दुष्काळाच्या सूत्रावरून विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ

२ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित

मुंबई, १८ जून (वार्ता.) – विधान परिषदेच्या १८ जूनच्या कामकाजाच्या प्रश्‍नोत्तरांमध्ये राज्यातील दुष्काळग्रस्तांना साहाय्य देण्याविषयीचा प्रश्‍न असतांनाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहाच्या प्रारंभीच यावर चर्चा करण्याची मागणी केली. ‘ही चर्चा २४० च्या प्रस्तावाच्या वेळी करावी’, असे सांगून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळली. सभापतींच्या आवाहनानंतरही विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरत सभापतींच्या दालनापुढे येऊन घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सभापतींना १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. प्रश्‍नोत्तराच्या तासात दुष्काळाच्या विषयाच्या वेळी गोंधळ घालणार्‍या विरोधकांनी प्रश्‍नोत्तराचा तास झाल्यानंतर पुन्हा स्थगन प्रस्थावाद्वारे दुष्काळावर चर्चा करण्याची मागणी करत सभागृहात शासनाच्या विरोधात घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा ५ मिनिटांसाठी स्थगित करावे लागले.

यानंतर सभागृहाचे कामकाज चालू झाल्यावर प्रश्‍नोत्तराच्या वेळेला राज्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक साहाय्य देण्याविषयीचा प्रश्‍न काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांसह अन्य सदस्यांनी उपस्थित केला. या वेळी धनंजय मुंडे यांनी भाजप दुष्काळाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.


Multi Language |Offline reading | PDF