वडिलांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणारी आणि आश्रमजीवन आवडणारी कु. साची संदीप कुलकर्णी

वडिलांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणारी आणि आश्रमजीवन आवडणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मोशी, जिल्हा पुणे येथील कु. साची संदीप कुलकर्णी (वय ८ वर्षे)

कु. साची कुलकर्णी

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. साची संदीप कुलकर्णी ही एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. साची हिची ६२ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

‘ज्येष्ठ कृष्ण पक्ष तृतीया (२०.६.२०१९) या दिवशी मोशी, (जिल्हा पुणे) येथील कु. साची संदीप कुलकर्णी हिचा तिथीनुसार ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने गेल्या वर्षभरात मला तिच्यामध्ये लक्षात आलेले काही पालट पुढे देत आहे. 

कु. साची कुलकर्णी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. श्रीकृष्णाविषयीचा भाव

आम्ही साचीच्या शालेय सुट्टीच्या कालावधीत काही दिवस देवद आश्रमात गेलो होतो. घरी आल्यानंतर तिच्याकडून एखादी अयोग्य कृती झाल्यावर आम्ही तिला ‘ही गोष्ट श्रीकृष्णाला आवडत नाही’, असे सांगितले, तर ती अयोग्य कृती पुन्हा करत नाही.

२. नियमितता

‘ती प्रार्थना आणि कृतज्ञता, तसेच कापूर अन् अत्तर यांद्वारे आध्यात्मिक उपाय नियमित करते.

३. वडिलांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणे

३ अ. जयघोष केल्यावरच गाडी चालू करायला सांगणे : ती तिच्या बाबांना ‘जयघोष केल्याविना गाडी चालू करायची नाही’, असे आग्रहपूर्वक सांगते. त्यामुळे ती गोष्ट तिच्या बाबांना पटत नसली, तरी तिच्यासाठी त्यांना जयघोष करूनच गाडी चालू करावी लागते.

३ आ. स्वतः प्रार्थना केल्यावर आलेली अनुभूती सांगून वडिलांना ‘कामांसंबंधी अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा’, असे सांगणे : एकदा साचीच्या बाबांना त्यांच्या कामांविषयी पुष्कळ ताण आला होता. तेव्हा त्याविषयी ते वैतागून मला म्हणाले, ‘‘मला काम करण्याचा पुष्कळ कंटाळा आला आहे.’’ ते साचीने ऐकले आणि ती म्हणाली, ‘‘अहो बाबा, तुम्ही श्रीकृष्णाला तुमच्या अडचणी सांगा. तो नक्की तुम्हाला साहाय्य करील ! शाळेतील प्रवेशासंबंधी मुलाखतीला जातांना मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि मला लगेचच शाळेत प्रवेश मिळाला. त्यामुळे तुम्हीही श्रीकृष्णाला प्रार्थना करा !’’

४. देवद आश्रमात राहिल्यावर आश्रमजीवन आवडणे

४ अ. आश्रमात राहिल्यावर अबोलपणा दूर होऊन बालसाधकांसमवेत लहान लहान सेवा करणे : कु. साची पहिल्यांदाच आमच्या समवेत देवद आश्रमात गेली. तेव्हा ती अबोल रहात होती आणि इतरांमध्ये विशेष मिसळत नव्हती. नंतर एक वर्षाने सुट्टीत आम्ही पुन्हा देवद आश्रमात गेलो. तेव्हा ती आश्रमात लगेचच रुळली. तिने बालसाधकांसमवेत मैत्री केली. त्या वेळी ती आश्रमात बालसाधकांच्या समवेत लहान लहान सेवा करत असे आणि खेळतही असे.

४ आ. ‘आजोबांनी सेवा सोडून घरी येऊ नये’, असे वाटणे : माझे बाबा (कु. साचीचे आजोबा श्री. राजेंद्र सांभारे) हे देवद येथील सनातन आश्रमात, तर माझी आई (कु. साचीची आजी) सातारा येथे घरी रहाते. एकदा मी साचीला घेऊन सातारा येथे माहेरी गेले होते. तेव्हा माझे बाबा आश्रमातून घरी आले होते. त्या वेळी साची त्यांना म्हणाली, ‘‘आबा, तुम्ही सेवा सोडून का आलात ? परत आश्रमात जा.’’ (तिलाही आजोबांसमवेत आश्रमात जायचे असते.)

४ इ. साचीने तिच्या आई-वडिलांना ‘तुम्ही जा घरी ! मी आश्रमातच राहीन’, असे सांगणे : एप्रिल २०१९ मध्ये आम्ही देवद आश्रमात काही दिवस रहाण्यासाठी गेलो होतो. तेथून निघतांना ती रडू लागली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘तुम्ही जा घरी ! मी आश्रमातच राहीन.’’

४ ई. वडिलांना ‘नोकरी करण्यापेक्षा आश्रमात राहून सत्सेवा करूया’, असे सांगणे : देवद आश्रमातून घरी परत आल्यावर एकदा साचीचे तिच्या बाबांशी पुढील संभाषण झाले.

साची : बाबा, आपण पनवेलच्या (देवद येथील सनातनच्या) आश्रमात रहायला जाऊया !

बाबा : आपण तेथे राहू शकत नाही.

साची : आपण संकुलात (देवद आश्रमाच्या शेजारी असलेल्या ‘सनातन संकुला’त) राहूया. तेथूनच मी शाळेला जाईन आणि सेवाही करीन.

बाबा : अगं, माझी नोकरी इकडेच आहे.

साची : तुम्ही आश्रमात सेवा करा. नोकरीची काही आवश्यकता नाही !

५. देवद आश्रमात राहून घरी आल्यावर साचीमध्ये झालेले पालट

अ. पूर्वी घरी असतांना साचीचे डोळे पुष्कळ लाल होत असत; पण देवद येथील सनातन आश्रमात राहिल्यापासून तिचा हा त्रास पुष्कळ प्रमाणात न्यून झाला आहे.

आ. पूर्वी साची मनापासून अभ्यास करत नसे; पण देवद आश्रमातून घरी आल्यापासून तिच्यामध्ये चांगला पालट झाला आहे.

६. स्वभावदोष

आळशीपणा आणि हट्टीपणा.’

– सौ. सई संदीप कुलकर्णी (साचीची आई), मोशी, पुणे.

(८.६.२०१९)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/०6MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF