परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पहातांना रामनाथी आश्रमातील सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

वर्ष २०१८ मध्ये वैकुंठलोकात परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाची चालू असलेली सिद्धता अनुभवता येणे आणि ४ दिवसांनी पृथ्वीवर जन्मोत्सवाचा सोहळा पहातांना ‘साक्षात वैकुंठच रामनाथीला अवतरले’, असे जाणवणे, यांविषयी रामनाथी आश्रमातील सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. अाठवले

१. साधिकेने नामजप करायला आरंभ केल्यावर अनुक्रमे बासरी, घुंगरू, ढोल, ताशे, झांज इत्यादींचे नाद ऐकू येणे आणि ‘सर्व जण आनंदाने जयघोष करत आहेत’, असे जाणवणे

सौ. सुजाता कुलकर्णी

‘७.५.२०१८ या दिवशी महर्षींच्या मार्गदर्शनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा झाला. त्यापूर्वी ३.५.२०१८ या दिवशी सकाळी १० वाजता मी बसून नामजप करतांना मला एकापाठोपाठ एक पुढील नाद सूक्ष्मातून ऐकू आले.

अ. नामजप करायला आरंभ केल्यावर १० मिनिटांनी प्रथम एक नाद माझ्या उजव्या बाजूने मला ऐकू आला.

आ. थोड्या वेळाने मला समोरून एक नाद ऐकू येऊ लागला. तो साधारणतः बासरी किंवा अन्य कोणत्या तरी वाद्याचा होता. तेव्हा मी एका साधिकेला ‘भ्रमणभाष वाजतो का ?’, असे विचारले. तेव्हा तिला कोणताच नाद ऐकू येत नव्हता. सभोवतीच्या साधकांकडे विचारपूस केल्यावर ‘तो भ्रमणभाषचा आवाज नव्हता’, असे कळले. नंतर मी नामजप करत असतांना एकाग्रतेने नादाकडे लक्ष दिले. तेव्हा ‘तो बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आहे’, असे माझ्या लक्षात आले. परिसरात घुंगरू नसतांनाही तो नाद मला सुमारे १० मिनिटे ऐकू येत होता.

इ. नंतर मला ढोल, ताशे आणि झांज यांचा नाद ऐकू आला. या आवाजांमुळे मी गोंधळून गेले.

ई. मध्येच मला लेझिमचा नाद जोरात ऐकू येत होता. तेव्हा ‘कोणती तरी मिरवणूक चालली असेल’, असे वाटल्याने मी रस्त्याकडे पाहिले, तर कुठेच मिरवणूक इत्यादी काही दिसले नाही; मात्र मला नाद ऐकू येत होता.

उ. नंतर मला ‘आनंदाने सर्वजण जयघोष करत आहेत’, असे जाणवले.

२. साधिकेने ईश्‍वराला प्रार्थना केल्यावर ‘नामजप चालू असून आनंद मिळत आहे’, असे जाणवणे आणि ईश्‍वराने ‘विष्णुरूपी गुरुमाऊलीच्या जन्मोत्सवाची सिद्धता वैकुंठलोकात चालू असून प्रत्येक जण मिळेल ते वाद्य वाजवत आहे’, असे सांगणे

नंतर मी देवाला प्रार्थना केली, ‘हे ईश्‍वरा, हा हर्षोत्सव आणि हे नाद चांगले असतील, तर कशाचे आहेत ? वाईट शक्तींचा नाद असेल, तर तो बंद होऊ दे. माझ्या भोवती आणि आश्रमाच्या सभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे. माझा नामजप तुझ्या चरणी पोचू दे आणि या नादांचे मला आकलन होऊ दे.’ तोपर्यंत माझा नामजप चालूच होता आणि मला आनंदही मिळत होता. तेव्हा ईश्‍वराने सांगितले, ‘अगं, विसरलीस का ? ७.५.२०१८ या दिवशी आपल्या गुरुमाऊलीचा जन्मोत्सव आहे ना ? विष्णुरूपी गुरुमाऊलीच्या जन्मोत्सवाची सिद्धता वैकुंठलोकात देवादिकांनी, तर पृथ्वीवर सर्व साधकांनी चालू केली आहे. प्रत्येक जण जमेल तसे आनंदाने, नाचत आणि वाद्ये वाजवत गुरुमाऊलीच्या वाढदिवसाची सिद्धता करत आहेत. तोच हा आनंदोत्सव चालू आहे. प्रत्येक जण मिळेल ते वाद्य वाजवत आहे. अगं, शिवाचा सेवक नंदीही बागडत आहे; म्हणून त्याच्या गळ्यातील घुंगरू वाजत आहेत. साक्षात देवलोकामध्ये शिव आणि इतर देवता यांनीही सिद्धतेला आरंभ केला आहे.’

३. साधिकेला वरील ज्ञान मिळाल्यावर यापूर्वी सूक्ष्मातून ऐकू आलेल्या सर्व नादांविषयी उलगडा होणे अन् तिच्याकडून ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त होणे

‘किती भाग्यवान आम्ही ! आम्हाला पूर्वपुण्याईने साक्षात विष्णुरूपी गुरुमाऊली मिळाली. त्या आनंदात आम्हालाही वाटा मिळाला. पृथ्वीसुद्धा आनंदोत्सव साजरा करत आहे. मधेच गार वारा, मधेच थोडा पाऊस पडत असून विजाही चमकत आहेत आणि झाडे आनंदाने डोलत आहेत. पशू-पक्षी अन् कोकिळा गोड आवाजात गात आहेत. ही अनुभूती आल्यावर मला यापूर्वी सूक्ष्मातून ऐकू आलेल्या सर्व नादांचा उलगडा झाला. ‘हे ईश्‍वरा, कशी कृतज्ञता व्यक्त करू !’

४. गुरुमाऊलीने शेषासनावर श्रीविष्णूच्या रूपात दर्शन दिल्यावर साधिकेला ‘साक्षात वैकुंठच रामनाथीला अवतरले’, असे जाणवून तिची भावजागृती होणे

७.५.२०१८ या दिवशी जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी आमची प्रेमळ गुरुमाऊली विष्णुरूपात शेषासनावर पाहिली. देवीस्वरूप सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या गुरुदेवांचे पूजन करत असल्याचे पाहिले. तेव्हा मी गुरुमाऊलीचे तेज पाहून नतमस्तक झाले आणि आनंदाने माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तेव्हा मला वाटले, ‘खरंच ! आपण देवलोकात आहोत का ? साक्षात वैकुंठच रामनाथीला अवतरले आहे.’ त्या प्रसंगी सर्व साधकांची भावजागृती झाली.

‘देवा, कोणत्या जन्मीची पुण्याई फळाला आली ! हे एवढे प्रेम आणि वैकुंठलोक पृथ्वीवर आणून साधकांना आनंद केवळ गुरुमाऊलीच देऊ शकते. पृथ्वीचा स्वर्गलोक झाला. हा पालट केवळ गुरुमाऊलीच करू शकते. ‘गुरुमाऊली सर्व साधकांच्या आयुष्यात पालट घडवून आणू शकते’, हे सांगूनही खरे वाटणार नाही; पण हे त्रिवार सत्य आहे. अशा आमच्या विष्णुरूपी गुरुमाऊलीला कोटी कोटी नमस्कार !’

– सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF