ग्रंथांच्या छपाईच्या वेळी अडचणी आल्यावर प्रार्थना केल्याने अडचणी सुटल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

श्री. हेमंत सातपुते

१. जर्मन भाषेतील एका ग्रंथाची तातडीने छपाई करायच्या वेळी मुद्रणालयात भरपूर काम असणे, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर मुद्रणालयाच्या मालकांनी भ्रमणभाष करून ‘आजच ग्रंथाची छपाई करून देतो’, असे सांगणे अन् छपाई कामगाराने छपाईच्या यंत्राला नवीन पट्ट्या लावून रात्री उशिरापर्यंत थांबून छपाई करणे

‘मे २०१६ मध्ये एक जर्मन भाषेतील ग्रंथ छपाईसाठी आला होता. तो ‘हेमंत’ मुद्रणालयात ग्रंथ छपाईला दिला होता. त्या वेळी त्यांच्याकडे भरपूर काम होते. आम्हालाही हा ग्रंथ त्याच दिवशी छपाई करून हवा होता. ‘ग्रंथाची छपाई लवकर व्हावी’, यासाठी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘तुम्हाला अपेक्षित अशी या ग्रंथाची छपाई होऊ दे. तुम्हीच या ग्रंथाची छपाई करवून घ्या. चांगली छपाई करून मिळू दे.’

प्रार्थना केल्यानंतर मी दुसर्‍या सेवेसाठी बाहेर गेलो. १५ मिनिटांनी मुद्रणालयाच्या मालकांनी भ्रमणभाष करून मला सांगितले, ‘‘आजच ग्रंथाची छपाई करून देतो.’’ छपाई कामगाराने (ऑपरेटरने) छपाईच्या यंत्राला नवीन पट्ट्या (बॅलेकेट) लावून त्याच रात्री उशिरापर्यंत थांबून छपाई पूर्ण करून दिली.

२. ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ या ग्रंथाची छपाई करतांना छपाई कामगाराने यंत्राला नवीन पट्ट्या (बॅलेकेट) लावून यंत्र स्वच्छ करून छपाई करणे, ग्रंथाची छपाई चांगली होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ग्रंथ आवडणे

मी प्रार्थना करून ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ हा ग्रंथ छपाईसाठी ‘हेमंत’ मुद्रणालयात दिला. आम्ही मुद्रणालयाच्या मालकांना सांगितले, ‘‘हा सात्त्विक देवनागरी अक्षरे असलेला ग्रंथ आहे. त्याची चांगली छपाई करून हवी आहे.’’ तेव्हा छपाई कामगाराने यंत्राला नवीन पट्ट्या (बॅलेकेट) लावून यंत्र स्वच्छ करून छपाई करून दिली. त्या ग्रंथाची छपाई चांगली झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हा ग्रंथ आवडला.

३. ग्रंथाच्या मुखपृष्ठाची छपाई करतांना पुष्कळ अडचणी येणे, श्रीकृष्णाला प्रार्थना करून सात्त्विक उदबत्ती ओवाळून ‘संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होऊन छपाई पूर्ण होणे

‘गणेश प्रिंटर्स’ येथे ग्रंथांच्या मुखपृष्ठाची छपाई केली जाते. एकदा एका ग्रंथाच्या मुखपृष्ठाची छपाई करतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. पट्ट्या (बॅलेकेट) पालटूनही रंगसंगती जुळत नव्हती. त्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करून सात्त्विक उदबत्ती ओवाळून ‘यंत्राभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होऊन सर्व छपाई पूर्ण झाली.

४. ‘प्लेट-पेस्टिंग’ची सेवा करतांना हाताला ‘प्लेट’ लागून झालेली जखम बरी होणे, नंतर त्या हाताला सूज येणे, आधुनिक वैद्यांचे औषध घेऊनही हाताची सूज न्यून होत नसल्याने शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात भरती होणे, परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून आधुनिक वैद्यांना ‘पेसमेकर’ बसवला असल्याचे सांगितल्यावर त्यांनी शस्त्रकर्म रहित करणे आणि वरिष्ठ आधुनिक वैद्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्यावर २ दिवसांत हाताची सूज न्यून होणे

एकदा ‘प्लेट-पेस्टिंग’ची सेवा करतांना माझ्या हाताला ‘प्लेट’ लागली. त्या वेळी झालेली जखम नंतर बरी झाली. नंतर अमावास्येच्या आधी एक दिवस हातातील लाल धागा निघाला. त्यानंतर ज्या हाताला प्लेट लागली होती, तो हात सुजला. ४ – ५ आधुनिक वैद्यांचे औषध घेऊनही सूज न्यून होत नव्हती. दीड मास (महिना) सूज तशीच होती. ‘हॉस्पीसीओ’ रुग्णालयात हातावर शस्त्रकर्म करून तेथील पाणी काढायचे ठरले. मी शस्त्रकर्म करण्याच्या पटलावर असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच काय करायचे, तो निर्णय घ्या.’ आधुनिक वैद्य शस्त्रकर्मासाठी आल्यानंतर मी त्यांना सांगितले, ‘‘मला ‘पेेसमेकर’ बसवला आहे.’’ तेव्हा आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म रहित केले आणि वरिष्ठ आधुनिक वैद्यांना चिठ्ठी लिहून दिली. मी वरिष्ठ आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी मला गोळ्या पालटून दिल्या. त्यानंतर २ दिवसांत माझ्या हाताची सूज न्यून झाली.’

५. गुरुपौर्णिमेनिमित्त मुद्रणालयांत अर्पण आणि विज्ञापन मागण्यासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

वर्ष २०१६ च्या गुरुपौैर्णिमेच्या वेळी ‘प्रत्येक मुद्रणालयातून अर्पण किंवा विज्ञापन मिळावे’, यासाठी प्रार्थना केली. संस्थेच्या ग्रंथांची ज्या मुद्रणालयात छपाई होते, त्या मुद्रणालयात गेल्यावर ‘विज्ञापन मिळावे’, अशी मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. प्रत्येक मुद्रणालयाच्या मालकांनी स्वखुशीने विज्ञापने दिली. या वर्षी श्रीकृष्णाच्या कृपेने विज्ञापने आणि अर्पण मिळाले. ‘विज्ञापन दिल्यामुळे आम्हाला काही न्यून पडणार नाही. देवच आम्हाला भरपूर देणार आहे’, असे सांगून मुद्रणालयाच्या मालकांनी स्वखुशीने विज्ञापने दिली.’

– श्री. हेमंत सातपुते, कोल्हापूर (१२.१२.२०१६)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF