राजुरा येथील ‘इन्फॅट जीझस इंग्लीश स्कूल’मधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणी विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक

गुन्हेगारांना जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांविषयी पुरो(अधो)गामी, देशात असहिष्णुता वाढत असल्याचा कांगावा करत पुरस्कार परत करणारे साहित्यिक आता काही बोलतील का ? कि त्यांना केवळ हिंदूंच्या शिक्षणसंस्था, मठ, धर्माचार्य यांना लक्ष्य करायचे आहे ?

मुंबई, १९ जून (वार्ता.) – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील ‘इन्फॅट जीझस इंग्लीश स्कूल’मधील ७ अल्पवयीन विद्यार्थिनींवर संस्थाचालकांनी बलात्कार केला. आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. असे प्रकार घडू नयेत आणि गुन्हेगारांना जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी विधान परिषदेमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी केली. १९ जूनला भाजपचे आमदार प्रा. अनिल सोले यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालू’, असे आश्‍वासन दिले.

आमदार डॉ.(सौ.) नीलम गोर्‍हे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती नेमण्याची मागणी केली. अधिवक्ता हुस्नबानू खलिफे यांनी मुलींच्या वसतीगृहामध्ये सुरक्षारक्षक, तसेच अधिकारी म्हणून महिलांची नियुक्ती करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाजपचे आमदार गिरीश व्यास आणि नागोराव गाणार यांनीही या विषयावर त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.


Multi Language |Offline reading | PDF