मुद्रणालय क्षेत्रातील अल्प माहिती असतांनाही परात्पर गुरुदेवांनी साधकांना मुद्रणासंबंधी सर्व सेवा बारकाईने शिकवून त्यांना सेवेत सक्षम करून सनातनच्या ग्रंथांची छपाई करवून घेणे

श्री. गुरुराज प्रभु

१. वडिलांचे मुद्रणालय असूनही ‘अन्य क्षेत्रात शिक्षण घ्यावे’, असे वाटणे, ‘संस्थेचे पुष्कळ ग्रंथ प्रकाशित होणार आणि संस्थेचे मुद्रणालय असणार’, हे समजल्यावर ‘मुद्रणालयात सेवा करूया’, असा विचार मनात येणे

‘माझ्या वडिलांचे मुद्रणालय होते, तरी मला मुद्रणालयात जायला आवडत नव्हते. मला ‘मुद्रणालय सोडून अन्य क्षेत्रात शिक्षण घ्यावे’, असे वाटत होते. वर्ष १९९२ मध्ये मला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले आणि हळूहळू ‘जीवनात त्यांचीच सेवा करायची. दुसरे काही नाही’, असा विचार दृढ होत गेला. ‘संस्थेचे पुष्कळ ग्रंथ प्रकाशित होणार आहेत. पुढे संस्थेचे मुद्रणालय असेल’, हे समजल्यावर मला ‘मुद्रणालयात सेवा करूया’, असे वाटू लागले. बारावीनंतरच्या पुढील शिक्षणाविषयी परात्पर गुरुदेवांना विचारले असता त्यांनी मला ‘प्रिंटींग टेक्नॉलॉजी’ या क्षेत्रात शिक्षण घेण्याचे सुचवले.

२. मुद्रणालय चालू करण्यासाठी ‘सरकारी अनुमती मिळवण्याच्या संदर्भातील सेवा देवच करवून घेत आहे’, अशी अनुभूती येणे

मी गोव्यात आल्यावर ‘इंडस्ट्रियल इस्टेट, नेसाई, मडगाव येथे श्री. महेश मेहता यांच्या जागेत (शेडमध्ये) मुद्रणालय चालू करण्याचे ठरले आहे’, असे मला समजले. शेडची दुरुस्ती, वीज आणि पाणी यांचा पुरवठा होण्यासाठी अनुमती मिळवणे, अशा सेवा होत्या. श्री. अशोक मराठे माझ्या समवेत होते. अनुमती मिळवण्याच्या संदर्भात सरकारी कार्यालयातील सेवा करतांना ‘देवच सर्व करवून घेत आहे’, अशी अनुभूती आली.

३. साधकांना मुद्रणालय क्षेत्रातील अल्प माहिती असतांनाही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने साधक सेवेत सक्षम होणे

त्या वेळी मुद्रणालय क्षेत्रातील थोडीफार माहिती असलेला मी एकटाच साधक होतो. माझा नोकरीतील अनुभव वेगळा होता. मला संस्थेला अपेक्षित असा ‘ग्रंथ छपाई’ या विषयातील अनुभव अल्प होता, तरीही परात्पर गुरुदेवांनी मला सर्व सेवा शिकवल्या. त्यांच्या कृपेने सहसाधक श्री. संदेश हजारे यांनी सर्व सेवा लगेच समजून आणि शिकून घेतल्या. नंतर एकेक करून अन्य साधकही मुद्रणालयातील सेवा करण्यास सक्षम झाले.

४. साधक संघभावनेने सेवा करत असल्याने त्यांच्यात जवळीक साधली जाणे

सर्व साधकांमध्ये जवळीक झाली. आम्ही संघभावनेने सेवा करत असू. सर्वांची मने जुळल्यामुळे ‘कुणाचेे मन दुखावले आहे’, असे कधी झाले नाही. सर्व साधक एकमेकांना सांभाळून घेत असत.

‘मी सनातनच्या मुद्रणालयात सेवा करावी’, हे ईश्‍वराचेच नियोजन होते. ‘या सेवेसाठी आवश्यक पात्रता माझ्याकडे नसतांना परात्पर गुरुदेवांनी ही सेवा माझ्याकडून करवून घेतली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. गुरुराज प्रभु, वाराणसी (२.५.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   


Multi Language |Offline reading | PDF