दैत्यांनी वटवृक्ष नष्ट करण्याचे ठरवणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. दैत्यांचा पुढारी जटीर आणि त्याची पत्नी चिनगारी यांनी सत्यवान-सावित्रीच्या कथेला ‘भाकड कथा’ म्हणून तिचा अपप्रचार करून वटवृक्षाला आव्हान देणे

मानवाने शहरात पुष्कळ वटवृक्ष तोडले. हे वटवृक्ष गुजरात भागात पुष्कळसे आहेत. अजूनही मुंबईजवळ बोईसर भागात दुतर्फा वटवृक्षाची झाडे आहेत. सती सावित्रीला तिच्या पुण्याईने पुन्हा मिळालेल्या तिच्या मृत झालेल्या पतीमुळे वटपौर्णिमेची पूजा हिंदु धर्मात रूढ झाली. हिंदु धर्मात स्त्रीला वटवृक्षाचे पुष्कळ महत्त्व वाटू लागले. त्या वृक्षाचे इतके स्तोम दैत्यांना आवडले नाही. त्यामुळे या खेडेगावात त्यांनी धुमाकूळ घातला आणि सार्‍या पवित्र स्त्रियांची पूजा बंद केली. या दैत्यांचा पुढारी जटीर हा होता. तो आणि त्याची पत्नी चिनगारी यांनी सत्यवान-सावित्रीच्या कथेला ‘भाकड कथा’ म्हणून तिचा अपप्रचार करून वटवृक्षाला आव्हान दिले आणि सगळ्या पवित्र स्त्रियांना वटपौर्णिमेची पूजा करायला बंदी केली. या राक्षसी दांपत्याने सार्‍या दैत्य कुटुंबांना प्रतिवर्षी वटपौर्णिमेला बोलावले. कुटुंबांतील पत्नींनी अपवित्रपणे दगड-मातीने वटवृक्षाची पूजा करून त्याची अवहेलना केली आणि त्याच दिवशी त्याच्या भोवताली सार्‍या दैत्यांच्या स्त्रिया बसल्या अन् वृक्षावर चढलेल्या एकेका दैत्याने त्याची एकेक फांदी तोडली. अशी त्या भागातील दीडशे वृक्षांची अपवित्रपणे निर्भर्त्सना होऊ लागली. प्रत्येक वृक्षावर एकेक दैत्य कुर्‍हाडीने त्याची एकेक फांदी वटपौर्णिमेला तोडी आणि वृक्षाच्या पायाशी सार्‍या दैत्यपत्नी बसून अपवित्रपणे पूजेची टिंगल करत. वटपौर्णिमेला प्रत्येक वर्षी हाच प्रकार होऊ लागला. पवित्र स्त्रियांना बंदी झाली. पाचवे वर्ष उजाडले. पाचव्या वर्षी या दैत्याने वृक्ष तोडण्यासाठी १५० वृक्षांवर १५० दैत्यांना बसवण्याचे आणि त्यांच्या खाली विटंबनेसाठी स्त्रियांना वृक्षांच्या भोवताली बसवून संपूर्ण वटवृक्ष तोडण्याचे ठरवले.’

२. आसमंतात प्रतिध्वनी निर्माण होऊन राक्षसांचे आयुष्य नष्ट होऊन वटवृक्षाच्या पायाशी बसलेल्या स्त्रिया शिळा होणे आणि त्यांना पाय लागू नये, यासाठीच वटवृक्षाला पार बांधणे

‘वटपौर्णिमेला अशा तर्‍हेने १५० फांद्या दैत्यांनी तोडल्या आणि आनंदोत्सवातील त्यांच्या हास्यध्वनीने आसमंतात घुमून कल्लोळ केला अन् ते त्या वटवृक्षावर अभिमानाने उभे राहिले. इतक्यात आसमंतात प्रतिध्वनी निर्माण होऊन ते १५० राक्षस स्वत:चे आयुष्य गमावून वृक्षाच्या ढोलीत पडले. खाली पडलेल्या फांद्या पुन्हा वृक्षाला भिडल्या आणि पायाशी बसलेल्या स्त्रिया शिळा होऊन पडल्या. त्यांना पाय लागू नये, यासाठीच वटवृक्षाला पार बांधतात. निर्भर्त्सना करणार्‍या स्त्रियांच्या शिळेचे ते द्योतक आहे. आजही ते वृक्ष आहेत. त्या वृक्षांवर दैत्याचे चित्र अस्पष्ट असले तरी दिसते; म्हणून या एका वृक्षाला ‘जटीर’ म्हणतात.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून, १३.१०.१९८१)

(समाप्त)


Multi Language |Offline reading | PDF