सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. गुरुपरंपरेविषयी आलेली अनुभूती

१ अ. साधनेच्या आरंभीच्या काळात मिरज आश्रमात सेवा करतांना आध्यात्मिक त्रास चालू होणे, तेव्हा खोलीत बसून एकटेपणा जाणवत असल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेवरील गुरुपरंपरेच्या चित्रासमोर बसून प्रतिदिन नामजपादी उपाय करणे आणि त्यामुळे गुरुपरंपरेचे सतत स्मरण होणे : ‘वर्ष २००१ मध्ये मी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या सांगली आणि कोल्हापूर आवृत्तीची सेवा मिरज येथील आश्रमात राहून करत होतो. तेव्हा मला तीव्र आध्यात्मिक त्रास चालू झाले आणि त्या त्रासांमुळे माझे दोषही उफाळून आले. मला निराशाही आली होती. त्यामुळे मला काही सुचत नसे. यासाठी मला खोलीतच बसून नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते. तेव्हा मिरज आश्रमाचे बांधकाम चालू होते. त्यामुळे आमचा पूर्ण परिवार जवळपास ६ ते ८ मास (महिने) मिरज आश्रमातील ध्यानमंदिराजवळील खोलीत रहात होता. मला त्रासामुळे तेथे एकटे वाटत होते. त्यामुळे ‘काय करावे ?’, हे मला कळत नव्हते. तेव्हा मी गुरुपौर्णिमा स्मरणिकेच्या मुखपृष्ठावरील गुरुपरंपरेचे चित्र लॅमिनेट करून घेतले आणि ते माझ्या खोलीत लावले. नंतर मी त्या चित्रासमोर सतत बसून असायचो. तेथेच ‘नामजपादी उपाय करणे आणि झोपणे’, असे सर्व करत होतो. या चित्रामुळे मला गुरुपरंपरेचे सतत स्मरण होत होते. त्यानंतरही अनेकदा मला श्रीगुरूंसमवेत श्रीगुरुपरंपरेचे स्मरण होत होते.

१ आ. परात्पर गुरुदेव मिरज आश्रमात आल्यावर त्यांनी ते चित्र त्यांच्यासमवेत नेणे, तरीही स्वतःला होणार्‍या त्रासावर मात करण्यासाठी श्रीगुरुपरंपरा धावून येत असल्याचे अनुभवता येणे : वर्ष २००२ मध्ये मी धामसे (गोवा) येथे गेलो होतो आणि त्याच कालावधीत परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात आले होते. नंतर मी धामसेहून पुन्हा मिरज आश्रमात आल्यावर आमच्या खोलीत मला गुरुपरंपरेचे चित्र दिसले नाही; म्हणून मी सौ. मधुवंतीला (पत्नीला) विचारले, ‘‘येथील गुरुपरंपरेचे चित्र कुठे गेले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमातील प्रत्येक खोलीत फिरले. जेव्हा ते आपल्या खोलीत आले, तेव्हा त्यांनी गुरुपरंपरेचे चित्र पाहिले आणि ते म्हणाले, ‘‘अरेच्या ! हे इथे आहे होय ! ‘हे चित्र कुठे आहे ?’, ते पहाण्यासाठी तर मी संपूर्ण आश्रमात फिरत होतो’’ आणि जातांना परात्पर गुरुदेव ते चित्र समवेत घेऊन गेले.’’ त्यानंतरही ‘माझ्या त्रासावर मात करण्यासाठी श्रीगुरुपरंपरा धावून येत आहे’, असे मी अनुभवत होतो.

१ इ. आदिशक्ती स्वरूपिणी गुरुमाताद्वयी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी घोषित करून त्यांच्या रूपात कलियुगात ही दिव्य श्रीगुरुपरंपरा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुनश्‍च चालू केलेली असणे : आता वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी गुरुपादुका धारण केल्या आणि ‘ही गुरुपरंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी आदिशक्ती स्वरूपिणी गुरुमाताद्वयी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी घोषित करून त्यांच्या रूपात गुरु-शिष्य परंपरा पुढे चालू ठेवली आहे’, असे मला अनुभवण्यास मिळाले. ज्याप्रमाणे वाळूचे घड्याळ वरून खाली निमुळते होऊन एका बारीक निमुळत्या भागाकडे येते आणि तेथून पुन्हा पसरत जाते, तसे ‘मागच्या गुरुपरंपरेला फळ देऊन नवी गुरु-शिष्य परंपरा श्रीमन्नारायणस्वरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी स्थापित केली आहे’, असे मला अनुभवण्यास मिळाले.

१ ई. परमात्मास्वरूप परात्पर गुरुदेवांनी चालू केलेली गुरुपरंपरा म्हणजे एक प्रकारे ‘ईश्‍वरी परंपरा’च असणे, त्यामुळे शिष्याला परम तत्त्वाची अनुभूती देऊ शकणारे शिष्य निर्माण होऊ शकणे आणि पुढे शेकडो वर्षे ही परंपरा चालूच रहाणार असणे : परावाणीतून मार्गदर्शन करणारे; म्हणजेच साक्षात परमात्मास्वरूप असणारे परात्पर गुरु जेव्हा गुरु-शिष्य परंपरा स्थापन करतात, तेव्हा ती एक प्रकारे ईश्‍वरी परंपरा असते. परावाणीतून मार्गदर्शन करणारे मोक्षगुरु जेव्हा परावाणीतून मार्गदर्शन ग्रहण करणारे शिष्य निर्माण करतात, तेव्हा ही दिव्य परंपरा प्रारंभ होते. परम तत्त्वाला जाणणार्‍या शिष्यांना निर्माण करण्याची प्रक्रिया आणि परम तत्त्वाविषयी शिष्याला अनुभूती देण्याची क्षमता असणारे शिष्य निर्माण होत असतात, तोपर्यंत ही दिव्य परंपरा चालू रहाते.

१ उ. कलियुगात ही दिव्य परंपरा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापित केल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! : कालांतराने एकेक पायरी खाली येत ही परंपरा कलियुगात थांबते. अशा वेळी अवतारी संत बाह्य स्थितीत राहून धर्म आणि साधना यांचे बीज समाजात रोवून ही परंपरा जागृत ठेवत असतात. कलियुगात ही दिव्य परंपरा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापित केल्यानंतर सर्व साधकच नव्हे, तर सर्व प्राणीमात्र त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहेत. त्यांची ही दिव्य कृपा ‘याची देही, याची डोळा’ पहाणारे साधक भाग्यवान आहेत. पुढे शेकडो वर्षे साधक ही परंपरा सांभाळतील.

२. श्री दुर्गादेवीविषयी आलेली अनुभूती

२ अ. नवरात्रीमध्ये श्रीदुर्गादेवीचा अधिकाधिक नामजप करण्याचा प्रयत्न करतांना जाणिवेचे भान हरपणे आणि नवरात्रीतील ८ व्या आणि ९ व्या दिवशी मिरज आश्रमात सर्वत्र श्री दुर्गादेवीच असल्याचे जाणवणे : वर्ष २००२ मधील नवरात्रीत मी ‘श्री दुर्गादेवीचा प्रतिदिन १०० माळा जप करायचा’, असे ठरवले होते. ‘नंतर जेवढा होईल, तेवढा जप करायचा’, असे मी ठरवले. माझा तीन – चार दिवस मोजून जप झाला. त्यानंतर ‘माझा जप किती माळा होत आहे ? माझ्याकडून जप होत आहे कि नाही ? माझा झोपेतही जप चालू आहे का ? मी जेवलोे कि नाही ?’, या कशाचेही मला भान नव्हते. मला नवरात्रीतील ८ व्या आणि ९ व्या दिवशी सगळीकडे श्री दुर्गादेवीच दिसत होती.

२ आ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना मिरज आश्रमात श्री दुर्गादेवीचे दर्शन होऊन त्यांनी तिचे चित्र काढणे आणि तेव्हा ‘स्वतःकडून झालेली श्री दुर्गादेवीच्या नामजपाची साधना गुरुदेवांनी स्वीकारली’, असे वाटणे : त्यानंतर वर्ष २००३ ते वर्ष २००४ मध्ये अनुराधा वाडेकर यांनी (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी) वरच्या मजल्यावर बसून श्री दुर्गादेवीचे चित्र काढले. तेव्हा मला अत्यंत कृतज्ञता वाटली. तेव्हा ‘नवरात्रीत माझ्याकडून झालेल्या जपाची साधना श्रीगुरुदेवांनी स्वीकारली आणि म्हणूनच त्यांनी सद्गुरु अनुताईंकडून मिरज आश्रमात श्री दुर्गादेवीचे चित्र काढून घेतले आहे’, असे मला वाटले.

(त्या वेळी मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे हे सर्व लिहिण्याची बुद्धी झाली नव्हती. आता त्या वेळी आलेल्या गुरुपरंपरेविषयीची अनुभूती लिहून देतांना ही अनुभूती तेव्हाचीच असल्यामुळे आठवली; म्हणून आता लिहून देत आहे.)

३. हलाहलसम विष पचवण्याची शक्ती देणारे परात्पर गुरुदेव डॉ. आठवले !

३ अ. तोंडाला कोरड पडून तोंडात फोड येणे आणि टाळूला जिभेचा स्पर्शही सहन न होणे : ‘मी दिल्ली सेवाकेंद्रात रहात होतो. तेव्हा एकदा माझ्या तोंडाला कोरड पडून ८ – १० दिवस तोंडात फोड येत होते. माझा टाळा सोलून निघत होता. जिभेचा स्पर्शही टाळूला सहन होत नव्हता. मला हा त्रास असह्य होत होता; म्हणून मी ‘बी-कॉम्लेक्स’च्या गोळ्या मागितल्या; पण त्या गोळ्यांचा (वापराचा) कालावधी संपला होता. (‘एक्सपायरी’ झाली होती) आणि दुसर्‍या गोळ्या उपलब्ध नव्हत्या. तेव्हा नाईलाजाने मी त्यातीलच एक गोळी घेतली.

३ आ. ‘बी-कॉम्लेक्स’च्या गोळ्यांचा वापराचा कालावधी उलटून गेला असल्याचे ठाऊक असूनही त्रास न्यून होण्यासाठी त्यातीलच दुसरी गोळी घेणे आणि त्यानंतर अधिक प्रमाणात त्रास होणे : नंतर मला दिल्लीहून जबलपूरला प्रवास करायचा होता. माझे तोंड पूर्ण बरे झाले नव्हते; म्हणून मी साधारण दुपारी २ वाजता ‘बी-कॉम्लेक्स’ची त्यातीलच दुसरी गोळी घेतली. त्यानंतर माझे डोके किंचित दुखण्यास आरंभ झाला. मी ४ वाजता आगगाडीच्या स्थानकाकडे जायला निघालो. तेव्हा अकस्मात् माझा थकवा वाढला आणि मला अस्वस्थ वाटू लागले. गाडीत बसल्यानंतर माझ्या डोक्याच्या मागील भागातील रक्तवाहिन्या ‘थाड थाड’ उडायला लागल्या आणि ‘रक्तवाहिन्या आतून प्रसरण पावत आहेत’, असे मला जाणवले. मधेच कपाळावरील आणि दंडातील रक्तवाहिन्या फुगून उडत होत्या. नंतर मला मळमळल्यासारखे होऊन चक्कर येऊ लागली; म्हणून मी ‘माझ्या सहस्रार चक्रातील नाड्या जागृत होत आहेत’, असा भाव ठेवून नामजप करू लागलो. ‘मी जर मला होत असलेला त्रास कोणाला सांगितला, तर मला माझा प्रवास थांबवावा लागेल आणि पुढचे सर्व कार्यक्रम चुकतील’, या विचाराने मी कोणालाही काही सांगितले नाही. (ही माझी चूक होती.)

३ इ. ‘औषधाच्या उलट प्रतिक्रियेमुळे काय होऊ शकले असते ?’, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरुदेवांच्या अनन्य कृपेची जाणीव होणे आणि परात्पर गुरुदेव, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांचे चरण घट्ट पकडून थोडा वेळ नामजप केल्यानंतर झोप लागणे : आगगाडी स्थानकापर्यंत गेल्यानंतर माझा ५० टक्के त्रास अल्प झाला. गाडी मथुरेला आल्यावर मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले, ‘दुपारी घेतलेल्या गोळीच्या उलट प्रतिक्रियेमुळे (रिअ‍ॅक्शनमुळे) हा त्रास झाला.’ मला लगेच श्रीगुरुदेवांच्या अनन्य कृपेची जाणीव झाली आणि ‘गोळीच्या उलट प्रतिक्रियेमुळे काय होऊ शकले असते ?’ याची जाणीव मला असल्याने मी परात्पर गुरुदेवांचे आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई अन् सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांचे चरण घट्ट पकडून थोडा वेळ नामजप केल्यानंतर मला झोप लागली.

३ ई. पहाटे स्वप्नात सहस्रारात शेषनागाच्या फण्यांच्या ज्वाळांच्या वर पिवळ्या रंगाचे प्रकाशकिरण पसरवणार्‍या सूर्याचे दृश्य दिसणे, तेव्हा ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांनीच औषधातून निर्माण झालेले हलाहल विष प्राशन करून रक्षण केले आहे आणि ते आता चैतन्य प्रदान करत आहेत’, असे अनुभवणे : पहाटे झोपेत मला दिसले, ‘माझ्या डोक्याची कवटी म्हणजे अग्निहोत्राचे पात्र असून त्यातून नागाच्या फण्याप्रमाणे ५ ज्वाळा वर आलेल्या आहेत. मला त्या ५ फण्यांच्या ज्वाळांच्या वर तांबड्या रंगाचा सूर्य दिसत होता. त्या सूर्याभोवती पिवळ्या रंगाची कडा होती आणि त्या पिवळ्या कडेतून पिवळे प्रकाशकिरण सर्व दिशांना पसरत होते.’ म्हणजे एकूणच या प्रक्रियेतून ‘औषधाच्या उलट प्रतिक्रियेमुळे निर्माण झालेले हालाहल विष शेषारूढ भगवान श्रीविष्णूने (श्रीकृष्णाने) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच प्राशन करून माझे रक्षण केले आहे आणि आता ते मला चैतन्य प्रदान करत आहेत’, असे मी अनुभवले.

३ उ. ‘सहस्रारातील शेषनागावरील सूर्य म्हणजे ‘या विश्‍वाचा आत्मा’, म्हणजेच ‘परमात्मा स्वरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले’, असे लक्षात येऊन परामात्मा स्वरूप परात्पर गुरुदेवांनी सर्वांना उद्धरले असल्याचे जाणवणे : सकाळपासून मला एकदम सामान्य वाटत होते. एकूणच त्या गोळी घेण्याच्या प्रक्रियेतून ‘सहस्रारातील शेषनागाचे दर्शन आणि त्यावरील सूर्य म्हणजे या विश्‍वाचा आत्मा, म्हणजेच परामात्मा स्वरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले’, असे मला अनुभवता आले. ‘त्या विराट पुरुषाच्या चरणांचे धूलीकण स्वरूप असलेले आम्ही साधक त्यांचा स्पर्श, सत्संग आणि एकरूपता यांमुळे उद्धरले गेलो आहोत’, याची अनुभूतीच भगवंताने दिली.’

४. शिरविरहित लोपामुद्राच्या मूर्तीचे चित्र पाहून झालेले चिंतन

४ अ. लोपामुद्राचे शिर नसलेले धड पहातांना ‘शरिरातील विशुद्ध चक्राच्या खालील भाग हा प्रकृतीशी संबंधित असून विशुद्ध चक्र ते सहस्रार चक्रापर्यंतचा भाग पुरुषतत्त्वाचा द्योतक आहे आणि लोपामुद्रा म्हणजे प्रकृतीचे नियंत्रण नसलेल्या भावातीत अवस्थेचे द्योतक आहे’, असे जाणवणे : ‘२३.२.२०१९ या दिवशी दैनिक सनातन प्रभात मध्ये श्री अगस्तीऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्याविषयी एक सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. चित्रातील मूर्तीत लोपामुद्रेचे धड दिसत होते; परंतु शिर दिसत नव्हते. ‘काही दिवसांपूर्वी कोणीतरी त्या मूर्तीचे शिर तोडले’, असे तेथील निवासी सांगतात. प्रत्यक्षात देहातील विशुद्ध चक्राखालील भाग ‘प्रकृतीचा द्योतक’ असून विशुद्ध चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतचा भाग ‘पुरुषतत्त्वाचा द्योतक’ आहे. जशा बोटांच्या मुद्रा असतात, तशा तोंडवळ्याच्यासुद्धा असतात. तोंडवळ्यावरून व्यक्तीचा भाव आणि मुद्रा प्रकट होत असतात. त्या वेळी ‘लोपामुद्रा म्हणजे प्रकृतीचे नियंत्रण नसलेल्या भावातीत अवस्थेचे द्योतक आहे’, असे जाणवले.

४ आ. शिष्य गुरूंशी किंवा पत्नी पतीशी जेव्हा आंतरिक एकरूपता पावते, तेव्हा ‘लोपामुद्रा अवस्था’प्राप्त होणे, प्रकृतीचा पूर्ण लय होऊन ती पुरुषतत्त्वाशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया असणे, भगवानस्वरूप अगस्ती ऋषींशी शिष्य आणि पत्नी रूपांत लोपामुद्रा एकरूप झाल्याने श्री अगस्ती आणि शिरविरहित असलेली लोपामुद्राची मूर्ती ही ‘प्रकृती-पुरुष ऐक्या’चे द्योतक असणे : शिष्य गुरूंशी किंवा पत्नी पतीशी जेव्हा आंतरिक एकरूपता साधते, तेव्हा ‘लोपामुद्रा अवस्था’ प्राप्त होते आणि म्हणूनच गुरुपरंपरेत शिष्यात होणारे सगुणातील पालट, म्हणजे शिष्याचा तोंडवळा गुरूंशी साम्य किंवा तादात्म्य पावतो. ‘लोपामुद्रा अवस्था’ म्हणजे प्रकृतीचा पूर्ण लय होऊन पुरुषतत्त्वाशी एकरूपतेची प्रक्रिया ! अगस्तीऋषि हे ऋषि असले, तरी भगवान स्वरूप होते आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा ही शिष्य आणि पत्नी या दोन्ही रूपांत त्यांच्याशी एकरूप झाली होती. जरी काही खोडसाळ लोकांनी लोपामुद्रेचे शिर तोडले असले, तरी विशुद्ध चक्राच्या पुढे शिष्य आणि गुरु हे तत्त्वतः एकरूपच असतात. त्या अर्थाने श्री अगस्ती आणि लोपामुद्राची मूर्ती ही ‘प्रकृती-पुरुष ऐक्या’चे द्योतक आहे.

४ इ. मुखविरहित धड असलेल्या लोपामुद्रेचे दर्शन झाल्याने माहुर येथे श्री रेणुकामातेचा धडविरहीत मुखवटा असण्याचे कारण लक्षात येणे, भगवान परशुरामाने भगवत्स्वरूप ऋषि श्री जमदग्नी यांची पत्नी आणि शिष्य असलेल्या रेणुकामातेच्या ‘प्रकृती स्वरूपाचा’ लय करून तिला ‘पूर्णपुरुषोत्तम रूपात’ स्थापित करून हे शक्तीपीठ स्थापन केल्याचे लक्षात येणे : माझी कुलदेवता श्री रेणुकामाता आहे. तिच्या मूर्तीशास्त्रात केवळ मुखवटा आहे. ‘चारही शक्तीपिठांत श्री रेणुकामातेचाच धडविरहीत मुखवटा का ?’ असा प्रश्‍न माझ्या मनात होता. आज दैनिकातील श्री अगस्ती-लोपामुद्रा यांच्या मूर्तीतील मुखविरहित धड असलेल्या लोपामुद्रेचे दर्शन झाले आणि प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. ‘श्री रेणुकामाता या शक्तीपीठ स्वरूप आहेत. भगवान श्री परशुरामाने त्याचे पिता जमदग्नी यांच्या आज्ञेवरून त्यांचा शिरच्छेद करून श्री रेणुकामातेला पूर्णपुरुषोत्तम रूपात स्थापित करून हे शक्तीपीठ निर्माण केले आहे. श्री लोपामुद्रा यांच्याप्रमाणेच श्री रेणुकामाताही भगवत्स्वरूप ऋषि श्री जमदग्नी यांच्या पत्नी आहेत. त्या केवळ त्यांच्या पत्नी नसून त्यांच्या शिष्यही होत्या आणि श्री विष्णूचा अवतार असलेले भगवान श्री परशुराम हे त्यांचे पुत्र होते. भगवान परशुरामाने त्यांच्या प्रकृतीस्वरूपाचा लय करून त्यांना पूर्णपुरुषोत्तम स्थितीत स्थापित करून हे शक्तीपीठ स्थापन केले आहे’, असे मला जाणवले.

४ ई. परम पुरुषाच्या इच्छेने जीवदशेतील काही संत अनाहत चक्रापर्यंत येऊन सर्वसामान्यांप्रमाणे वागत असल्याचा दृष्टान्त मूर्तींच्या दर्शनातून मिळणे : काही संत जीवदशेत आल्यानंतर अनाहत चक्रापर्यंत खाली येतात. तेव्हा ते जीवदशेत समाजातील सर्वसामान्यांप्रमाणे वागतात. ते परम पुरुषाच्या इच्छेने वागत असतात. हाच दृष्टांत श्री अगस्ती-लोपामुद्रा यांच्या मूर्तींनी मला आज सकाळी दिला. त्याविषयी भगवान श्री अगस्ती अन् लोपामुद्रा यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! ज्यांच्या योगे हा दृष्टांत ग्रहण होऊन लिहून घेतला, त्या परात्पर गुरुदेव श्रीमन्नारायण स्वरूप डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी वंदन !

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (२३.२.२०१९)

५. धारिकेचे टंकलेखन करतांना आलेली अनुभूती

५ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उत्तराधिकारी घोषित केल्यावर त्यांचा तोंडवळा पालटल्याचे जाणवणे आणि त्यांच्या तोंडवळ्याची ठेवण संत भक्तराज महाराज यांच्या तोंडवळ्याप्रमाणे वाटणे : ‘हे टंकलेखन करत असतांना मला आठवले की, संत घोषित झाल्यावर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या पूर्वीच्या तोंडवळ्यात पालट होऊन तो अधिक गोल झाला होता. त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेवांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचाही तोंडवळा पालटल्याचे जाणवले होते. सद्गुरुद्वयींच्या तोंडवळ्याची ठेवण संत भक्तराज महाराज यांच्या तोंडवळ्याप्रमाणे वाटली.’

– श्री. आनंद जाखोटिया, समन्वयक हिंदु जनजागृती समिती, मध्यप्रदेश आणि राजस्थान.

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF