हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या तिसर्‍या आणि चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण

१. ७.६.२०१९ या तिसर्‍या दिवसाचे सायंकाळचे सत्र

१ अ. ‘आध्यात्मिक उपाय’, याविषयी कु. कृतिका खत्री आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी चर्चात्मक विषय मांडणे 

१. ‘आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात विषय चालू असतांना पाताळातील वाईट शक्तींना राग येऊन त्यांनी सभागृहावर सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यामुळे सभागृहातील विजेचा पुरवठा दोन वेळा खंडित झाला. सर्वांनी भगवान श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना केल्यावर भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व वातावरणात कार्यरत होऊन वाईट शक्तींनी निर्माण केलेले अडथळे दूर झाले आणि वीजपुरवठा पुन्हा चालू झाला. या प्रसंगातून वाईट शक्तींचा त्रास होऊ नये, यासाठी भगवंताला आर्ततेने प्रार्थना करण्याचे महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबले.

कु. मधुरा भोसले

२. कु. कृतिका खत्री यांनी तळमळीने आणि अभ्यासपूर्ण विषय मांडल्यामुळे उपस्थितांना आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व लक्षात आले. हा विषय मांडतांना ‘कु. कृतिका खत्री यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे’, यासाठी भगवान श्रीकृष्णाने तिच्याभोवती संरक्षककवच निर्माण केले होते. त्यामुळे तिला विषय मांडतांना त्रास झाला नाही.

३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यातील अव्यक्त भावामुळे त्यांच्याभोवती श्रीदुर्गादेवीची तारक-मारक शक्ती लाल रंगाच्या वलयांच्या रूपात कार्यरत झाली होती. त्यामुळे त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होत होते.

४. सद्गुरु अनुताई यांच्यातील आंतरिक भाव, प्रीती आणि समष्टीच्या कल्याणाची तळमळ या गुणांमुळे त्यांच्याकडे ईश्‍वरी कृपेचा प्रवाह आकृष्ट झाला. त्यामुळे त्यांना विषय सोप्या भाषेत आणि परिणामकारकरित्या मांडता आला. त्यामुळे उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना कठीण विषयाचेही व्यवस्थित आकलन होऊन त्यांच्या मनावर आध्यात्मिक उपायांचे महत्त्व बिंबले.

५. हा विषय चालू असतांना सद्गुरु अनुताई यांच्याभोवती चैतन्याची पिवळसर आणि भक्तीची निळसर रंगाची आभा दिसत होती.

६. काही हिंदुत्वनिष्ठांनी नियमितपणे अत्तर, कापूर आणि नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्यामुळे आध्यात्मिक उपायांच्या महत्त्वाला पुष्टी मिळाली.

२. ८.६.२०१९ या चौथ्या दिवसाचे सायंकाळचे सत्र

२ अ. हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’, या विषयी सौ. क्षिप्रा जुवेकर आणि पू. नीलेश सिंगबाळ यांनी चर्चात्मक विषय मांडणे :  सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी तळमळीने विषय मांडल्यामुळे उपस्थितांना या विषयाचे बौद्धिक स्तरावर आकलन झाले आणि पू. नीलेश सिंगबाळ यांनी चैतन्याच्या स्तरावर मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थितांना या विषयाचे आध्यात्मिक स्तरावर आकलन झाले. अशा प्रकारे उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तर अशा दोन्ही स्तरांवर विषय समजणे सोपे झाले.

२ आ. ‘पद, प्रतिष्ठा आणि प्रलोभन’ यांना न भुलता निरपेक्षतेने धर्मसेवा करण्यासंदर्भात सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करणे : सद्गुरु जाधवकाका यांच्या वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण चैतन्यामुळे सर्वांची सात्त्विकता वाढून त्यांची मने स्थिर झाली. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने विषय ऐकला. सद्गुरु जाधवकाका यांनी मांडलेल्या सूत्रांमुळे उपस्थितांमध्ये ‘निरपेक्षभावाने धर्मसेवा करणे’, हा संस्कार निर्माण झाला. हा विषय चालू असतांना सद्गुरु जाधवकाका यांच्याभोवती चैतन्याची पिवळसर रंगाची आभा दिसत होती.

२ इ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी समारोपाचे मार्गदर्शन करणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीमध्ये मधुरता आणि चैतन्य यांचा संगम होता. त्यामुळे ‘त्यांची दिव्य वाणी ऐकतच रहावी’, असे वाटत होते. विषय चालू असतांना त्यांच्यामध्ये महालक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत होऊन वातावरणात गुलाबी रंगाचा दैवी प्रकाश पसरला. त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना श्रीविष्णूला प्रिय असणारा आणि विष्णुतत्त्वमय झालेला गुलाबाच्या फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत होता. त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना साधना करण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी सूत्रे सांगितली. त्यांच्याकडून श्रीमहालक्ष्मीदेवीची तारक शक्ती वातावरणात पसरल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना साधना करण्यासाठी आत्मबळ मिळाले आणि हिंदुत्वनिष्ठांच्या मनावर ‘आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना नियमितपणे केली पाहिजे’, हे सूत्र बिंबले.

कृतज्ञता

‘हे भगवंता, तुझ्या कृपेमुळे कार्यशाळेचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा माझ्याकडून झाली आणि मला शिकण्यातील आनंद मिळाला’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०१९ आणि ८.६.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF