प्रवासावर १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपयांचा खर्च केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरातील अपहाराचे प्रकरण

मुंबई, १८ जून (वार्ता.) – येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे शासनाने विशेष कायदा संमत करून स्वतःच्या नियंत्रणात घेतले असतांनाही शासननियुक्त मंदिर व्यवस्थापन समितीने १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत प्रवासावर नियम आणि कायदे डावलून अनधिकृतपणे १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपयांचा खर्च केल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकार्‍यास देण्यात आले आहेत. त्यानुसार शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जूनला विधानसभेत प्रश्‍नोत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह १० आमदारांनी हा प्रश्‍न विचारला होता. विशेष म्हणजे हिंदु जनजागृती समितीने जुलै २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे याविषयी लेखी तक्रार केली होती. याची नोंद घेऊन ११ आमदारांनी हा प्रश्‍न प्रश्‍नोत्तरात विचारला.

याविषयीची प्रश्‍नोत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रश्‍न : श्री सिद्धीविनायक देवस्थानात १५८ कर्मचार्‍यांच्या नियुक्त्यांना शासनाने संमती दिली असतांना २१३ कर्मचारी कामावर असून संमतीविना अधिक ५५ कर्मचार्‍यांची नियुक्ती करून त्यांना नियमित वेतन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून याविषयी हिंदु जनजागृती समितीने जुलै २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे का ?

मुख्यमंत्री : जुलै २०१८ मध्ये हिंदु जनजागृती समितीने तक्रार केली होती. श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यास समिती, प्रभादेवी, मुंबई यांच्या आस्थापनातील १५८ पदांच्या आकृतीबंधास शासनाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती.  सद्यःस्थितीत यांपैकी ४० पदे रिक्त आहेत. मागील १० वर्षांतील कामाची वाढलेली व्याप्ती पहाता काही कर्मचार्‍यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात दैनंदिन रोजंदारीवर करण्यात आली. त्यानंतर कामाचा व्याप आणि न्यासाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने १३३ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.

२. प्रश्‍न : देवस्थानात ४४१ सेवेकरी नियुक्त केले असून यांपैकी निम्म्याहून अधिक सेवेकरी मंदिरात उपस्थित राहून सेवा न देता त्यांना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे स्वतः आणि आप्तेष्टांनाच थेट मंदिरात नेऊन दर्शन घडवून आणत असल्याचे शासनाने केलेल्या परीक्षणातून निदर्शनास आले आहे का ?

मुख्यमंत्री : हे अंशतः खरे आहे; मात्र ही गोष्ट आमच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली नाही. नियमानुसार उपस्थित राहून सेवा न देणार्‍या सेवेकर्‍यांच्या नियुक्त्या तात्काळ रहित करण्याविषयी, तसेच भविष्यात केवळ स्वेच्छेने नियमित उपस्थित राहून सेवा देऊ इच्छिणार्‍या भक्तांना सेवेकरी म्हणून नियुक्ती देण्याविषयी न्यासास कळवण्यात आले, तसेच ठराविक मर्यादेतच सेवेकरी नियुक्त करण्याविषयीचे निर्देशही न्यासास देण्यात आले आहेत.

३. प्रश्‍न : न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या विरोधात न्यासाच्या अध्यक्षांनी, तसेच माजी अध्यक्षांनी अपव्यवहारप्रकरणी लेखी तक्रार करूनही कारवाई केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे का ?

मुख्यमंत्री : हे अंशतः खरे आहे. न्यासाच्या अध्यक्षांनी माजी कार्यकारी अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे.

४. प्रश्‍न : या तक्रारीमध्ये नोटाबंदीच्या काळात मंदिरातून नोटा पालटून घेणे, महिला भक्तांना हाताने खेचून त्यांना अपशब्द वापरणे, मूर्तींची परस्पर खरेदी करून देणगीदारांना देणे, देणगीदारांनी दिलेली १० लाख रुपयांची रक्कम मंदिरात जमा न करणे, अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत का ?

मुख्यमंत्री : होय. याविषयी शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे.

५. प्रश्‍न : या प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे का ? चौकशीत काय आढळून आले ? त्याअनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली ?

मुख्यमंत्री : या प्रकरणाची शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF