घरातील कामे ‘सेवा’ या भावाने करणारी आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेली कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी 

घरातील कामे ‘सेवा’ या भावाने करणारी आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पंचवटी (नाशिक) येथील कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी (वय ९ वर्षे) !

कु. वैभवी सूर्यवंशी

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी ही एक आहे !

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. वैभवी हिची ५५ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वितीया (१९.६.२०१९) या दिवशी नाशिक येथील कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी हिचा तिथीनुसार ९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने गेल्या वर्षभरात तिची आई आणि नाशिक येथील एक साधिका यांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 

कु. वैभवी सूर्यवंशी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. आनंदी आणि उत्साही

‘वैभवी नेहमी आनंदी आणि उत्साही असते.’ – सौ. ज्योती पंडित, पंचवटी, नाशिक.

२. कलांची आवड

‘तिला वाढदिवसानिमित्त भेटकार्ड बनवणे, नृत्य करणे, सात्त्विक मेंदी आणि रांगोळी काढणे या कलांची आवड आहे.

३. घरातील कामे ‘सेवा’ या भावाने करणे

‘घरातील केर काढणे, कणिक मळणे, पोळ्या भाजणे, भांडी घासणे, घर आवरणे’ इत्यादी कामे ‘सेवा’ या भावाने १ वर्षापासून नियमित करते. तिने केलेल्या सेवांमध्ये मला पुष्कळ चैतन्य जाणवते. तिला सत्सेवा करायला अतिशय आवडते.’

– सौ. वर्षा प्रकाश सूर्यवंशी (वैभवीची आई), पंचवटी, नाशिक. (७.६.२०१९)

४. स्वतःला पालटण्याची तळमळ असणे

अ. ‘कु. वैभवी व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे देते.

आ. ती स्वभावदोष निर्मूलन सत्संगात मोठ्या व्यक्तींप्रमाणे स्वतःच्या चुका सांगते आणि संबंधित व्यक्तीची क्षमा मागते.’

– सौ. ज्योती पंडित, पंचवटी, नाशिक. (७.६.२०१९)

इ. ‘एकदा तिच्या शाळेला सुट्टी होती; म्हणून ती स्वभावदोष निर्मूलन सत्संगाला बसली. तेव्हा तिने प्रथम मला आणि मग सत्संगसेवकाला विचारले, ‘‘मला (वैभवीला) सत्संगात चुका सांगायच्या आहेत. सांगू का ?’’ त्या वेळी सत्संगसेवकांनी अनुमती दिल्यावर तिने सर्व साधकांसमोर तिच्या सर्व चुका सांगितल्या.

ई. आश्रमात जाण्याची तिच्यामध्ये तीव्र तळमळ आहे.

५. तत्त्वनिष्ठता

ती घरी तत्त्वनिष्ठ राहून कुटुंबियांना स्पष्टपणे चुका सांगून साधनेसाठी साहाय्य करते.

६. देवाप्रतीचा भक्तीभाव

अ. देवपूजेसाठी सहजतेने फुले उपलब्ध झाली नाहीत, तर ती त्यासाठी बरेच प्रयत्न करते आणि देवतांना भावपूर्ण फुले वाहते.

आ. ती अन्य वेळी देवपूजा करण्याचा खेळ खेळते. त्यासाठी ती आसंदीवर (खुर्चीवर) छान कापड अंथरते. त्या कापडावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवून त्यांना फुले अर्पण करते. नंतर त्यांच्यासमोर ‘नैवेद्य’ ठेवून तो घरातील सर्वांना ‘प्रसाद’ म्हणून देते.

७. स्वभावदोष

सवलत घेणे, लहरीपणा, मनोराज्यात रमणे, चिडणे, स्वकौतुकाची अपेक्षा, अधिकारवाणीने बोलणे आणि ऐकण्याची वृत्ती अल्प असणे.’

– सौ. वर्षा प्रकाश सूर्यवंशी (वैभवीची आई), पंचवटी, नाशिक. (७.६.२०१९)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF