शिक्षणाची ‘केअर’ कोण करणार ?

गेल्या काही वर्षांमध्ये दर्जाहीन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध छापून आणून ‘संशोधक’ झालेल्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे ‘संशोधक उदंड; मात्र संशोधनाची वानवा’ अशी स्थिती होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीय संशोधन आणि संशोधक पिछाडीवर होते. अनेक विद्यापिठांमधून विद्यावाचस्पतीच्या (पीएच्.डी.च्या) पदव्या खिरापतीप्रमाणे वाटल्या जात होत्या. या वाटपामागचा ‘अर्थ’ संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचा अनर्थ करत होता. आताही या स्थितीमध्ये फारसा पालट झालेला नाही. तरीही त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे खोट्या आणि दर्जाहीन संशोधन नियतकालिकांना चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘कन्सोर्शियम ऑफ अ‍ॅकेडमिक अँड रिसर्च एथिक्स’ची (केअरची) (मराठी अर्थ – शिक्षण आणि संशोधन नैतिकता महासंघ) स्थापना केली आहे. ‘केअर’कडे यंदा देशपातळीवरील ४ सहस्र ३०५ संशोधन नियतकालिकांचे प्रस्ताव होते; पण त्यातील केवळ ८१० नियतकालिकेच वैध असल्याचे ‘केअर’ने घोषित केले आहे. जवळपास साडेतीन सहस्र नियतकालिके अपेक्षित दर्जाची पूर्तता करत नसल्याने या नियतकालिकांमधील संशोधने आता ग्राह्य धरली जाणार नाहीत. संशोधनाचा थेट संबंध प्राध्यापकांची वेतनवाढ आणि पदोन्नती यांच्याशी असल्याने या नव्या नियमांना विरोध करण्याचा प्राध्यापकांचा कल असू शकतोे; पण त्याला न जुमानता संशोधनाच्या दर्जाविषयी आग्रही रहायला हवे.

विकासाचा ढोल बडवणार्‍या या देशाच्या संशोधन क्षेत्राची झालेली ही दयनीय स्थिती भूषणावह नाही. याची पाळेमुळे शिक्षणव्यवस्थेमध्ये आहेत. स्वतंत्र आणि परिघाबाहेरचा विचार करण्यासाठी सध्याची मेकॉले शिक्षणपद्धत अनुमतीच देत नाही. ‘घोका आणि ओका’ ही पद्धत बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत गुण मिळवून देते; कारण बर्‍याच वेळा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्‍न हे साचेबद्ध असतात. एकच प्रश्‍न वेगळ्या प्रकारे विचारला, तरी सर्वसामान्य विद्यार्थी त्याचा आशय समजून घेण्यामध्ये न्यून पडतात. विज्ञान विद्याशाखेची स्थितीही विदारक आहे. वैज्ञानिक प्रयोग करतांना दिसलेली निरीक्षणे नोंदवणे, त्यावरून अनुमान काढणे असे करण्याऐवजी काही अपवाद वगळले, तर सर्वांचा कल एकमेकांचे लिखाण पाहून प्रयोगवह्या (जर्नल्स) पूर्ण करण्याकडे असतो. थोडक्यात काय, तर विचारमंथन, चिंतन आणि मनन यांना शिक्षणव्यवस्थेत नगण्य स्थान असल्याने विद्यार्थ्यांच्या विचारांची खोलीही उथळ झाली आहे. हा दोष विद्यार्थ्यांचा नसून शिक्षणव्यवस्थेचा आहे. त्यामुळे ‘केअर’ने गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या दिशेने काही पावले टाकली असली, तरी जोपर्यंत मूलभूत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत या प्रयत्नांची अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य होणार नाही. हे म्हणजे झाड ताजेतवाने दिसण्यासाठी मूळांना खत, पाणी घालण्याऐवजी झाडाची पाने पुसण्यासारखे आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF