बांगलादेशामध्ये स्थानिक कामगार आणि चिनी कामगार यांच्यामध्ये हिंसाचार

एका चिनी कामगाराचा मृत्यू

चीनच्या साम्राज्यशाहीला संबंधित देशांतील नागरिक विरोध करणारच !

ढाका (बांगलादेश) – येथे सहस्रो स्थानिक कामगार आणि चिनी कामगार यांच्यात झालेल्या संघर्षात एका चिनी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच अनेक जण घायाळ झाले आहेत. प्रथम बांगलादेशी कामगाराचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हिंसाचाराला प्रारंभ झाला. प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

१. ढाका येथे १ सहस्र ३२० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाला चीनकडून अर्थपुरवठा केला जात आहे. एकूण ६ सहस्र कामगार येथे काम करत आहेत. त्यात २ सहस्र चिनी कामगार आहेत. या प्रकल्पाच्याच ठिकाणी या कामगारांमध्ये संघर्ष झाला. येथे झालेल्या बांगलादेशी कामगाराच्या मृत्यूचे वृत्त चीनमुळे  दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बांगलादेशी कामगारांनी केला आणि नंतर हिंसाचार झाला.

२. हिंसाचारात घायाळ झालेल्या ६ चिनी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचार चालू असतांना एका चिनी कामगाराचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रमुख मोनीरुल इस्लाम यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १ सहस्र पोलिसांना तैनात करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

३. चीनमधील सरकारी आणि खासगी आस्थापने वीज, वाहतूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांगलादेशामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे बांगलादेशामध्ये चिनी कामगारांची संख्या अधिक आहे. यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. एक वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF