी संकेतस्थळांची सेवा करत आहे; म्हणून नावाला ‘ट्विटर’चे खाते काढले होते; मात्र ‘ट्विटर’ कसे हाताळायचे ?’, हे कधीच शिकून घेतले नव्हते; कारण त्यासाठी ‘इंग्रजीवर प्रभुत्व असायला हवे’, अशी माझी समजूत होती. त्यामुळे मी कधीच ‘ट्विटर’ अधिक हाताळण्याचा प्रयत्न केला नाही. सहसाधक श्री. स्वप्नील भोसले यांनी मला प्रोत्साहन देऊन ‘ट्विटर’वर प्रसार कसा करू शकतो’, हे शिकवले. त्या वेळी ‘मी अज्ञानी असून कृष्णच मला दादाच्या माध्यमातून शिकवत आहे’, या भावाने सगळ्या ‘ट्वीट्स’ केल्या. तेव्हा कृष्णाने विविध भावाचे प्रयोग करून घेतले. ते पुढे देत आहे.

२ अ १. ‘ट्विटर’ची चिमणी म्हणजे धर्मप्रसार करणारी सेविकाच आहे’, असे वाटणे : ‘ट्विटर’ची चिमणी म्हणजे धर्मप्रसार करणारी धर्मप्रसार सेविकाच आहे आणि मी तिला केवळ ‘ट्वीट्स’च्या माध्यमातून चैतन्य देत आहे, असे वाटते. ‘ट्वीट’ करतांना त्या बटणवर क्लिक करतांना (ते बटन चिमणीसारखे असते.) मनाला पुष्कळ आनंद व्हायचा; कारण ‘ती चिमणीच सर्वत्र प्रसार करणार आहे. मी नुसते जागेवर बसून तिच्यावर ‘क्लिक’ करत आहे’, असे वाटायचे.

२ अ २. ‘ट्वीट’च्या लेखणीकक्षाच्या बटणावर मोरपिसाचे चिन्ह असून ‘तेच आवश्यक ते शब्द सुचवून लिहीत आहे’, असा भाव ठेवणे : ‘ट्वीट’ करण्यासाठी लेखणीकक्षाच्या बटणावर मोरपिसाचे चिन्ह असते. त्यात १४० शब्दसंख्येची मर्यादा असते. त्यातच आपला विषय शब्दबद्ध करून ‘ट्वीट’ करायचे असते. त्या वेळी ‘कृष्णाचे मोरपीसच आवश्यक ते शब्द निवडून, सुचवून लिहीत आहे’, असा भाव ठेवल्यावर अधिक विचार करावा न लागता ‘ट्वीट्स’ करता आल्या.

२ आ. ‘ट्विटर ट्रेन्ड’चा उपयोग करतांना कृष्णाला प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती !

२ आ १. सनातनच्या ग्रंथांच्या ‘ट्वीट्स’ला चांगला प्रतिसाद मिळणे : जगभरातील ‘ट्विटर ट्रेन्ड’मध्ये धर्मप्रसाराशी संबंधित एखादा विषय चर्चेत असतो. तेव्हा कृष्णाला प्रार्थना केल्यावर संबंधित विषयावरील सनातनच्या ग्रंथांच्या ‘ट्वीट्स’ला चांगला प्रतिसाद मिळायला लागला.

२ आ २. पहिल्या दहाच्या ‘ट्रेन्ड्स’च्या सूचीच्या जागी धर्मपताका फडकतांना दिसणे : मध्यंतरी हिंदु अधिवेशन चालू असतांना विभागातील साधकांनी त्याची ‘ट्रेन्ड’ केली होती. ती ‘ट्रेन्ड’ १ ते ३ मध्ये आल्यावर मनात आपोआप ‘संपूर्ण विश्‍वात हिंदु धर्माची विजयी पताका झळकू दे’, अशी प्रार्थना झाली आणि पहिल्या दहा ‘ट्रेन्ड्स’च्या सूचीच्या जागी सनातनची धर्मपताका फडकतांना दिसली. हे पाहून मनात कृतज्ञता वाटली.

३. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हाताळतांना आपोआप प्रार्थना होणे

‘व्हॉट्सअ‍ॅप’ सेवा करतांना चांगल्या ‘पोस्ट’ पुढे पाठवतांना मनात आपोआप पुढील प्रार्थना होऊ लागली. ‘हे श्रीकृष्णा, ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून ज्या ‘पोस्ट’ पाठवत आहे, त्यातून संबंधितांच्या मनात धर्माविषयीची जागृती होऊ दे. भ्रमणभाष संचावर पोस्ट हाताळतांना त्यातील तुझे निर्गुण चैतन्य साधकांच्या हाताच्या बोटांतून त्यांच्या संपूर्ण शरिरात पसरू दे.’

४. पूर्वी संगणकीय पत्र घाईने पाठवणे; पण आता ते परिपूर्ण अन् भावपूर्ण पाठवण्यासाठी व्याप्ती काढून तसे प्रयत्न केल्यावर या सेवेतून समाधान मिळणे

पूर्वी संगणकीय पत्र पाठवतांना मी पुष्कळ घाईने पाठवायचे. संगणकीय पत्राचा आरंभही थेट सेवेच्या विषयानेच करत असे. नंतर जाणीव झाली की, ही सेवा मी गुरुसेवा म्हणून करत आहे का ? त्या वेळी अंतर्मुखता निर्माण झाली. आता मेल पाठवण्यापूर्वी संबंधितांना मानस नमस्कार करून ‘हे मेल म्हणजे समोरच्या साधकांप्रती प्रेमभाव वाढवण्याचे एक माध्यम आहे’, असा विचार करते. तेव्हापासून संगणकीय पत्रात आरंभी ‘नमस्कार’ हा शब्द लिहितांना तो मनापासून टंकलेखन करता यायला लागला. त्या वेळी जाणीव झाली की, ज्या सेवेतून आपले ईश्‍वराशी सहज अनुसंधान साधते, ती सेवा देव आपल्याला देत नाही. अनुसंधान टिकवण्यास मनास संघर्ष करावा लागतो, तीच सेवा तो देतो. त्यानंतर ५ – ६ ओळींचे संगणकीय पत्र पाठवायचे असल्यास ‘ते परिपूर्ण आणि भावपूर्ण पाठवता येण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे ?’, याची व्याप्ती काढली. त्यानुसार पत्र पाठवणे चालू केल्यावर त्या सेवेतून समाधान मिळायला लागले; पण हे प्रयत्न सातत्याने करण्यात मी न्यून पडते.

५. प्रार्थना

परात्पर गुरु डॉक्टर, धर्मप्रसारासाठी तुम्ही प्रत्येक प्रसारमाध्यमाचा उपयोग केला आहे. त्याचेच प्रतीक म्हणजे दैनिक सनातन प्रभात, पाचवा वेद ठरलेली आपली ग्रंथज्ञानसंपदा, दूरदर्शन वाहिन्या (विविध विषयांवरील धर्मसत्संग बनवून ते दूरचित्र वाहिनीवर प्रदर्शित होत आहेत), चौकाचौकातील फलक, छपाई प्रसारमाध्यमे आणि आता विविध संकेतस्थळे, तसेच सोशल मिडियाची माध्यमे. यांतून तुम्ही हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करणारच आहात. ‘ते हिंदु राष्ट्र (ईश्‍वरी राज्य) आम्हा सर्व साधकांच्या अंत:करणात कायमस्वरूपी निर्माण होऊ द्या’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने कळकळीची प्रार्थना.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF