तत्त्वनिष्ठ, स्वतःला पालटण्याची तळमळ असणार्‍या आणि संतांप्रती भाव असणार्‍या देवद आश्रमात सेवा करणार्‍या सौ. काव्या चेऊलकर !

१. चांगली आकलनक्षमता

‘सौ. काव्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे. ती नवीन सेवा सहजतेने शिकते. तिला सूत्रे सहजतेने आकलन होतात.

२. नवीन गोष्टी शिकण्यातील आनंद घेणे

तिने नोकरी सोडल्यानंतर लगेच ‘नॅचरोपॅथीचा कोर्स’ पूर्ण केला. नंतर तिने पोहणे शिकायला आरंभ केला. ती उत्तम स्वयंपाक करते, तरीही ती प्रत्येक गोष्ट अजून चांगले करण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच तिला शिकण्यातील आनंद मिळतो.

मी साधना आरंभ केल्यापासून ती माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे.

सौ. काव्या चेऊलकर

३. तत्त्वनिष्ठ

अ. ती कुणालाही मानसिक स्तरावर हाताळत नाही. साधकांना चुका सांगतांना ती भावनिक स्तरावर विचार करत नाही.

आ. ती ‘नॅचरोपॅथीच्या कोर्स’ला जात असतांना तेथील एक स्त्री तिला म्हणाली, ‘‘मी तुम्हाला परीक्षेत उत्तम गुण मिळवून देते. त्यासाठी तुम्ही मला १५ सहस्र रुपये द्या.’’ तेव्हा काव्या त्यांना म्हणाली, ‘‘मला तुम्ही अनुतीर्ण केले, तरी चालेल; पण मी एक पैसाही देणार नाही.’’ एवढे बोलून ती थांबली नाही, तर तिने तेथील मुख्याध्यापकांना सांगून या अयोग्य गोष्टींच्या विरोधात आवाज उठवला.

४. पूर्णवेळ साधना करण्यासाठी गुरुंवरील श्रद्धेच्या बळावर चांगल्या वेतनाच्या नोकरीचे त्यागपत्र देणे

ती आधी चांगल्या वेतनावर नोकरी करत होती. ती आणि तिचे यजमान यांनी ‘एकाला मिळणार्‍या वेतनात घर चालवायचे’, असे ठरवले. त्यानंतर तिने नोकरीचे त्यागपत्र दिले. स्वतःवर ऋण असतांनाही गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर तिने हा निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी घेतलेले ऋण आता ती बचत करून फेडत आहे.

५. संतांप्रती भाव

काव्याचा उत्तरदायी साधिका पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याशी बर्‍याचदा संपर्क येतो. ‘पू. अश्‍विनीताईंच्या मुखातून देवच बोलतो’, असा काव्याचा भाव असतो. काव्या पू. अश्‍विनीताईंशी बोलण्यापूर्वी, तसेच त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करते. पू. ताईंशी बोलतांना तिची पुष्कळ वेळा भावजागृती होते.

६. स्वतःला पालटण्याची तळमळ

अ. पूर्वी तिला कपडे आणि वस्तू खरेदी करण्याची पुष्कळ आवड होती. तिने अनावश्यक खर्च अल्प केला आहे. आता गुरूंच्या कृपेने मिळालेला एक रुपया खर्च करतांनाही ती विचार करते. राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज या सणांच्या वेळी तिला जे कपडे मिळतात, त्यावर ती समाधानी असते.

आ. पूर्वी तिची वृत्ती बहिर्मुख होती. तिला मस्करी करण्याची सवय होती. तिला तिच्या यजमानांकडून अपेक्षाही होत्या. तिच्या यजमानांना आध्यात्मिक त्रास आहे, तरीही ‘त्यांनी तिला साहाय्य करावे’, अशी तिची अपेक्षा असायची. आता तिने परिस्थिती स्वीकारली आहे.

‘हे श्रीकृष्णा, काव्यात असलेले गुण माझ्यातही येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले, आपणच हे लिखाण माझ्याकडून करवून घेतलेत. यासाठी मी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. राधा साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF