‘ई-सिगारेट’ हा व्यसनाधीनतेचा मार्ग !

सिगारेट हे असे व्यसन आहे की, ज्यापासून सुटका मिळवणे कठीण. सध्याच्या काळात महिलाही सिगारेट वापरण्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीला आहेत. सिगारेट शरिराला हानीकारक आहे. त्यामुळे त्याला पर्याय देण्यासाठी, तसेच धुम्रपानाचे तोटे टाळण्याच्या नावाखाली सध्या ई-सिगारेटचे मोठे प्रस्थ आपल्याला दिसून येते. विद्युत् उपकरणाच्या साहाय्याने द्रवरूप निकोटीन, फळ किंवा अन्य स्वाद यांची केलेली वाफ तोंडावाटे घेणे/सोडणे याला ‘ई-धूम्रपान’ म्हणतात. ई-सिगारेट, ई-हुक्का यात बॅटरीच्या साहाय्याने द्रवरूप निकोटीनची वाफ करून तोंडात ओढली जाते. नियमितच्या सिगारेटहून ई-सिगारेट अल्प हानीकारक आहे, असा भ्रम बाळगणारे आणि ई-सिगारेटचे सेवन करणारे यांची संख्या पुष्कळ वाढली आहे; मात्र ई-सिगारेट अल्प हानीकारक आहे, असे नाही. एका प्रयोगामध्ये सिद्ध झाले आहे की, तंबाखूमध्ये जे विषारी रासायनिक घटक आहेत, तेच घटक ई-सिगारेटमध्येही आहेत. त्यामुळे फुप्फुसाला मोठ्या प्रमाणात इजा होते. ई-सिगारेट हृदयरोगाच्या रुग्णांसाठी अल्प हानीकारक असते, असा मोठा गैरसमज आहे; मात्र याला चुकीचे ठरवणारे संशोधन समोर आले आहे.

आस्थापनांच्या मते ई-सिगारेटमध्ये तंबाखूतील अन्य घातक द्रव्ये नसल्याने ती सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. निकोटीनचा समावेश नसलेली अन्य स्वाद वापरलेली ई-सिगारेट, ई-हुक्का उपलब्ध करून सिगारेटच्या वाट्याला न गेलेल्या अल्पवयीन युवकांना धुम्रपानाच्या नवख्या जाळ्यामध्ये ओढले गेले. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाला ‘निकोटीन फ्री’ असे लिहिलेल्या ई-सिगारेटच्या नमुन्यामध्ये निकोटीन आढळले. या विषयातील एक तज्ञ मायकेल ब्लाहा यांनी सांगितले आहे की, ई-सिगारेटमध्ये निकोटीनचे प्रमाण तीव्र असल्याने हेरॉइन किंवा कोकेन यांसारखे जहाल व्यसन लागू शकते. त्यामुळे कधीही धूम्रपान न करणारे सहस्रो युवक याची चटक लागल्याने व्यसनाधीन होत आहेत. मुंबईसह देशभरात ई-सिगारेटचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक युवक केवळ दिखाव्यासाठी ई-सिगारेटचे सेवन करण्यास प्रारंभ करतात; पण नंतर त्याचे व्यसन कधी लागून जाते त्यांनाही कळत नाही आणि एकदा त्याची सवय लागली की, ते सामान्य सिगारेटकडेही वळतात. म्हणजेच ई-सिगारेट हे युवकांना व्यसनाधीनतेकडे वळवण्याचा मार्ग बनला आहे. त्यामुळे याचे परिणाम जाणून ई-सिगारेटवर बंदी आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा ! यासमवेतच तरुणांना धर्मशिक्षण दिल्यास ते अशा अपमार्गांकडे वळण्यापासून परावृत्त होऊ शकतील. हे जाणून सरकारने व्यापक प्रमाणात धर्मशिक्षण देण्याचीही व्यवस्था करावी, असे वाटते.

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर


Multi Language |Offline reading | PDF