मुंबई येथे दूषित खाद्यपदार्थ आणि पेय विकणार्‍या ८ सहस्र १२ फेरीवाल्यांवर कारवाई ! – जयकुमार रावल, अन्न आणि पुरवठा मंत्री

विधानसभा लक्षवेधी…

रेल्वे मालकीच्या भूमीत दूषित पाण्याने भाजीपाला पिकवणार्‍यांचे परवाने रहित करण्याचे निर्देश

मुंबई, १९ जून (वार्ता.) – १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत शहरातील ८ सहस्र १२ फेरीवाल्यांवर कारवाई करून २१ सहस्र ४६३ किलो उघड्यावरील खाद्यपदार्थ, ३६ सहस्र ५४ लिटर सरबत आणि १ लाख १६ सहस्र ८२३ किलो बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडील दूषित खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ नियमितपणे जप्त करून नष्ट करण्याची कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न आणि पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी १९ जूनला विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली. या वेळी त्यांनी ‘रेल्वे मालकीच्या भूमीत दूषित पाण्याने भाजीपाला पिकवणार्‍यांवर परवाने रहित करण्याची कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांसह १५ आमदारांनी याविषयी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत अन्न आणि पुरवठा राज्यमंत्री मदन येरावार, आमदार अजित पवार, संजय केळकर यांनीही सहभाग घेतला.

मंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले की,

१. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईस्थित उघड्यावर विक्री केल्या जाणार्‍या लिंबू सरबतासाठी वापरण्यात येणारे पाणी आणि बर्फ यांचे नमुने घेतले असून २८० नमुन्यांपैकी २१८ नमुने दूषित आढळून आले आहेत.

२. तसेच उसाच्या रसासाठी वापण्यात येणार्‍या बर्फाच्या ३०३ नमुन्यांपैकी २६८ नमुने आणि इतर बर्फाच्या ३८५ नमुन्यांपैकी ३०० नमुने दूषित आढळून आले आहेत.

३. रेल्वेने त्यांच्या मालकीच्या दिलेल्या भूमीत डोंबिवली औद्योगिक वसाहतमधील आस्थापनांतून निघणार्‍या सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला पिकवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

४. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला याची माहिती देऊन रेल्वे स्थानकालगत कार्यक्षेत्रातील विक्री होत असलेल्या १२ पालेभाज्यांचे नमुने पडताळण्यासाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

५. रेल्वेच्या आवारातील भूमींमध्ये पिकवण्यात येणार्‍या भाजीपाल्याविषयी उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशांचे रेल्वेच्या भूमीत भाजीपाला पिकवणार्‍यांकडून उल्लंघन होणार नाही याविषयी निश्‍चिती करावी, असे निर्देश रेल्वे प्राधिकरणाला दिले आहेत. न्यायालयाच्या शर्तींचे उल्लंघन करणार्‍यांचे रेल्वे प्राधिकरणाने दिलेले परवाने रहित करण्याचेही निर्देश दिले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF