क्रांतीदिनी राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिकांच्या वतीने जुने गोवे येथील ‘हातकातरो’ खांबाजवळ हुतात्म्यांना अभिवादन

‘हातकातरो’ खांबाच्या ठिकाणी घोषणा देतांना राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ

पणजी, १९ जून – पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’ अत्याचारांच्या वेळी बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘हातकातरो’ खांबाच्या (inquisition pillar) ठिकाणी हुतात्म्यांना गोवा क्रांतीदिनी शिवयोद्धा, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, संस्कृतीप्रेमी आदींनी अभिवादन केले. हातकातरो खांबाची ऐतिहासिक पुरातन वास्तू म्हणून नोंदणी करून त्याचे त्वरित संवर्धन करावे आणि ‘हातकातरो’ खांबाचा इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा, यासाठी त्याची माहिती असलेला फलक याच ठिकाणी लावावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

प्रारंभी ‘हातकातरो’ खांबाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आणि ‘हातकातरो’ स्मारकाला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक  श्री. सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. जो इतिहासाचे स्मरण करतो, तो इतिहास निर्माण करू शकतो. शौर्य आणि धैर्य यांच्या स्मृती जागृत ठेवणारा ‘हात कातरो’ खांब हा इतिहासाचा साक्षीदार आहे. स्वाभिमानासाठी बलीदान देणार्‍या गोमंतकियांचे हे प्रतीक आहे. बलीदान देणार्‍या गोमंतकियांप्रती आपण सदैव कृतज्ञ रहायला हवे. देव, देश आणि धर्म रक्षणाचा संकल्प आज युवा पिढीने केला पाहिजे.’’

या वेळी प्रा. संदीप पाळणी, प्रा. मुकुंद कवठणकर, श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, श्री. गोपाळ बंदीवाड, श्री. माधव विर्डीकर, श्री. मंदार नाईक, श्री. सतीश बोरकर, श्री. जयेश थळी आणि मडकईकर नवचैतन्य हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी मडकईकर नवचैतन्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रभात फेरी काढली.


Multi Language |Offline reading | PDF