काँग्रेस आघाडीच्या काळात चारा छावण्यांच्या अनुदानात आर्थिक अपहार !

चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेत काँग्रेसचा भ्रष्टाचारी मुखवटा उघड

चारा छावण्यांमधील भ्रष्टाचाराला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा !

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, १८ जून (वार्ता.) – या आधी चारा छावण्यांमध्ये अपहार झाला. त्यामुळे अनेक चारा छावण्यांना काळ्या सूचीत टाकण्यात आले. असा अपहार पुन्हा होऊ नये, यासाठी चारा छावण्या उभारण्यासाठी ठेव रकमेची तरतूद करण्यात आली आहे, या शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात चारा छावण्यांच्या अनुदानात झालेला भ्रष्टाचार विधान परिषदेमध्ये उघड केला. १८ जून या दिवशी विधान परिषदेमध्ये दुष्काळग्रस्त भागांतील शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य देण्याचा प्रश्‍न विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात उपस्थित करून चारा छावण्यांसाठी ठेवण्यात आलेल्या १० लक्ष ठेव रकमेविषयी आक्षेप घेतला. यावर चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठीच ठेव रकमेची तरतूद करण्यात आल्याचे सांगून ही रक्कम ५ लक्ष रुपये इतकी करण्यात आली असल्याचे साांगितले.

या वेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,

१. ठेवीची रक्कम कोणा व्यक्तीसाठी नाही, तर संस्थेसाठी आहे. चांगल्या संस्था पुढे याव्यात, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

२. प्रारंभी राज्यातील १५१ तालुक्यांतील १७ सहस्र गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता; मात्र अन्य दुष्काळग्रस्त भागांनाही शासकीय साहाय्याचा लाभ व्हावा, यासाठी नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे एकूण २८ सहस्र गावांना साहाय्य करता आले.

३. दुष्काळग्रस्त भागांत आतापर्यंत १ सहस्र ६३८ छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये १० लक्ष जनावरे आहेत. या छावण्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा आर्थिक भारही शासनाने उचलला आहे. प्रत्येक छावणीसाठी ५०० जनावरांची ठेवण्यात आलेली मर्यादा ३०० पर्यंत आणण्यात आली आहे.

४. प्रत्येक दुष्काळग्रस्त भागात पालकमंत्र्यांना बैठक घेण्याचा आदेश आला आहे. सध्या दुष्काळग्रस्त भागांत अन्य विभागांतून पाणी आणावे लागेल अशी स्थिती नाही. त्या भागातील अन्य ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केवळ बीड जिल्ह्यात नगर जिल्ह्याच्या सीमा भागातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF