श्री महालक्ष्मीदेवीच्या प्राचीन दागिन्यांचे लवकरच संग्रहालय

कोल्हापूर, १९ जून (वार्ता.) – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीस १७ व्या शतकापासून तत्कालीन सत्ताधार्‍यांनी दागिने अर्पण केले आहेत. या मौल्यवान दागिन्यांचे लवकरच संग्रहालय होणार असून भक्तांना लवकरच हे दागिने पहाण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी दिली.

या वेळी श्री. महेश जाधव म्हणाले

१. देवीची अलंकार पूजा पहाण्यासाठी भाविकांच्या रांगा लागतात. त्यामुळे देवीचा रत्नजडित किरीट, सोळ पदरी चंद्रहार, कवड्यांची माळ, मोहरांची माळ, श्रीयंत्र हार, रत्नजडित मयूर कुंडले यांसह अनेक दुर्मिळ दागिने भाविकांना पहावयास मिळणार आहेत.

२. सध्या गरूड मंडपात देवीची सुवर्ण पालखी काचेच्या पेटीत भाविकांच्या दर्शसाठी बंदिस्त करून ठेवली आहे. त्याच पद्धतीने गरूड मंडपात स्वतंत्र खोली करून दागिने भक्तांना पहाण्यासाठी ठेवले जाणार आहेत. यासाठी मंदिराची सुरक्षा व्यवस्थाही वाढवावी लागणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF