मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे विरोधकांचे बिंग फुटले !

अर्थसंकल्प फुटल्याची ओरड करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई, १८ जून (वार्ता.) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ट्वीट’वरून अर्थसंकल्प फुटल्याची ओरड करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाचे वाचन करत असतांना विरोधकांनी सभात्याग केला. प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पाचे वाचन झाल्यानंतर १६ मिनिटांनी ट्विटरवर ‘पोस्ट’ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केल्यामुळे विरोधकांचे बिंग फुटले.

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अनुमतीने दुपारी २ वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास प्रारंभ केला. यानंतर दुपारी २.३७ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उभे राहून अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप केला. या वेळी नेमके काय झाले, हे लक्षात येत नव्हते. विरोधकांमधीलही अनेकांना नेमके काय झाले, हे लक्षात येत नव्हते. या वेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांना पूर्ण अर्थसंकल्प ऐकून घेण्याची विनंती केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘अर्थसंकल्पाच्या वेळी सभात्याग करून नवा पायंडा पाडू नका’, अशी विरोधकांना विनंती केली; मात्र सर्व विरोधक सभागृहाच्या बाहेर निघून गेले. त्यामुळे विरोधकांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्पाचे वाचन करण्यात आले.

अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करणार्‍या विरोधकांनी अद्ययावत तंत्रज्ञान समजून घ्यावे ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्प फुटला असल्याचा विरोधकांचा अपसमज झाला आहे. ट्विटरवर एकही शब्द अर्थमंत्र्यांच्या भाषणाच्या पूर्वी आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी केलेल्या भाषणानंतर १६ मिनिटांनी ‘ट्वीट’ आले आहे. सध्या ‘फॉरमेट’ करूनही आपणाला ‘पोस्ट’ सिद्ध करता येते. केंद्रशासनाचा अर्थसंकल्प पाहिला, तर तो केवळ २-३ मिनिटांनी सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांवर आला होता. सध्या अद्ययावत ‘डिजीटल’ माध्यमे आहेत. विरोधक आमच्यावर टीका करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग करतात; मात्र आमच्या सकारात्मक कार्यासाठी त्यांचा उपयोग केला, तर मात्र ते विरोधकांना दिसत नाही. अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करणार्‍या विरोधकांनी अद्ययावत तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाच्या वेळी सांगितले.

अर्थसंकल्प न ऐकणारे पुढच्या अर्थसंकल्पासाठी सभागृहात पुन्हा निवडून येऊ नयेत, ही ईश्‍वराच्या चरणी प्रार्थना ! – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘गरीब’ हा या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे. त्यांचा विषय चालू असतांना विरोधकांनी सभागृहाचा त्याग करणे योग्य नाही. देव आला, तरी अशा विरोधकांना सद्बुद्धी येणार नाही. ‘अर्थसंकल्प न ऐकणारे पुढच्या अर्थसंकल्पासाठी सभागृहात पुन्हा निवडून येऊ नयेत’, ही मी ईश्‍वराच्या चरणी प्रार्थना करतो.


Multi Language |Offline reading | PDF