नाणार (जिल्हा रत्नागिरी) येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करणार ! – मुख्यमंत्री,

महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन

मुंबई, १९ जून (वार्ता.) – रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त ‘तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प’ आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील प्रश्‍नोत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

१. सौदी अरेबियाची अरमाको, तसेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

२. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वांत मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरणाचा ३ लाख कोटी रुपयांचा हा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार होता.

३. या प्रकल्पासाठी १६ सहस्र एकर भूमी संपादित केली जाणार होती; मात्र हा प्रकल्प नाणारमधून हटवून आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित केला जाणार आहे.

४. ‘रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा आणि श्रीवर्धन या ४ तालुक्यांतील ४० गावांतील अनुमाने १३४०९.५२ हेक्टर भूमीवर एकात्मिक औद्यागिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे.

सिडकोच्या प्रस्तावास अनुसरून शासनाने अधिसूचित क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत अधिसूचित भूमीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने भूमीअभिलेख जिल्हाधिकार्‍यांकडून कागदपत्रांची मागणी सिडकोकडून करण्यात आली आहे. रायगडमध्ये प्रकल्प उभारण्यास ४० गावांतील स्थानिक लोकांचा विरोध नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF