कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शरद कळसकर यांचा कोणताही सहभाग नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कळसकर यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर, १८ जून (वार्ता.) – डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणांसह अन्य गुन्ह्यांत शरद कळसकर यांना अटक केली; म्हणून कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणेने शरद कळसकर यांना अटक केली आहे. वस्तूत: कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शरद कळसकर यांचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती ते काय देणार ? तरी कळसकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करणे अयोग्य आहे, असा युक्तीवाद अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला. कॉ. पानसरे हत्या प्रकरणात कळसकर यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना १८ जून या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी अधिवक्ता पटवर्धन यांनी हा युक्तीवाद केला. सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस्.एस्. राऊळ यांच्यासमोर ही सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी कळसकर यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. अधिवक्ता पटवर्धन यांच्या समवेत अधिवक्ता प्रकाश खोंद्रे हेही उपस्थित होते.

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केलेला युक्तीवाद

१. शरद कळसकर यांना अटक केल्यापासून ते सात दिवस पोलिसांच्या कह्यात होते. त्यामुळे सात दिवसांत अन्वेषण पूर्ण होणे आवश्यक होते. असे काही झाले नसून पोलीस अकारण पोलीस कोठडी वाढवून मागत आहेत.

२. या प्रकरणात पूर्वी अटक करण्यात आलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. अमोल काळे हे अटकेत असतांना शरद कळसकर यांची चौकशी का करण्यात आली नाही ? याचे कोणतेही उत्तर अन्वेषण यंत्रणेकडे नाही.

३. ‘गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त करायची आहे’, असा युक्तीवाद पोलीस करत आहेत; मात्र गुन्हा वर्ष २०१५ मध्ये घडला असल्याने इतक्या काळानंतर बंदूक सापडणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हेही कारण अनाकलनीय आहे.

४. त्यामुळे पोलिसांकडे कोणतेही सबळ कारण नसल्याने कळसकर यांना कोणत्याही परिस्थितीत पोलीस कोठडी वाढवून देण्यात येऊ नये.


Multi Language |Offline reading | PDF