पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील अपव्यवहाराची चौकशी पूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहवाल सिद्ध करण्याचे काम चालू

मुंबई, १८ जून (वार्ता.) – कोल्हापूर येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये झालेल्या अपव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानुसार त्याचा अहवाल बनवण्याची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा प्रश्‍नोत्तरात १८ जूनला लेखी स्वरूपात दिली आहे. शिवसेनेचे महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

आमदार श्री. गोगावले यांनी ‘जुलै २०१७ मध्ये गृहराज्यमंत्र्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील अपव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल ३ मासांत सादर करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात अहवाल सादर का झाला नाही ? विलंब होण्याची कारणे काय ? आणि केव्हापर्यंत अहवाल सादर करणार आहात ?, तसेच अहवाल सादर झाला असल्यास चौकशीचे निष्कर्ष काय आहेत ? आणि त्यानुसार शासनाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?, असे प्रश्‍न विचारले होते.

या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘मार्च २०१७ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याविषयी आश्‍वासन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील अपव्यवहारांची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्याविषयी शासनाने ४ वर्षांपूर्वी म्हणजे २२ एप्रिल २०१५ या दिवशीही पत्र पाठवून तशी सूचना केली होती. त्यानुसार या देवस्थान समितीमधील एकूण ३ सहस्र ६७ देवस्थानांची वर्ष १९६९ ते २०१५ या कालावधीतील प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणांची व्याप्ती मोठी असल्यामुळे चौकशीस प्रदीर्घ कालावधी लागला आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF