राष्ट्रप्रेमींकडून २३ जूनला ‘एबीपी माझा’च्या कार्यालयावर धडक मोर्चा

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • क्षमा न मागितल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय

राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करायचा आणि याविरोधात राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवल्यावरही क्षमा मागायची नाही, हे ‘एबीपी माझा’च्या उद्दामपणाचे लक्षण आहे ! हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु समाज यांच्या विरोधात प्रत्येक वेळी गरळओक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला समस्त राष्ट्रप्रेमी हिंदू एकप्रकारे लोकशाही मार्गाने धडाच शिकवत आहेत. धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांची नाहक नालस्ती करणार्‍या अन्य वृत्तवाहिन्यांनी यातून बोध घ्यावा !

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या अंधेरी (पूर्व) येथील कार्यालयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २३ जून या दिवशी दुपारी ३.३० वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी ८८२८८३२७७८ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अंदमानातील बिल्ला क्रमांक ३२७७८ हा होता. त्याचे स्मरण करत ‘वरील क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ द्या आणि मोर्चात सहभागी व्हा’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीदिनीच ‘एबीपी माझा’ने ‘सावरकर : नायक कि खलनायक ?’ हा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण केली. त्यासाठी त्वरित क्षमा मागावी, तसेच समाजमाध्यमांवरील त्या चित्रफिती (क्लिप्स) काढून टाकाव्यात, अशी मागणी राष्ट्र्रप्रेमींच्या वतीने करण्यात आली.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे शिष्टमंडळही ‘एबीपी माझा’च्या कार्यालयात गेले. त्यांना या विषयावरील निवेदन देण्यात आले; मात्र तरीही ‘एबीपी माझा’ने हट्टीपणा करत अद्याप क्षमा मागितलेली नाही. त्यामुळे प्रथम या वाहिनीचा असंख्य राष्ट्रप्रेमींनी निषेध केला. अनेकांनी वाहिनी पहाणे बंद केले. स्मारकाच्या वतीने वाहिनीच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी संबंधित विज्ञापनदात्यांना विज्ञापन न देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता हे आंदोलन अधिक तीव्र करत याविषयी खडसावण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन मोर्च्याचे आयोजन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF