‘भरतनाट्यम्’ या नृत्यप्रकाराचा सराव करतांना कु. म्रिणालीनी देवघरे यांना पंचमहाभूतांच्या स्तरांवर आलेल्या शिवतत्त्वाच्या अनुभूती

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘मी प्रतिदिन ‘भरतनाट्यम्’ या नृत्यप्रकाराचा सराव करते. २२.४.२०१९ ते ७.५.२०१९ या कालावधीत नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

‘भरतनाट्यम्’ नृत्य करतांना कु. म्रिणालिनी देवघरे

१. दिनांक २२.४.२०१९

१ अ. नृत्याच्या सरावाला जाण्यापूर्वी : या दिवशी नृत्याच्या सरावाला जाण्याआधी माझा ‘शिव, शिव’ असा नामजप मनातल्या मनात चालू झाला.

१ आ. ‘नटराज वंदना’ हे नृत्य केल्यावर पुन्हा ‘शिव, शिव’ हा नामजप चालू होणे : सरावाच्या ठिकाणी पोचल्यावर मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. मी ‘नटराज वंदना’ हे नृत्य केले. नंतर थोड्या वेळाने अकस्मात माझा पुन्हा ‘शिव, शिव’ असा नामजप चालू झाला आणि या नामजपासह नृत्य करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली. नृत्य करतांना ‘मी ‘आनंद तांडव’ हे नृत्य करत आहे’, असे मला वाटत होते.

१ इ. बसून मानस नृत्य करतांना ‘एका शिवमंदिरात शिवलिंगाची पूजा करत आहे’, असे जाणवणे आणि ‘समोर आसंदी नसून शिवलिंग आहे’, असे वाटून ध्यान लागणे : नृत्य केल्यानंतर मी एका आसंदीसमोर बसले आणि बसून मानस नृत्य करू लागले. मानस नृत्य करत असतांनाही मला पुष्कळ आनंद जाणवत होता. थोड्या वेळाने मला दिसले, ‘सकाळची वेळ असून मी एका शिवमंदिरात आहे. माझ्यासमोर एक शिवलिंग असून मी त्याची पूजा करत आहे. त्या वेळी ‘माझ्यासमोर आसंदी नसून शिवलिंगच आहे’, असे वाटून माझे ध्यान लागले. अकस्मात मला ‘दोन्ही हातांनी मुद्रा कराव्यात’, वाटून ‘कोणीतरी माझा हात धरून माझ्याकडून मुद्रा करून घेत आहे’, असेही जाणवले. हे सगळे चालू असतांना मला मोठ्या प्रमाणात चैतन्य मिळत होते.

१ ई. मानस नृत्य करण्यासाठी बसलेल्या ठिकाणी पुष्कळ शक्ती जाणवणे, काही वेळाने पुष्कळ थकल्यासारखे वाटणे आणि अनाहतचक्राच्या ठिकाणी शक्तीची स्पंदने जाणवून तेथे जडपणा वाटणे : मी बसलेल्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती आणि मानस नृत्य करतांनाही पुष्कळ उष्णता जाणवत होती. नृत्य करतांना ‘आसंदी म्हणजे शिवलिंग आहे’, असे समजून माझ्याकडून आपोआप आसंदीला नमस्कार केला गेला. नंतर डोळे उघडले, तरी मला त्या स्थितीतून बाहेर येता येत नव्हते. मला पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते. माझ्या अनाहतचक्राच्या पुढे आणि पाठी दोन्ही ठिकाणी शक्तीची स्पंदने जाणवून तेथे जडपणा आला होता.

१ उ. नृत्य केल्यावर ‘घुंगरू म्हणजे मोगर्‍याची फुले आहेत’, असे वाटून पुष्कळ भावजागृती होणे : नृत्य झाल्यावर मी पायातील घुंगरू काढून ते हातात घेतले. त्या वेळी एक क्षण ‘हेे घुंगरू नसून मोगर्‍याची फुले आहेत’, असे मला वाटले. ते घुंगरू वजनदार वाटत होते. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती. नंतर मला ‘कोणीतरी श्‍वासोच्छ्वास करत असल्याप्रमाणे २ – ३ वेळा आवाज आला.

१ ऊ. आसंदीच्या ठिकाणी भगवान शिवाचे अस्तित्व जाणवणे : नृत्य झाल्यावर ‘ती आसंदी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवच आहेत’, असे वाटून ‘ती आसंदी उचलून न ठेवता तशीच राहू द्यावी’, असे मला वाटत होते आणि त्यामुळे शेवटी मी त्या आसंदीला नमस्कारही केला.

२. दिनांक २३.४.२०१९ ते १.५.२०१९

२ अ. ‘नटराज वंदना’ या नृत्याचा सलग सराव केल्यावर अंतर्मुखता वाढणे आणि नृत्य करण्याच्या ठिकाणी उष्णता, थंडावा अन् शांतता जाणवून मन निर्विचार होणे : या कालावधीत मी ‘नटराज वंदना’ या नृत्याचा सराव सलग करत होते. त्या वेळी नृत्य करतांना मला ध्यान लागल्यासारखे होत होते, तसेच माझी अंतर्मुखता वाढून ‘सतत नृत्य करत रहावे’, असे वाटत होतेे. नृत्याचा सराव करत असलेल्या ठिकाणी उष्णता, थंडावा आणि शांतता जाणवत होती. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते.

३. दिनांक ३.५.२०१९

अ. या दिवशी नृत्याचा सराव करतांना आणि सराव झाल्यावर माझे शरीर अन् मन यांमध्ये पुष्कळ हलकेपणा आल्याचे जाणवले.

आ. नृत्य करतांना शिवाची ‘ध्यानस्थ मुद्रा’ (दोन्ही हातांची तर्जनी आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडणे अन् पद्मासन घालून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवणे) केल्यावर मला पुष्कळ थंडावा जाणवत होता.

इ. ‘हे नृत्य माझ्याकडून कोणीतरी करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते.

ई. नृत्याचा मानस सराव करण्यासाठी बसल्यावर ‘मी मला ठाऊक नसलेले निराळेच नृत्य करत आहे’, असे दृश्य डोळ्यांसमोर येत होते.

उ. नृत्य संपल्यावर शेवटी वाकून नमस्कार केल्यावर ‘माझ्यासमोर ईश्‍वरच उभा आहे’, असे मला जाणवले.

ऊ. सरावानंतरही माझ्या मनात नृत्याचे बोल चालू होते.

ए. मी माझ्या पाण्याच्या बाटलीला हात लावताच मला शिवलिंगाची आठवण होत होती.

ऐ. मी ‘मनाने एका शांत ठिकाणी आहे’, असे मला वाटत होते.

४. दिनांक ७.५.२०१९

४ अ. मानस सराव करतांना काही वेळाने सराव आपोआप थांबणे आणि त्यानंतर मन निर्विचार होऊन शांत वाटणे : या दिवशी मी थोडा वेळ बसून मनाने सराव करत होते. काही वेळाने माझा नृत्याचा मानस सराव आपोआप थांबला आणि मला ‘मी हलत आहे’, असे जाणवले. त्या वेळी मनाला शांत आणि चांगले वाटून माझे मन निर्विचार झाले होते अन् त्या स्थितीतून बाहेर यावेसेच मला वाटत नव्हते. काही वेळाने या स्थितीतून बाहेर आल्यावर माझे डोके थोडे जड होऊन दुखू लागले.

४ आ. ध्यानमंदिरात गेल्यावर निर्विचार स्थितीत बसून रहावेसे वाटणे आणि नंतर थकवा येणे : मी थोड्या वेळाने ध्यानमंदिरात गेले. तेथेही माझ्या मनाची तीच स्थिती होती आणि मला ‘त्याच स्थितीत बसून रहावे’, असे वाटत होते. मी त्या स्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; पण मला बाहेर येता येत नव्हते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर मला थकवा आला. नंतरही मला नृत्याचे बोल सतत ऐकू येत होते.’

– कु. म्रिणालीनी देवघरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०१९)

कु. म्रिणालिनी देवघरे रामनाथी आश्रमात ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकारातील ‘नटराज वंदना’चा सराव करत असलेल्या ठिकाणी गेल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती !

कु. म्रिणालिनी देवघरे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकारातील ‘नटराज वंदना’चा प्रतिदिन सराव करतात. त्या नृत्याचा सराव ज्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणी गेल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ‘म्रिणालिनीताई नृत्य करत असलेल्या स्थळापासून एका विशिष्ट अंतरापर्यंत मला थंडावा जाणवला आणि माझी भावजागृती झाली.’ – सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. भूमीचा स्पर्श मऊ जाणवून घुंगरांचा ध्वनी ऐकू येणे : ‘म्रिणालिनीताई नृत्याचा सराव करत असलेल्या ठिकाणी मला भूमीचा स्पर्श पुष्कळ मऊ जाणवत होता. त्या वेळी माझे मन शांत झाले. वातावरण उष्ण जाणवत होते. मला त्या ठिकाणी घुंगरांचा ध्वनी ऐकू येत होता.’ – कु. शर्वरी कानस्कर, भिलाई, दुर्ग, छत्तीसगड.

३. ‘भूमी हलत आहे’, असे जाणवणे आणि ‘त्या ठिकाणी थांबावे’, असे वाटणे : ‘म्रिणालिनी नृत्याचा सराव करत असलेल्या ठिकाणी उभे राहिल्यावर ‘भूमी हलत आहे’, असे मला जाणवले. मला त्या स्थळाच्या सभोवती शक्ती जाणवत होती. मला ‘त्या ठिकाणी थांबावे’, असे वाटत होते.’ – सौ. अनुपमा कानस्कर, भिलाई, दुर्ग, छत्तीसगड.

४. मनाची अस्वस्थता न्यून होणे : ‘मला एका सेवेनिमित्त म्रिणालिनीताई करत असलेल्या सरावाच्या ठिकाणी जावे लागले. तेथे येण्याआधी मला थोडा आध्यात्मिक त्रास होत होता. म्रिणालिनीताई नृत्याचा सराव करत असलेल्या ठिकाणी उभे राहिल्यावर मला पुष्कळ शांत वाटले. माझ्या मनाची अस्वस्थता न्यून झाली.’ – सौ. अवनी आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. ‘म्रिणालिनीताई नृत्य करत असलेल्या ठिकाणी उभे राहिल्यावर माझे मन निर्विचार झाले आणि माझे ध्यान लागले. त्या स्थळाच्या सभोवतीही मला चांगले वाटत होते.’ – श्री. वाल्मीक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आहे’, असे वाटणे : ‘मी म्रिणालिनीताईसमवेत नृत्याचा सराव करते. एकदा मी नृत्याचा सराव करत असतांना माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते. म्रिणालिनीताईने नृत्य केलेल्या ठिकाणी उभे राहिल्यावर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अल्प झाले. त्या वेळी ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आहे’, असे मला वाटले.’

– कु. प्रिशा सबरवाल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF