दोषी रुग्णालयांची मान्यता रहित करणार ! – एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री

बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रकर्म करून महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा गंभीर प्रकार

मुंबई, १९ मे (वार्ता.) – अवैधरित्या शस्त्रकर्म करून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून शासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. याविषयी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करून येत्या २ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल. यामध्ये दोषी असणार्‍या रुग्णालयांची मान्यता रहित करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. बीड जिल्ह्यात काही रुग्णालयांत अवैधरित्या शस्त्रकर्म करून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या गंभीर प्रकाराविषयी १८ जून या दिवशी शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘या प्रकरणी बैठक घेऊन करण्यात येणार्‍या उपाययोजना आणि कार्यवाही यांची निश्‍चिती करावी’, असे निर्देश दिले. ‘या प्रकरणाच्या अन्वेषणामध्ये कोणते ‘रॅकेट’ (टोळी) असल्यास ते उद्ध्वस्त केले जाईल’, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF