लोकसंख्यावाढ

संपादकीय

संयुक्त राष्ट्राच्या ‘आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागा’कडून लोकसंख्येच्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेला अहवाल भारतासाठी चिंताजनक आहे. या अहवालानुसार वर्ष २०२७ मध्ये भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनू शकतो. पुढील ३० वर्षांत जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन वर्ष २०५० पर्यंत ती ९.७ अब्जांवर पोचू शकते. या वाढीपैकी जवळपास ५० टक्के वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांमध्ये होऊ शकते. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. त्यामध्ये आतापर्यंत काही कोटींची वाढ झाली असणार.

स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या काळात देशाची लोकसंख्या आटोक्यात होती; मात्र वर्ष १९५१ ते १९८१ या काळात लोकसंख्येचा विस्फोट झाला. या काळात लोकसंख्यावाढीचा दर २.१५ टक्क्यांवर पोचला होता. नंतरच्या काळात लोकसंख्यानियंत्रणाची चर्चा देशपातळीवर छेडली गेली. कुटुंबकल्याण आणि नसबंदी हे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राबवण्यात येऊ लागले; पण लोकसंख्यावाढीच्या वेगावर अपेक्षित नियंत्रण मिळवता आले नाही. यामध्ये अल्पसंख्यांकांचे धार्मिक कायदेही अडसर आहेत. शरियत कायद्यामुळे मुसलमान स्त्रियांवर अन्याय होत आहे, तसेच काही चुकीच्या धार्मिक समजुतींमुळे या समाजात जन्मदरही अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून ‘समान नागरी कायदा’ करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे; पण मते कमी होण्याच्या भीतीपोटी म्हणून म्हणा अथवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे म्हणा, आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याचे धैर्य दाखवलेले नाही.

वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधा, तसेच देशाची साधनसंपत्ती यांवर ताण पडतो. तीव्र स्पर्धा निर्माण होते, तसे रोजगाराच्या संधीही अल्प होतात. नियोजन आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा उडतो. हे सगळे भौतिक तोटे आहेतच; पण त्याच जोडीला लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे आध्यात्मिक स्तरावरही हानी होते. कलियुगामध्ये माणसांना साधनेची आवड अल्प आहे. सर्वांचे आयुष्य भौतिकतेमध्ये बुडले आहे. अशा मनुष्यांचे ‘शिंग नसलेले प्राणी’ असे वर्णन हिंदु धर्मात केले आहे. अशा ‘जड’वादी लोकांमुळे पृथ्वीचा भार वाढतो. या अनुशंगाने अनेक संतांनी आगामी ३-४ वर्षांमधील आपत्काळात अनेक नैसर्गिक संकटे येऊन जवळपास निम्म्या लोकसंख्येला त्याचा फटका बसणार असल्याचे सांगितले आहे. यास्तव लोकसंख्यावाढीच्या समस्येचे आध्यात्मिक दृष्टीकोनातूनही चिंतन होणे अपेक्षित आहे.


Multi Language |Offline reading | PDF