ग्रंथांची सेवा करतांना गुरुकृपेने प्रारब्ध सुसह्य झाल्याची आणि ग्रंथातून चैतन्य मिळत असल्याची साधकाला आलेली प्रचीती

श्री. गोविंद दर्डे

१. नेसाई येथे सेवा करतांना मनात मायेतील विचार न येणे

‘वर्ष २००३ नंतर मला गुरुकृपेने नेसाई येथे ग्रंथांची सेवा मिळाली. त्यामुळे माझ्या आनंदात वाढ झाली. देवाने मला रात्रंदिवस सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या काळात मनात कधी मायेतील विचार आले नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने माझ्याकडून सेवा करवून घेतली. या काळात मला गुरुचरणांचा विसर पडला नाही.

२. पायाच्या शस्त्रकर्माच्या वेळी ‘हे शरीर माझे नसून संत भक्तराज महाराज यांचे (बाबांचे) आहे’, असा भाव ठेवल्याने परिस्थिती सुसह्य होणे

११.५.२००५ या दिवशी मला पायाच्या शस्त्रकर्मासाठी ‘नारायण सेवा संस्थान, उदयपूर, राजस्थान’ येथे जावे लागले. गुरूंच्या संकल्पामुळे पायाचे शस्त्रकर्म यशस्वी झाले. तेथे मी ३ मास (महिने) राहिलोे. शस्त्रकर्माच्या वेळी ‘हे शरीर माझे नसून संत भक्तराज महाराज यांचे (बाबांचे) आहे’, असा मी भाव ठेवला. त्यामुळे सर्व सुसह्य झाले.

३. ग्रंथ ठेवलेली ५०० किलो वजनाची मांडणी (रॅक) अंगावर पडूनही त्यातून वाचणे

मुद्रणालयात सेवा चालू असतांना एके दिवशी संत भक्तराज महाराज यांची भजने लावली होती. त्या भजनांतील प्रत्येक शब्द माझ्या अंतरात जाऊन माझी भावजागृती होत होती. त्या वेळी माझ्या पाठीमागे असलेली ग्रंथ ठेवलेली ५०० किलो वजनाची मांडणी (रॅक) माझ्या अंगावर पडली; पण गुरुकृपेने मला काही झाले नाही. अशा प्रकारे गुरूंनी माझे प्रारब्ध सुसह्य केले.

४. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ग्रंथ छपाईची सेवा मोठ्या प्रमाणात चालू असतांना शारीरिक आणि मानसिक या स्तरांवर पालट होऊन हलकेपणा जाणवणे

२८.५.२०१४ या दिवशी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ग्रंथ छपाईची सेवा मोठ्या प्रमाणात चालू होती. तेथे देवाने मला पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. एका वर्षात छपाई होत असलेले ग्रंथ अवघ्या तीन मासांत (महिन्यांत) छपाई करून पाठवण्यात आले. रात्रंदिवस ग्रंथांच्या चैतन्यात राहिल्यामुळे माझी झोपही अल्प होऊन सेवेच्या कालावधीत वाढ झाली. तसेच माझा नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता यांत वाढ झाली. माझ्यात शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरही पालट झाले. मला हलकेपणा जाणवू लागला. मला साधकांमध्ये ईश्‍वरी रूप पहाता येऊ लागले. ‘परात्पर गुरुदेव सर्वकाही करवून घेत आहेत’, याची खर्‍या अर्थाने मला जाणीव झाली.

५. ग्रंथ बांधणी आणि पडताळणी करतांना आलेल्या अनुुभूती

५ अ. ‘परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)’, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या ग्रंथांची मुखपृष्ठे पडताळतांना चैतन्य मिळून हलकेपणा जाणवणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)’, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या ग्रंथांची मुखपृष्ठे पडताळतांना ‘माझे शरीर आणि मनोदेह यांची शुद्धी होत आहे’, असे जाणवले. प्रत्येक मुखपृष्ठ पडताळतांना मला चैतन्य मिळाले. मला जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी आणि गरम वाफा येत होत्या. मला हलकेपणा जाणवत होता.

५ आ. ग्रंथाचे प्रत्येक पान पडताळतांना शरिराची जाणीव न रहाता ‘हवेत तरंगत आहे’, असे वाटणे : ग्रंथ पडताळतांना ‘ग्रंथांतून पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत होते. ग्रंथाचे प्रत्येक पान पडताळतांना ‘माझे शरीर भारित होत आहे’, असे वाटून मला पुष्कळ हलकेपणा जाणवला. मला शरिराची जाणीव न रहाता ‘मी हवेत तरंगत आहे’, असे वाटत होते. या वेळी माझा नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि शरणागत भाव यांत पुष्कळच वाढ होऊन माझी आपोआप भावजागृती होत होती.

५ इ. वेळ आणि तहान-भूक यांची जाणीव नसणे : मला सेवा करतांना वेळेचे भान रहात नसे. मला तहान-भूकेचीही जाणीव नसे. मी अधिक वेळ सेवा करू शकत होतो.

५ ई. ‘वेगळ्या विश्‍वात आहे’, याची प्रचीती येऊन मन एकाग्र होऊन शांतीची अनुभूती येणे : सेवा करतांना ‘मी वेगळ्या विश्‍वात आहे’, याची मला प्रचीती येत होती. सेवेचे ठिकाण चैतन्याने भारित झाल्याचे मला जाणवत होते. सेवेच्या ठिकाणी आणि ध्यानमंदिरात माझे मन एकाग्र होत होते. मला या ग्रंथ पडताळणीच्या वेळी शांततेची अनुभूती येत होती.’

– श्री. गोविंद सखाराम दर्डे, कोल्हापूर (२.५.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF