२५ वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू पावलेल्या एका मुलाच्या पालकांना ६ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

२५ वर्षांनी न्याय मिळणे, हा एकप्रकारे अन्यायच नव्हे का ? न्याय मिळण्यातील ही त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने उपाययोजना काढावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

नवी देहली – रक्तातील प्लेटलेट्सची संख्या केवळ ३५ सहस्र असतांना शस्त्रक्रिया केल्याने बिहारमधील एका १५ वर्षीय मुलाचा २५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी याचिकादार पालकांना ६ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. हा आदेश रुग्णाचा मृत्यू होऊन २५ वर्षे उलटल्यानंतर देण्यात आला आहे. (ही हानीभरपाई कुटुंबियांना वेळीच मिळाली असती, तर घरातील मुलाच्या जाण्याने त्यांना बसलेल्या मानसिक धक्क्यापासून थोडा दिलासा मिळाला असता ! – संपादक)

१५ वर्षांच्या संजय कुमारला ताप, पोटदुखी आणि डोळ्यांमधून रक्तस्राव या कारणांसाठी ११ नोव्हेंबर १९९५ या दिवशी बिहारच्या पटणा शहरातील एका रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. रक्तचाचणीच्या अहवालानुसार संजय कुमार याच्या रक्तात प्लेटलेट्सची संख्या केवळ ३५ सहस्र आढळली होती. तरीही तेथे दोन युनिट रक्त घालून त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा रक्तस्राव काही थांबेना. त्यानंतर रुग्णाला पटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हालवण्यात आले; परंतु तेथे १६ नोव्हेंबर या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

‘प्लेटलेट्सची संख्या केवळ ३५ सहस्र असतांना शस्त्रक्रिया करणे, ही घोडचूक आहे. याला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे’, असे एका तज्ञ डॉक्टरांनी मृत मुलाच्या पालकांना सांगितले. त्यानंतर हे प्रकरण राज्य ग्राहक न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आले. ‘रुग्ण मुलाची वैद्यकीय चाचणी योग्यरितीने करण्यात आली नाही. रुग्णामध्ये प्लेटलेट्सची संख्या केवळ ३५ सहस्र होती. रुग्णामध्ये सर्वसाधारणपणे प्लेटलेट्सची संख्या १.५ लाख ते ४ लाखापर्यंत असणे अपेक्षित असते. संख्या अल्प असलेल्या स्थितीत शस्त्रक्रिया करणे हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे’, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. ‘मृत मुलाच्या पालकांना रुग्णालयाने ४ लाख रुपये हानीभरपाई द्यावी, तसेच शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांनी २ लाख रुपये हानीभरपाई द्यावी’, असा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला. या आदेशाला डॉक्टरांनी देहलीस्थित राष्ट्रीय ग्राहक मंचासमोर आव्हान दिले. ‘या प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा अल्प होता’, असे सांगत राष्ट्रीय ग्राहक मंचाने डॉक्टरांना २ लाख हानीभरपाईपासून मुक्त केले. या निर्णयाला याचिकादाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ‘रुग्णालयाने याचिकादाराला ६ लाख रुपये हानीभरपाई द्यावी’, असा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. (हानीभरपाई देण्याची शिक्षा देण्यासह हलगर्जीपणा करून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या डॉक्टरांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF