राज्याचा अर्थसंकल्प फुटल्याची सायबर शाखेकडून उच्चस्तरीय चौकशी करावी ! – विरोधकांची विधानसभेत मागणी

विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन आणि घोषणा

मुंबई, १९ जून (वार्ता.) – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ जूनला विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच तो फोडण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. भाजप-शिवसेनेतील श्रेयवादावरून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटला आहे, असा आरोप विरोधकांनी करून अर्थसंकल्प फुटीची ‘सायबर शाखे’कडून चौकशी करावी, या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करून घोषणा दिल्या. वरील मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

जयंत पाटील यांनी सांगितले, ‘अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ट्विटरवरच्या ग्राफीक्सवरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची छायाचित्रे कशी आली ? अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच त्याची माहिती बाहेर आली होती का ? अर्थसंकल्प फुटणे, ही काही साधी गोष्ट नाही. यातून कोणाला लाभ करून देण्याचा उद्देश होता का ? अर्थसंकल्प फुटणे हा सभागृहाचा अवमान आहे.’

अजित पवार म्हणाले, ‘‘विधानसभेपूर्वी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडून दीपक केसरकर लगेच खाली आले होते. त्या वेळी विधानसभेत ७० ते ७५ टक्के अर्थसंकल्प वाचून झाला होता. अर्थसंकल्प मांडण्याचे श्रेय घेण्यासाठी आणि वृत्तवाहिनीवर मुख्य वृत्त येण्यासाठी शिवसेनेने लगेच अर्थसंकल्प मांडला आहे.’’ यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF