अखेर ‘एबीपी माझा’ने क्षमा मागितली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • कार्यक्रमाच्या ‘क्लिप्स’ही हटवल्या !

  • सावरकरप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या लढ्याचा विजय !

सावरकरप्रेमींनी दिलेली निवेदने आणि केलेली आंदोलने यांमुळे ‘एबीपी माझा’ने क्षमा मागितली. आर्थिक दबाव आला नसता, तर वाहिनीने काहीच केले नसते. त्यामुळे आता मागितलेल्या क्षमेवरून वाहिनीची मानसिकता पालटली आहे, असे नाही. याहीपुढे ते अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाहीत, याची निश्‍चिती देता येणार नाही. ‘क्षमा मागितल्याची कृती केवळ दबावापोटी केलेली आहे’, असेच म्हणावे लागेल.  

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ‘सावरकर  : नायक कि खलनायक ?’ असा अवमानकारक कार्यक्रम दाखवला. या कार्यक्रमामुळे ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या विरोधात सावरकरप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता अन् ‘एबीपी माझा’ने क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती. याविषयी सामाजिक माध्यमांवरही सावरकरप्रेमींनी मोहीम राबवली होती. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनी कठोर शब्दांत खडसावून ‘एबीपी माझा’चा अप्रत्यक्ष समाचार घेतला होता. ‘एबीपी माझा’च्या कार्यालयावर २३ जूनला मोर्चा काढण्याची चेतावणीही सावरकरप्रेमींनी दिली होती. अखेर ‘एबीपी माझा’ने या प्रकरणी २० जूनला वृत्तवाहिनीवरून क्षमा मागितली आहे. तसेच या कार्यक्रमांच्या ‘क्लिप्स’ही त्यांनी हटवल्या आहेत. हा सावरकरप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटित लढ्याचा विजय आहे.

याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सांगितले, ‘‘सर्व सावरकरप्रेमींच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या सामाजिक माध्यमांवरील आंदोलनाचा हा पुष्कळ मोठा विजय आहे. ‘एबीपी’ सारख्या एका माध्यम संस्थेला आपण क्षमा मागायला लावू शकलो, हे यश सर्वांच्या सहभागामुळेच शक्य झाले. कुठलेही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी यांची साथ नसतांनाही हे आंदोलन यशस्वी झाले हे विशेष आहे. ‘एबीपी माझा’चे विज्ञापनदाते कॉटन किंग, सुहाना मसाले, प्रवीण मसाले, पितांबरी, शारंगधर या सर्वांनी आपली विज्ञापने थांबवल्यामुळे आपण त्यांच्या आर्थिक नाड्या आवळू शकलो. त्या सर्व विज्ञापनदात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यामुळे आता २३ जूनला दुपारी ३.३० वाजता होणार्‍या मोर्च्याचे रूपांतर विजयी मेळाव्यात करण्यात आले आहे. सर्वांनी २३ जूनला दुपारी ३.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी नक्की यावे.’’


Multi Language |Offline reading | PDF